५ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वर: परिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण

 


ओंकारेश्वर: परिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण

मागील लेखात आपण पाहिल्याप्रमाणे, गावाहून वडीलधाऱ्यांची रीतसर परवानगी घेऊन मी नर्मदा परिक्रमेला जाण्यासाठी सज्ज झालो होतो. डिसेंबरला पुण्याहून खांडव्याकडे रवाना झालो आणि पहाटेच ओंकारेश्वरला पोहोचलो. मांधाता परिक्रमा पूर्ण करून मी रात्री आश्रमात परतलो, आणि थोड्याच वेळात रात्रीच्या भोजनाची वेळ झाली.

नवले सर, मी आणि आमच्या बाजूला उतरलेले पुणे परिसरातील आणखी काही परिक्रमावासी आम्ही भोजन करण्यासाठी गेलो. परिक्रमेच्या पहिल्या दिवसाचा प्रसाद घेतानाच, नवले सरांनी माझ्याकडे असलेल्या दोन बॅगा पाहिल्या. 'तुमच्याकडे फारच जास्त वजन आहे. ते कमी करण्याला पर्याय नाही. दोन बॅगा घेऊन चालणे फारच अवघड होईल. अगदी पहिल्या टप्प्यात, ओंकारेश्वरमधून बाहेर पडल्यावर मोरटक्क्याला जाईपर्यंत तुम्ही थकून जाल,' ते म्हणाले.

नर्मदा परिक्रमेला किती सामान न्यावे याची मला नेमकी कल्पना नव्हती. ऐकीव आणि वाचलेल्या माहितीवर आधारित मी तयारी केली होती. सुमारे पंचवीस किलो वजनाच्या दोन बॅगा, एक पाठीवरची सॅक आणि दुसरी एक एअरबॅग. त्यातील एअरबॅग तर फारच जड होती. माझ्या मनात एक विचार होता की, जिथे मुक्काम करू तिथे आपले भोजन आपणच तयार करू. म्हणून मी एक छोटे पातेले, त्याची वेळणी, मोठा चमचा आणि थोडे डाळ-तांदूळ वगैरे साहित्य सोबत घेतले होते. याशिवाय, माझ्याकडे असलेल्या काही आयुर्वेदिक औषधींच्या बाटल्याही मी सोबत घेतल्या होत्या, जेणेकरून मला किंवा माझ्या सहपरिक्रमावासींना गरज लागल्यास त्या उपयोगी पडतील. आता या सामानाचे काय करायचे याची चिंता मला लागली होती. हा विचार करता करताच केव्हातरी मला झोप लागली.

पहाटे लवकर मला जाग आली. नवले सरही जागे झाले होते. आम्ही मुखमार्जनादी प्रातर्विधी उरकले आणि ओंकारेश्वराच्या गोमुख घाटाकडे निघालो. तारीख होती डिसेंबर २०२४. सकाळची वेळ शांत होती, अजून बरेचसे ओंकारेश्वर साखरझोपेत होते. आश्रमापासून थोडे अंतर पुढे गेल्यावर मला एक महिला दिसली. ती बाजूच्या झोपडपट्टीत राहणारी असावी. मी तिला हाक मारली, 'मैयाजी, रुको.' आणि माझी बॅग खाली ठेवून त्यातील किराणा सामान बाहेर काढले आणि ते सर्व तिला देऊन टाकले. थोडे ओझे कमी झाले, पण तरीही बोजा जास्त होताच.


पहिल्या टप्प्यातील ’चायप्रसादी’

संकल्पाची पहाट आणि ओट्यांचे गूढ

आम्ही घाटावर पोहोचलो. रात्री नवले सरांनी संकल्पपूजा सांगणारे अनिलदास महाराज यांच्याशी संपर्क साधला होता, त्यामुळे आम्ही त्याबाबतीत निश्चिंत होतो. एकदा संकल्प उचलल्यावर पुन्हा आश्रमात परतायचे नसते, तिथूनच सरळ परिक्रमेला पुढे निघावे लागते. म्हणून आम्ही आमच्या बॅगा घेऊनच घाटावर आलो होतो. तिथे नुकतीच एक-दोन दुकाने उघडली होती. मला परिक्रमेसाठी आवश्यक असलेला दंड (काठी) आणि कमंडलू (पाण्यासाठीचा डबा) खरेदी करायचा होता. मी एका दुकानातून ते दोन्ही घेतले.

संकल्पपूजा करण्यापूर्वी क्षौरकर्म (मुंडण) करणे आवश्यक होते. पण केस कापणारा माणूस आलेला नव्हता. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर तो घाईघाईत आला आणि त्याने अक्षरशः म्हशी भादरतात त्याप्रमाणे आम्हा सर्वांची डोकी तासून टाकली. त्यानंतर आम्ही कडाक्याच्या थंडीत नर्मदेच्या जलात डुबकी मारली आणि परिक्रमेचा गणवेशपांढरी कोपरी आणि पंचानेसून अनिलदास महाराजांची वाट बघत बसलो.

थोड्या वेळाने ते आले. आम्ही साधारण पंधरा-वीस जण होतो. सर्वांना रांगेत बसवले गेले आणि संकल्पपूजा झाली. कन्यापूजनासाठी तिथे सात-आठ छोट्या कन्या आल्या होत्या. त्यांना यथाशक्ती खाऊ देऊन आम्ही निघण्यासाठी तयार झालो. त्या कन्याही निघून गेल्या. तेवढ्यात मी नवले सरांना थांबवून म्हटले, 'दोन मिनिटांत येतो.' आणि मी माझ्याकडे असलेल्या दोन ओट्या घेऊन त्या मातेला अर्पण करण्यासाठी घाटावरच्या पाण्याजवळ गेलो.

काही लोक पुढे निघून गेल्यामुळे घाट हळूहळू मोकळा होऊ लागला होता. मी पाण्याजवळ गेलो आणि पहिल्या पायरीवर उतरलो. मी पहिली ओटी काढली, तोच मागून एक आवाज आला, 'बाबाजी, ये मुझे दे दो.' मी मागे वळून पाहिले. तिथे एक दहा-अकरा वर्षांची छोटी मुलगी उभी होती. तिच्या अंगावर हिरवे कपडे होते आणि तिने लाल कुंकू लावले होते. मला तो शुभ शकुन वाटला. मी तिला म्हटले, 'मैया, जरा रुको, इसे जलस्पर्श करके तुम्हे देता हूं.' मी नर्मदेच्या पाण्याला स्पर्श करून ती ओटी तिच्या हातात ठेवली. तिने दोन्ही हात पुढे करून ती स्वीकारली.

त्यानंतर मी माझ्या पिशवीतून दुसरी ओटी काढली आणि तीही अर्पण करू लागलो. तेव्हा ती पुन्हा म्हणाली, 'बाबाजी, ये भी मुझे दे दो.' मी पुन्हा तसेच केले. जलाला स्पर्श करून ती ओटीही तिला दिली आणि हात जोडले.

 


सामानाचा त्याग आणि परिक्रमेचे पहिले पाऊल

मी वरती आलो. नवले सर माझी वाटच बघत उभे होते. आम्ही आमच्या बॅगा उचलल्या, दंड हातात घेतला आणि परिक्रमेच्या पहिल्या टप्प्याकडे निघालो. घाटावरून पन्नास-साठ पायऱ्या चढून परिक्रमा मार्गावर जावे लागते. त्या चढून आम्ही निघालो. माझ्याकडचे ओझे इतके जास्त होते की ते आता त्रास देऊ लागले होते.

साधारण चार-पाचशे मीटर दूर गेल्यावर एक आवाज आला, 'नर्मदे हर, बाबाजी, रुको, चाय पा लो.' एका चहाच्या टपरीवर एक बाबा उभे होते. त्यांनी आम्हाला थांबवले. नवले महाराजांना ते परिचित होते. (आता आम्ही अधिकृत परिक्रमावासी झालो होतो.) ते बाबा दक्षिण भारतातील होते आणि नर्मदा किनारी येऊन राहिले होते. ते परिक्रमेला जाणाऱ्या सर्वांना चहा पाजतात, अशी माहिती नवले महाराजांनी मला दिली.

नवले महाराज विसावा घेताना

चहा घेताना आमची पुन्हा वजनावर चर्चा झाली. नवले महाराज म्हणाले, 'वजन कमी करायलाच हवे.' आम्ही थोडे पुढे गेलो. तिथे एक महिला हातगाडी लावून चणे-फुटाणे विकत बसली होती. तिच्या बाजूलाच एका झाडाचा पार होता. त्या पारावर मी बॅग ठेवली आणि त्यातील पातेले, झाकण आणि आयुर्वेदिक औषधांच्या बाटल्या काढून तिला देऊन टाकल्या. थोडा भार कमी झाला, पण तरीही वजन जास्तच होते. शेवटी मी हातातला दंड खांद्यावर घेतला आणि त्याला बॅग अडकवून चालायला सुरुवात केली.

सुरुवातीचा काही टप्पा तसा चालायला अवघड होता. खाचखळग्यांतून, चढ-उतारावरून चालत आम्ही थोडे अंतर पार केले. जंगलात एका महाराजांची कुटी होती. त्यांनी 'नर्मदे हर' करत चहासाठी बोलावले. पुन्हा माझ्या सामानाची चर्चा सुरू झाली. ते महाराज म्हणाले, 'इतना ज्यादा सामान लेके कैसे चल पाओगे? कुछ तो सामान कम करो!'

आता काय कमी करता येईल याचा विचार करून, शेवटी मी जे कपडे अंगावर घालून आलो होतो, ते शर्ट आणि पॅन्ट तिथेच सोडून दिले. आता माझ्याकडे फक्त दोन परिक्रमेचे गणवेश, दोन पंचे, अंथरूण-पांघरूण आणि पूजेचे सामान उरले होते. या पूजेच्या सामानात नर्मदा पुराण, गजानन विजय ग्रंथ आणि इतर साहित्य असल्यामुळे त्याचा भार मोठा होता. पण ते सामान आता सोडणे शक्य नव्हते.

चहा घेऊन झाल्यावर आम्ही पुढे निघालो. पुढे पुन्हा एक आश्रम लागला. त्यांनी आम्हाला भोजनप्रसादीसाठी थांबवले. या सगळ्या गडबडीत एक तासभर गेला आणि आम्ही पुन्हा चालायला लागलो. आता जंगलातून बाहेर आलो होतो आणि नर्मदा नदीच्या खडकाळ किनाऱ्यावरून चालणे सुरू झाले होते.

ती कोण होती?

इतक्यात मला श्री. मैंद यांचा फोन आला. त्यांनी मला विचारले, 'काय घडले?' मी त्यांना सकाळी गोमुख घाटावर आल्यापासूनची सर्व माहिती सांगितली. हे ऐकून ते हसले आणि म्हणाले, "त्या मुलीला नमस्कार केलात का?" मी 'हात जोडले' असे सांगितले. ते पुन्हा हसले आणि म्हणाले, "पायाला हात लावून नमस्कार केलात का?" मी 'नाही' म्हटले.

ते म्हणाले, "अहो, प्रत्यक्ष मय्याने येऊन तुमच्याकडून ओट्या स्वीकारल्या, पण तुम्ही तिच्या चरणांना स्पर्श केला नाही!" तेव्हा माझ्या लक्षात आले, की अरे हो, खरे तर पायाला हात लावून नमस्कार करायला हवा होता. मी जसजसा विचार करत गेलो, तसतसे मला लक्षात आले की कन्यापूजेसाठी आलेल्या मुली कधीच निघून गेल्या होत्या. मी पायऱ्या उतरून शेवटच्या पायरीपर्यंत येईपर्यंत माझ्या मागे कोणीही नव्हते. अचानक ही मुलगी कुठून आली? शिवाय, ती कन्यापूजनासाठी आलेल्या मुलींपेक्षा अधिक तेजस्वी दिसत होती आणि तिचे कपडेही स्वच्छ होते. तिचे राहणीमान चांगले होते. हे सर्व लक्षात आल्यावर मला पश्चात्ताप होत होता, पण वेळ निघून गेली होती.

आमचे बोलणे होईपर्यंत नवले महाराज आणि आमच्याबरोबर असलेले इतर दोघेजण पुढे निघून गेले होते. मी मागे राहिलो. ते पुढे गेल्यावर मी रस्ता चुकलो आणि नर्मदेच्या पात्रातील दगड-गोट्यांवरून चालत राहिलो. खूप वेळाने नवले महाराजांचा मला फोन आला. ते म्हणाले, "कुठे आहात?" मी म्हटले, "चालतोय, रस्ता चुकल्यासारखं वाटतंय." त्यावर ते म्हणाले, "आम्ही आता मोरटक्क्याजवळ आलो आहोत, तुम्ही या."

मी संध्याकाळ होत होत मोरटक्क्याला पोहोचलो. त्या दिवशी आमचा मुक्काम तिथेच झाला. नर्मदा परिक्रमेतला हा पहिला मुक्काम. आत्तापर्यंतचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला, हे जरूर कळवा

Marathi literature, spiritual journey, travelogue, Narmada Parikrama, divine synchronicity, personal narrative, faith, pilgrimage 

 #NarmadaParikrama #SpiritualJourney #MarathiLiterature #DivineBlessings #FaithAndDestiny #Pilgrimage #Omkareshwar #NarmadaMaiya #LifeChangingJourney


मागील भाग वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा

नर्मदा परिक्रमा: निसर्ग, साहस आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_268.html

नर्मदा परिक्रमा : नर्मदे हर: एक आंतरिक आणि बाह्य प्रवास

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_517.html

नर्मदा परिक्रमा : चमत्कारांचा खजिना आणि एका दैवी प्रवासाची सुरुवात

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_243.html

नर्मदा परिक्रमा : आशीर्वाद आणि एक दैवी साखळी

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_418.html

नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वरची पहिली रात्र : अनपेक्षित घटना आणि संघर्ष

https://www.astranewsnetwork.in/2025/08/blog-post_459.html


नर्मदा परिक्रमा व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये सामील होण्यासाठी 

मा रेवा... जिचे पाणी नाही, तर प्रेम आहे.

मा नर्मदा... जिची वाळू नाही, तर कणकण चैतन्य आहे.

जिच्या परिक्रमेचा अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि तो फक्त परिक्रमावासीच समजू शकतात. ही परिक्रमा फक्त एक प्रवास नाही, तर एक अनुभूती आहे... एक साधना आहे... जेथे परिक्रमावासी आणि आई नर्मदा यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं.

तुम्हीही या दिव्य अनुभवाचे साक्षीदार आहात का?

या समूहात तुम्ही सहभागी होऊ शकता, जर...

·         तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असेल आणि तुमचा अनुभव इतरांसोबत वाटून घेण्याची तुमची इच्छा असेल.

·         तुम्ही नर्मदा परिक्रमा करण्याची योजना आखत असाल आणि त्यासाठी मार्गदर्शन, माहिती किंवा प्रेरणा शोधत असाल.

·         तुम्हाला नर्मदा खंडातील सेवाकार्यात (उदा. अन्नदान, आरोग्य सेवा, आश्रम व्यवस्थापन .) सहभागी होण्याची किंवा योगदान देण्याची इच्छा असेल.

·         तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांना नर्मदा नदी आणि तिच्या अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे.

हा समूह तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, कारण...

·         तुम्ही परिक्रमावासींचे अनुभव वाचू शकता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता किंवा तुमचे प्रश्न विचारू शकता.

·         तुम्ही परिक्रमेसाठी आवश्यक माहिती, साधने आणि मार्गदर्शन मिळवू शकता.

·         तुम्ही नर्मदा खंडातील सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी किंवा योगदान देण्यासाठी योग्य संधी शोधू शकता.

·         तुम्ही इतर परिक्रमावासी किंवा सेवाभावी व्यक्तींसोबत संवाद साधू शकता आणि एक सकारात्मक समुदाय तयार करू शकता.

या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आणि नर्मदा मातेच्या सेवेसाठी एकत्र येण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.

या पवित्र कार्यात सामील व्हा आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी हातभार लावा!

https://chat.whatsapp.com/Gnbvp5zPXXvER76ipmjhqi

५ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वर: परिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण ५ नर्मदा परिक्रमा : ओंकारेश्वर: परिक्रमेचा पहिला दिवस आणि त्यागाची पहिली शिकवण Reviewed by ANN news network on ८/३१/२०२५ ०५:०९:०० PM Rating: 5

1 टिप्पणी:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".