६ नर्मदा परिक्रमा : रावेरखेडीकडे प्रस्थान आणि एक अनपेक्षित सहप्रवासी

 


६ नर्मदा परिक्रमा : रावेरखेडीकडे प्रस्थान आणि एक अनपेक्षित सहप्रवासी

डिसेंबरला पहाटे मोरटक्क्यातील ठाकूर नरेंद्रसिंह पवार यांच्या वृंदावनधाम आश्रमातून आम्ही परिक्रमा सुरू केली. नवले महाराजांनी माझी ओळख एका परिक्रमावासीबरोबर करून दिली. 'संजय महाराज, आजपासून आपल्याबरोबर चालणार आहेत,' नवले महाराज म्हणाले. मी पाहिले तर हा तोच माणूस होता जो खांडव्याहून बसने ओंकारेश्वरला येताना निळे जॅकेट घालून आमच्या बसमध्ये बसला होता.

त्यांनी मला सांगितले की, 'मी ज्या ग्रुपबरोबर होतो, त्यात सगळी तरुण मुलं आहेत. त्यांच्या वेगाने मला चालता येणे शक्य नाही. माझ्या एका गुडघ्याची लिगामेंट खराब झाली आहे.' त्यांनी आपल्या पायाला लावलेला बेल्टही मला दाखवला. परिचय झाल्यावर ते त्यांची बॅग आणायला गेले. नवले महाराज मला म्हणाले, 'नवी मुंबई पोलीस खात्यात इन्स्पेक्टर म्हणून यांनी काम केले आहे असे सांगतायत. अगदी डोळ्यात पाणी आणून यांनी मला बरोबर घेऊन चला म्हणून विनंती केली आहे.' मीही म्हटले, 'काही हरकत नाही.'


रस्त्यातील चायप्रसादी

अशाप्रकारे, एक अनपेक्षित सहप्रवासी मला मिळाला. आम्ही निघालो. त्या दिवशी सायंकाळपर्यंत रावेरखेडीला पोहोचलो. मध्ये रस्त्यात एक बाबाजी रस्त्याच्या कडेला एक छोटीशी टपरी उभारून चहाची सेवा देत होते. आम्ही त्यांच्या इथे थांबलो. थोडा चहा घेतला. त्यांची विचारपूस केली. तेव्हा ते म्हणाले की, ते रस्त्यापासून चार किलोमीटर आत असलेल्या गावात राहतात. त्यांची अवघी चार एकर शेती असूनही ते परिक्रमावासियांना मोफत चहा देत होते. दिवसातून शंभर-दोनशे परिक्रमावासी त्यांच्याकडून चहा पिऊन जातात. त्यांच्या सेवेचा तो निस्वार्थ भाव पाहून मी त्यांना मनोमन नमन केले. आपल्याकडे काही नसताना जे आहे ते देण्याची वृत्ती नर्मदा खंडात सर्वत्र दिसून येते, जी इतर कोणत्याही यात्रेत किंवा परिक्रमेत दिसत नाही.

पेशव्यांचे समाधीस्थळ आणि परिक्रमेतील पहिला रुद्रपाठ

सायंकाळी आम्ही रावेरखेडीला पोहोचलो. हे थोर योद्धा बाजीराव पेशवे यांचे समाधीस्थळ आहे. मुलुखगिरीवर असताना तापाने त्यांचा येथेच मृत्यू झाला होता. अवघ्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एक्केचाळीस लढाया लढल्या आणि त्यातील एकही हरले नाहीत. आम्ही बाजीराव पेशव्यांच्या पत्नी काशीबाईंनी बांधलेल्या शिवालयाशेजारील रामेश्वरधाम अन्नक्षेत्रात मुक्काम केला.


रावेरखेडी येथील रात्रीचा मुक्काम

सायंकाळी मंदिरात दर्शन घेतले, थोडा वेळ बाहेर बसलो आणि त्यानंतर सायंकाळचा पूजापाठ पूर्ण केला. तेवढ्यात महाराजांनी 'भोजन की सिताराम' अशी हाक दिली. आम्ही आमची ताटे घेऊन पंक्तीत बसलो. या कडाक्याच्या थंडीत मिळालेली गरमागरम खिचडी खूप समाधान देऊन गेली.

आमच्यासोबत काही मध्यप्रदेशातील परिक्रमावासी होते. त्यांचा एक मोठा गट होता, ज्यात एक जण कोका नावाचे देशी वाद्य वाजवत होता. त्यांनी त्या तालावर 'सीताराम सीताराम'चा गजर सुरू केला. आश्रमाचे संचालक बाबाजींना हे दृश्य मोबाईलमध्ये चित्रित करण्याचा मोह आवरला नाही. मीही बसल्या जागेवरून त्याचे थोडे फुटेज घेतले. रात्री आठ-साडेआठच्या दरम्यान आम्ही सर्व झोपी गेलो.


 श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे समाधीस्थळ

पहाटे उठून कडाक्याच्या थंडीत थंड पाण्याने स्नान केले. मातेची दैनंदिन पूजा केली. नंतर माझ्या मनात आले, की काशीबाई पेशव्यांनी उभारलेल्या या शिवमंदिरात आपण रुद्रपाठ करावा. मी महाराजांना परवानगी विचारली. त्यांनी मोठ्या खुशीने परवानगी दिली. आम्ही तिघेही मंदिरात गेलो, रुद्रपाठ केला आणि त्यानंतर बाहेर पडून बाजीराव पेशव्यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना वंदन केले.

तिथे जवळच एक दुकान आहे. त्याचे मालक पवार, मूळचे महाराष्ट्रातले. त्यांचे पूर्वज पेशव्यांबरोबर इथे आले आणि ते इथलेच झाले. पण तरीही त्यांची महाराष्ट्राच्या मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. आम्ही महाराष्ट्रातले आणि त्यातही पुण्याजवळचे आहोत, हे ऐकल्यावर त्यांनी अगदी भरभरून आमच्याशी गप्पा मारल्या आणि चहा पाजला. थोड्या वेळाने आम्ही त्यांचा निरोप घेऊन पुढे निघालो.


पेशव्यांना आदरांजली

सत्संगी महाराजांची कुरकुर आणि एका नियमाचा उदय

आमचे नवीन सहप्रवासी (यापुढे मी त्यांना 'सत्संगी महाराज' म्हणेन; त्याचे कारण तुम्हाला पुढे कळेल) यांनी लगेच कुरकुर सुरू केली, 'किती चालायचं? पाय दुखतोय! जरा थांबत जाऊ. मुक्काम करत जाऊ.' पोलीस खात्यातले असल्याने ते नवले महाराजांशी काही बोलत नसत, पण जी काही कुरकुर होती ती फक्त माझ्याजवळ करत असत. जणू त्यांनी मला त्यांचा हवालदारच बनवून टाकले होते. आता एक कटकट आपल्यामागे लागणार, याचा अंदाज मला आला. पण 'ते आपल्या पायाने बरोबर चालत आहेत, आपल्याला थोडेच त्यांना न्यायचे आहे' असे मनाशी म्हणून मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असे.

सियारामबाबा आश्रम

तर; त्या दिवशी दुपारपर्यंत आम्ही थोर संत सियारामबाबांच्या आश्रमात, तेलिया भट्ट्यान येथे पोहोचलो. बाबा आजारी असून त्यांची तब्येत गंभीर असल्याचे मला आमच्या एका ग्रुपवरून समजले होते. आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे मोठी गर्दी होती. बाबांच्या दर्शनासाठी लोक लांबून आले होते, त्यामुळे पोलीस बंदोबस्त होता आणि रुग्णवाहिकाही तयार ठेवली होती. दर्शन बंद होते. आम्ही परिक्रमावासी आहोत असे सांगितल्यावर आम्हाला त्यांचे दुरून दर्शन घेता आले. बाबा शुद्धीत होते, पण फार काळ निघेल असे वाटत नव्हते.

आम्ही त्यांनी स्थापन केलेल्या मारुतीच्या घुमटीजवळ आलो. त्याला वंदन केले. तेवढ्यात एक माणूस धावत आला आणि त्याने आमच्या हातात अर्धा-अर्धा किलोची बदाम आणि काजूची पाकिटे ठेवली. तो म्हणाला, 'बाबांसाठी आणली होती, पण आत जाऊ देत नाहीत. तुम्ही परिक्रमावासी आहात, तुम्ही हा प्रसाद घ्या.' आम्ही तो प्रसाद घेतला.

भोजनप्रसाद आणि निद्रादेवीची हाक

त्यानंतर आम्ही भोजनशाळेकडे गेलो. (या गडबडीत एक गोष्ट सांगायला विसरलो. परिक्रमा करताना एक नियम पाळायला सांगतात. प्रतिभाताई चितळे यांच्या व्हिडिओतही याचा उल्लेख आहे. मी असा कोणताही नियम केला नव्हता. पण आता अचानक माझ्याकडून एक नियम म्हणजे, 'एकदाच पानात येईल तेवढेच घ्यायचे, पुन्हा घ्यायचे नाही.'  हा नियम पाळला जाऊ लागला. या नियमामुळे पुढे काय गमतीजमती झाल्या आणि मैयाने तो मोडला का, हे मी पुढे सांगेन.)

आम्ही सियाराम बाबांच्या आश्रमातील भोजनशाळेत गेलो. तिथे भोजन वाढणाऱ्यांनी विचारले, 'किती वाढू?' मी त्याला म्हटले, 'तुमची इच्छा असेल तेवढे वाढा.' का कोणास ठाऊक, पण त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य पसरले. आणि; त्याने मला इतके अन्न वाढून दिले की ते संपवता संपवता माझ्या नाकीनऊ आले.

तिथून आम्ही पुढे निघालो. सायंकाळ होता होता आम्ही तेलियाभट्ट्यान आणि शालिवाहन यांच्यामध्ये एका रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या नर्मदा मातेच्या मंदिराजवळ मुक्काम केला. मंदिराबाहेर शेडनेटच्या साहाय्याने काढलेले एक छोटे छप्पर होते. त्यात वीस-पंचवीस परिक्रमावासी राहू शकतील एवढी जागा होती. आलेल्या परिक्रमावासींना जेवण देण्यासाठी एक मैयाजी थांबल्या होत्या


निद्राधीन होण्यापूर्वी 

नेमके त्या दिवशी त्या परिसरातील लाईट गेली होती आणि परिक्रमावासींची संख्याही भरपूर होती. त्यांनी परिक्रमावासींमधील काही महिलांनी मदत केल्यास स्वयंपाक लवकर होईल आणि सर्वांना आराम मिळेल, असे सांगितले. पण कोणी पुढे येईना. तेवढ्यात गावातून दोन तरुण आले. मग काही परिक्रमावासी मदत करू लागले आणि खिचडीची भोजनप्रसादी तयार झाली. ती घेऊन आम्ही सर्व निद्रादेवीच्या अधीन झालो. कडाक्याची थंडी, डोक्यावर जेमतेम शेडनेटचे छप्पर, बाजूच्या फटीतून येणारा गार वाऱ्याचा झोत अशा परिस्थितीतही आम्हाला शांत झोप लागली. कोणताही त्रास झाला नाही.

परिक्रमेचा पुढचा टप्पा पुढील भागात. हा भाग कसा वाटला, ते जरूर कळवा.

 

 Marathi literature, Narmada Parikrama, spiritual journey, travelogue, personal narrative, divine connection, faith 

 #NarmadaParikrama #SpiritualJourney #MarathiLiterature #DivineGuidance #FaithAndDestiny #Pilgrimage #BajiraoPeshwa #Teliyabhattayan #ActOfKindness


-------------------------------

आधीचे लेख

नर्मदा परिक्रमा: निसर्ग, साहस आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_268.html

नर्मदा परिक्रमा : नर्मदे हर: एक आंतरिक आणि बाह्य प्रवास

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_517.html

नर्मदा परिक्रमा : चमत्कारांचा खजिना आणि एका दैवी प्रवासाची सुरुवात

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_243.html

नर्मदा परिक्रमा : आशीर्वाद आणि एक दैवी साखळी

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_418.html

नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरची पहिली रात्र : अनपेक्षित घटना आणि संघर्ष

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_459.html

नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वर: परिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_214.html

----------------------------------


नर्मदा परिक्रमा व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये सामील होण्यासाठी 

मा रेवा... जिचे पाणी नाही, तर प्रेम आहे.

मा नर्मदा... जिची वाळू नाही, तर कणकण चैतन्य आहे.

जिच्या परिक्रमेचा अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि तो फक्त परिक्रमावासीच समजू शकतात. ही परिक्रमा फक्त एक प्रवास नाही, तर एक अनुभूती आहे... एक साधना आहे... जेथे परिक्रमावासी आणि आई नर्मदा यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं.

तुम्हीही या दिव्य अनुभवाचे साक्षीदार आहात का?

या समूहात तुम्ही सहभागी होऊ शकता, जर...

·         तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असेल आणि तुमचा अनुभव इतरांसोबत वाटून घेण्याची तुमची इच्छा असेल.

·         तुम्ही नर्मदा परिक्रमा करण्याची योजना आखत असाल आणि त्यासाठी मार्गदर्शन, माहिती किंवा प्रेरणा शोधत असाल.

·         तुम्हाला नर्मदा खंडातील सेवाकार्यात (उदा. अन्नदान, आरोग्य सेवा, आश्रम व्यवस्थापन .) सहभागी होण्याची किंवा योगदान देण्याची इच्छा असेल.

·         तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांना नर्मदा नदी आणि तिच्या अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे.

हा समूह तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, कारण...

·         तुम्ही परिक्रमावासींचे अनुभव वाचू शकता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता किंवा तुमचे प्रश्न विचारू शकता.

·         तुम्ही परिक्रमेसाठी आवश्यक माहिती, साधने आणि मार्गदर्शन मिळवू शकता.

·         तुम्ही नर्मदा खंडातील सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी किंवा योगदान देण्यासाठी योग्य संधी शोधू शकता.

·         तुम्ही इतर परिक्रमावासी किंवा सेवाभावी व्यक्तींसोबत संवाद साधू शकता आणि एक सकारात्मक समुदाय तयार करू शकता.

या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आणि नर्मदा मातेच्या सेवेसाठी एकत्र येण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.

या पवित्र कार्यात सामील व्हा आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी हातभार लावा!

https://chat.whatsapp.com/Gnbvp5zPXXvER76ipmjhqi



६ नर्मदा परिक्रमा : रावेरखेडीकडे प्रस्थान आणि एक अनपेक्षित सहप्रवासी ६ नर्मदा परिक्रमा : रावेरखेडीकडे प्रस्थान आणि एक अनपेक्षित सहप्रवासी Reviewed by ANN news network on ९/०१/२०२५ ०५:२४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".