ओंकारेश्वरची पहिली रात्र: अनपेक्षित घटना आणि संघर्ष
मागील
भागात आपण पाहिल्याप्रमाणे, गावी
जाऊन वडीलधाऱ्या व्यक्तींची आणि
कुलदैवताची परवानगी घेऊन मी नर्मदा
परिक्रमेसाठी सज्ज झालो होतो.
१ डिसेंबरला पुण्याहून खांडव्याकडे रवाना
झालो. पहाटेच खांडव्याला पोहोचल्यानंतर ओंकारेश्वरला जाणाऱ्या एका
खाजगी बसमध्ये बसलो.
त्या
बसमध्ये माझ्यासोबत आणखी दोन व्यक्ती होत्या,
ज्यांचा पुढे माझ्या प्रवासावर मोठा
प्रभाव पडणार होता.
माझ्या मागे दोन-तीन सीट सोडून
पुण्यातून रेल्वेने आलेले एक वृद्ध
गृहस्थ बसले होते.
तेवढ्यात निळ्या जॅकेटमध्ये एक
माणूस पिशवी घेऊन
धडपडत गाडीत चढला.
आधी तो ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बसला,
पण नंतर त्याला
काय वाटले कोणास
ठाऊक, तो दरवाजाजवळच्या सीटवर
येऊन बसला. कोण
होता तो? आणि
त्याचा उल्लेख मी
का करत आहे?
हे तुम्हाला पुढे
कळेलच.
जवळपास
दीड-दोन तासांनी आम्ही
ओंकारेश्वरला पोहोचलो. बस स्टँडपासून मी
उतरणार असलेल्या गजानन
महाराज आश्रमाचे अंतर
सुमारे दोन-तीन
किलोमीटर होते. सकाळची वेळ
असल्याने मी चालतच निघालो.
माझ्यामागे बसलेले ते गृहस्थ
चटकन चालत पुढे
निघून गेले. माझ्या
हातातील जड बॅग सांभाळत मी
अर्ध्या-पाऊण तासात आश्रमात पोहोचलो.
आश्रमात नावनोंदणी करून
मी परिक्रमावासींच्या हॉलमध्ये गेलो
आणि सामान ठेवले.
तिथे मला आश्चर्याचा धक्का
बसला. माझ्यासोबत बसमधून
आलेले आणि पुण्याहून रेल्वेने आलेले
ते गृहस्थ माझ्या
शेजारीच उतरले होते. त्यावेळी आमच्यात काही
बोलणे झाले नाही,
कारण मी लगेच
स्नान करून गजानन
महाराजांचे दर्शन घेऊन गोमुख
घाटावर नर्मदा किनारी
गेलो. तिथून ओंकारेश्वराचे दर्शन
घेण्यासाठी गेलो.
मंदिरातला वाद आणि अहंकाराचा संघर्ष
ओंकारेश्वरच्या दर्शनाच्या रांगेत
उभा असताना, एक
अनपेक्षित प्रसंग घडला. माझ्यामागे मोठा
गलका ऐकू आला.
"चलो
हटो, महाराजजी को
जाने दो!" मागे पाहिले
तर पांढऱ्या वेशातील एक
संन्यासी चालत होते. त्यांचे शिष्य
रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येकाला अक्षरशः कॉलर
धरून बाजूला करत
होते.
ते
माझ्यापर्यंत आले. एका शिष्याने माझीही
कॉलर खेचली. मी
बाजूच्या लोखंडी रेलिंगला घट्ट
पकडून उभा राहिलो.
त्या शिष्याने पुन्हा
जोराने खेचले आणि
माझ्यावर खेकसला, "सुनाई नही देता
क्या, बाजू हटो!"
मी
शांतपणे म्हणालो, "मै कतार मे
खडा हूं।"
हे
ऐकून तो शिष्य
आणि त्याचे दोन
सहकारी माझ्या अंगावर
धावून आले. पण
त्यांच्या आणि माझ्या मध्ये
त्यांचे महाराजजी उभे असल्यामुळे त्यांना अडचण
झाली. ते हुज्जत
घालण्याचा प्रयत्न करू लागले.
मी
त्यांना ठामपणे म्हटले, "भगवान के द्वार पर सब समान होते है, चाहे आम आदमी हो या साधु-संन्यासी।"
माझ्या
या बोलण्यावर ते
अधिकच खवळले. तेव्हा
मी थेट त्या
संन्याशालाच जाब विचारला, "ये है
आपके शिष्य? ऐसे
ही संस्कार दिये
है आपने अपने
शिष्यं को ? भगवान
के द्वार पर
हाथापाई करने के?"
हे
ऐकताच त्या संन्याशाचे जणू
अवसान गळाले. त्याच्या शिकवणीवरच थेट
प्रहार झाल्यामुळे तो
विचारात पडला. त्याने तात्काळ आपल्या
शिष्यांवर खेकसून त्यांना गप्प
केले. सुमारे दहा-पंधरा मिनिटे शांतता
झाल्यावर तो माझ्यासमोर हात
जोडून विनवणीच्या स्वरात
म्हणाला, "हमे जाने दिजिये। इस
भीड में दम
घुट के हम
मर जायेंगे।" मग मी
त्यांना पुढे जायला वाट
दिली. पण तोपर्यंत रांगेत
उभ्या असलेल्या लोकांमध्ये "बरे झाले,
अद्दल घडवली" अशी कुजबुज
सुरू झाली होती.
मांधाता परिक्रमा: गूढ रात्रीची गूढ वाटचाल
सायंकाळी पाच-सव्वापाचच्या सुमारास मी दर्शन घेऊन
आश्रमात परतलो. दुसऱ्या दिवशी
मांधाता परिक्रमा करून तिसऱ्या दिवशी,
म्हणजेच ४ डिसेंबरला, मूळ
परिक्रमा सुरू करायचा माझा
विचार होता. आश्रमात परत
आल्यावर माझ्या शेजारी असलेल्या त्या
पुण्याच्या गृहस्थांशी गप्पा सुरू झाल्या.
त्यांनी त्यांचे नाव नवले असल्याचे आणि
ते माध्यमिक शाळेतून मुख्याध्यापक म्हणून
सेवानिवृत्त झाल्याचे सांगितले. त्यांनी यापूर्वी तीन परिक्रमा केल्या
होत्या आणि ही
त्यांची चौथी परिक्रमा होती.
मीही पुण्याकडील म्हटल्यावर आमच्यात चांगला
संवाद सुरू झाला.
"तुम्ही मांधाता परिक्रमा केली
का?" नवले सरांनी विचारले.
मी
'नाही, उद्या करण्याचा विचार
आहे' असे सांगितले.
तोपर्यंत संध्याकाळ होत
आली होती. ते
म्हणाले, "उद्या कशाला? आताच
जा. आज दीड
तासात तुमची मांधाता परिक्रमा पूर्ण
होईल. उद्या सकाळी
आपल्याला परिक्रमेसाठी निघायचे आहे."
टोपी घातलेले, डावीकडील नवले सर
मी
त्यांचे ऐकले आणि मांधाता परिक्रमेला निघालो.
थंडीचे दिवस असल्यामुळे ओंकारेश्वर मंदिरापासून परिक्रमा सुरू
करतानाच अंधार पडू लागला.
साधारण एक किलोमीटर गेल्यावर मिट्ट
काळोख पडला. परिक्रमा मार्गावर असलेले
मिणमिणते पथदिवे जेमतेम वाट
दाखवत होते. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते.
अशा गूढ वातावरणाची सवय
नसलेल्या माणसाची या वेळी इथे
आल्यावर नक्कीच घाबरगुंडी उडाली
असती.
मी
थोडा पुढे गेल्यावर समोरून
कोणीतरी येत असल्याचे जाणवले.
एका पथदिव्याखाली आल्यावर त्याची
आकृती स्पष्ट दिसली.
तो वीस-बावीशीतील एक
तरुण होता. मला
दुरून पाहिल्यावर तो
जागेवरच थबकला. त्याने इकडे-तिकडे पाहिले. बहुधा
तो बाजूला होण्यासाठी जागा
शोधत असावा. मी
माझ्या गतीने त्याच्याकडे चालत
होतो. एकदम तो
जागेवरच थिजल्यासारखा झाला. मी जवळ
येताच 'रामराम' म्हणाला. एव्हाना माझ्या
लक्षात आले होते
की, हा तरुण
मला "अमानवी शक्ती” समजला
आहे आणि त्याची
चांगलीच गाळण उडाली आहे.
मी त्याला क्रॉस
करून पुढे जाताच
त्याने अक्षरशः धूम
ठोकली. मला हसू
आवरले नाही.
मी
चालत चालत कावेरी
संगमापर्यंत आलो. माझी पहिलीच
परिक्रमा असल्यामुळे संगम या भागात
आहे एवढेच मला
माहीत होते, पण
तो नेमका कुठे
आहे हे कळले
नव्हते. त्या भागात
एकच पथदिवा चालू
असल्यामुळे जेमतेम प्रकाश होता.
मी माझ्या मोबाईलची बॅटरी
चालू केली आणि
चालू लागलो. नकळत
मी ऋणमुक्तेश्वराच्या मंदिरावरून संगमाकडे निघालो.
रातकिड्यांची किरकिर, दूरवर एखाद्या कुत्र्याचे भुंकणे
आणि पाण्याचा खळाळणारा आवाज
यामुळे वातावरणातील गूढता
अधिक भीतीदायक होती.
पाण्याचा आवाज
वाढल्यावर आपण रस्ता चुकलो
आहोत हे मला
जाणवले. मोबाईलच्या प्रकाशात संगमानजीकच्या कालभैरव मंदिराचा फलक
दिसला. तिथे कोणीही
नव्हते. पण एका
टेबलावर एक भलामोठा काळा
कुत्रा आरामात पसरला
होता. एवढा मोठा
कुत्रा मी आयुष्यात क्वचितच पाहिला
असेल. त्याने पडल्या
पडल्याच माझ्याकडे पाहिले पण, मान वर
करण्याचेही कष्ट घेतले नाही.
मी
तिथून परत फिरलो.
माझ्या मागे सुमारे
५०-६० पावलांवर एक
काळ्या कपड्यांमध्ये अघोरीसारखा दिसणारा साधू
येत होता. त्याच्या चालण्याच्या स्थितीवरून त्याची
ब्रह्मानंदी टाळी लागली असल्याचे स्पष्ट
दिसत होते. तरीही
त्याने अडखळत का
होईना मला 'नर्मदे हर' म्हटले.
मी
ऋणमुक्तेश्वरापर्यंत
परत येऊन पुढचा
रस्ता धरला. या
मार्गावर पुढे काही झोपडीवजा घरे
आणि एक-दोन
आश्रम लागले, पण
तिथे सामसूम होती.
अशा सस्पेन्स-थ्रिलर
चित्रपटात शोभेल अशा वातावरणात दीड
तास चालून मी
मांधाता परिक्रमा पूर्ण करून आश्रमात परत
आलो.
हा
लेख तुम्हाला कसा
वाटला, हे नक्की
कळवा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: