८ नर्मदा परिक्रमा : खलघाट: सेवाभावाचा एक अविस्मरणीय अनुभव

 


खलघाट: सेवाभावाचा एक अविस्मरणीय अनुभव

सात डिसेंबरला सकाळी शालिवाहन मंदिरात रुद्रपाठ करून आम्ही पुढे निघालो. नावडीटोला, ढालखेडा, बलगाव या मार्गे चालत आम्ही खलघाट येथे पोहोचलो. या गावामधून मुंबई-आग्रा महामार्ग जातो आणि नर्मदेच्या पात्रावर येथे एक भव्य पूल आहे. पुलाजवळच, अगदी नदीला लागून, 'सदगुरु जोग महाराज अन्नक्षेत्र' नावाचा एक छोटासा आश्रम आहे. आळंदीतील जोग महाराज वारकरी प्रशिक्षण संस्थेत शिकलेले कुणाल पाटील आणि त्यांची पत्नी हे दाम्पत्य या आश्रमाचे व्यवस्थापन पाहतात.

आम्हाला वरच्या मजल्यावर आसने लावण्यासाठी जागा मिळाली. या मजल्याचे बांधकाम अद्याप पूर्ण झाले नव्हते, दारे-खिडक्या बसवणे बाकी होते. आम्ही सायंपूजा आटोपली. थोड्या वेळाने पाटील दाम्पत्याने आम्हाला महाराष्ट्रीय पद्धतीची भोजनप्रसादी दिली. त्यानंतर, सर्वांशी गप्पा मारताना कुणाल पाटील यांनी एक छोटेसे प्रवचन दिले. वारकरी प्रशिक्षण संस्थेत शिक्षण झाल्यामुळे विषयाची आकर्षक मांडणी करण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. त्यांनी परिक्रमेचे महत्त्व आणि परिक्रमेत घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली.

त्यांच्या मार्गदर्शनातील एक वाक्य माझ्या मनात घर करून राहिले. ते म्हणाले, "जेव्हा तुमची परिक्रमा पूर्ण होईल, तुम्ही ओंकारेश्वरला पोहोचाल, तेव्हा सर्व विधी झाल्यानंतर एकटेच मैया किनारी जा. तिच्याशी हितगुज करा. तुमच्या डोळ्यातील आनंदाश्रू तिच्या जलामध्ये मिसळून द्या. थोडा वेळ शांत बसा आणि मग परतीच्या प्रवासाला निघा." रात्री झोप लागेपर्यंत हे वाक्य माझ्या डोक्यात फिरत होते. विचार करता करता केव्हातरी डोळा लागला.

 

खलघाट येथील जोग महाराज आश्रमातून दिसणारे दृष्य

नर्मदेच्या वाटेवरील त्यागी माता

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठून आन्हिके उरकली, मैयाची पूजा केली आणि 'विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर' घेऊन चालू लागलो. सुमारे साडेदहा वाजले असतील. रस्त्याच्या कडेला एका कडुनिंबाच्या झाडाखाली एक प्लास्टिकची ताडपत्री होती. तिथे जवळच एक पंधरा लिटरची प्लास्टिकची बरणी आणि त्यावर ठेवलेले ग्लास घेऊन एक ८४-८५ वर्षांची माई बसली होती.


 ही ती मय्या

आम्हाला पाहताच 'नर्मदे हर' करून तिने ताडपत्रीवर बसण्यासाठी आम्हाला सांगितले. आम्ही बसल्यानंतर त्या बरणीतून पाण्याचे ग्लास भरून तिने आमच्यापुढे ठेवले आणि म्हणाली, "हे पाणी नाही, मैयाचे दूध आहे." मला एवढीच सेवा करणे शक्य आहे.

सहज बोलता बोलता आम्ही तिची चौकशी केली. ती जिथे बसली होती, तिथे शेजारीच तिचे दोन एकर शेत होते. आम्ही पाहिले, तर त्यात तिचा मुलगा काहीतरी काम करत होता. या दोन एकर शेतीवर तिच्या चार माणसांचे कुटुंब चालत होते. काय म्हणावे या त्यागाला? पाच मिनिटांनी आम्ही पुढे निघालो, तेव्हा तिने आम्हाला हृदयाशी कवटाळून घेतले. अगदी आईच्या मायेने 'किती कष्ट होतात माझ्या मुलांना' असे म्हणत तिने आमच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तो स्पर्श एका आईचा स्पर्श होता. आता हा प्रसंग लिहितानाही माझा कंठ दाटून आला आहे.

आम्ही तिथून पुढे निघालो. मध्ये एक छोटेसे गाव लागले. त्या गावात एका घराशेजारी एक बाकडे ठेवले होते, त्यावर चहाची किटली आणि एका बाजूला स्टीलचा हंडा अशा दोन गोष्टी होत्या. तिथे एक महिला बसली होती. तिने आम्हाला विचारले, "चहा घेणार की ताक?" हवेत गारवा असल्यामुळे आम्ही चहा घेतला. सहज तिची विचारपूस करताना समजले की तिला निराधार विधवांना मिळणारी दीड हजार रुपये मासिक पेन्शन मिळत होती आणि त्यातून ती ही परिक्रमावासींची सेवा करत होती. आम्ही सुन्न झालो. काय म्हणावे या त्यागाला?

मी विचारले, "दीड हजारात सगळे भागते का?"

त्यावर ती म्हणाली, "मैया कमी पडू देत नाही!"

आम्ही तिथून निघालो, तेव्हा माझ्या डोक्यात या दोन महिलांचेच विचार येत होते. आणि एका कवितेच्या ओळी मनात रुंजी घालत होत्या:

'देणाऱ्याने देत जावे,

घेणाऱ्याने घेत जावे.

घेता घेता घेणाऱ्याने,

एक दिवस; देणाऱ्याचे हात घ्यावे.'

खरंच, आपल्याला असे देणाऱ्याचे हात घेऊन देणारा कधी होता येईल? हा प्रश्न माझ्या मनात आजही घोळत आहेत्यासाठी मय्याच्या चरणी प्रार्थना आहे.

Marathi literature, Narmada Parikrama, spiritual journey, travelogue, personal narrative, divine connection, selfless service 

 #NarmadaParikrama #SpiritualJourney #MarathiLiterature #SelflessService #ActsOfKindness #FaithAndDestiny #Pilgrimage #NarmadaMaiya #DevotionalStory #Khalghat

नर्मदा परिक्रमा: निसर्ग, साहस आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_268.html

नर्मदा परिक्रमा : नर्मदे हर: एक आंतरिक आणि बाह्य प्रवास

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_517.html

नर्मदा परिक्रमा : चमत्कारांचा खजिना आणि एका दैवी प्रवासाची सुरुवात

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_243.html

नर्मदा परिक्रमा : आशीर्वाद आणि एक दैवी साखळी

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_418.html

नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरची पहिली रात्र : अनपेक्षित घटना आणि संघर्ष

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_459.html

नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वर: परिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_214.html

नर्मदा परिक्रमा : रावेरखेडीकडे प्रस्थान आणि एक अनपेक्षित सहप्रवासी

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post.html

नर्मदा परिक्रमा : शालिवाहनकडे: एक आनंददायी अनुभव

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_16.html

मांडूतील नीलकंठेश्वर महादेव मंदिर: एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अवलोकन

https://www.astranewsnetwork.in/2025/09/blog-post_3.html

----------------------------------

नर्मदा परिक्रमा व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये सामील होण्यासाठी 

मा रेवा... जिचे पाणी नाही, तर प्रेम आहे.

मा नर्मदा... जिची वाळू नाही, तर कणकण चैतन्य आहे.

जिच्या परिक्रमेचा अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि तो फक्त परिक्रमावासीच समजू शकतात. ही परिक्रमा फक्त एक प्रवास नाही, तर एक अनुभूती आहे... एक साधना आहे... जेथे परिक्रमावासी आणि आई नर्मदा यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं.

तुम्हीही या दिव्य अनुभवाचे साक्षीदार आहात का?

या समूहात तुम्ही सहभागी होऊ शकता, जर...

·         तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असेल आणि तुमचा अनुभव इतरांसोबत वाटून घेण्याची तुमची इच्छा असेल.

·         तुम्ही नर्मदा परिक्रमा करण्याची योजना आखत असाल आणि त्यासाठी मार्गदर्शन, माहिती किंवा प्रेरणा शोधत असाल.

·         तुम्हाला नर्मदा खंडातील सेवाकार्यात (उदा. अन्नदान, आरोग्य सेवा, आश्रम व्यवस्थापन .) सहभागी होण्याची किंवा योगदान देण्याची इच्छा असेल.

·         तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांना नर्मदा नदी आणि तिच्या अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे.

हा समूह तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, कारण...

·         तुम्ही परिक्रमावासींचे अनुभव वाचू शकता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता किंवा तुमचे प्रश्न विचारू शकता.

·         तुम्ही परिक्रमेसाठी आवश्यक माहिती, साधने आणि मार्गदर्शन मिळवू शकता.

·         तुम्ही नर्मदा खंडातील सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी किंवा योगदान देण्यासाठी योग्य संधी शोधू शकता.

·         तुम्ही इतर परिक्रमावासी किंवा सेवाभावी व्यक्तींसोबत संवाद साधू शकता आणि एक सकारात्मक समुदाय तयार करू शकता.

या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आणि नर्मदा मातेच्या सेवेसाठी एकत्र येण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.

या पवित्र कार्यात सामील व्हा आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी हातभार लावा!

https://chat.whatsapp.com/Gnbvp5zPXXvER76ipmjhqi

 


८ नर्मदा परिक्रमा : खलघाट: सेवाभावाचा एक अविस्मरणीय अनुभव ८ नर्मदा परिक्रमा : खलघाट: सेवाभावाचा एक अविस्मरणीय अनुभव Reviewed by ANN news network on ९/०५/२०२५ ०५:२१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".