नर्मदे हर: एक आंतरिक आणि बाह्य प्रवास
'नर्मदे हर' - हा केवळ एक शब्द नाही, तर तो एक अनुभव आहे, एक आंतरिक हाक आहे, आणि एका प्रवासाचा प्रारंभ आहे. सुमारे दोन दशकांपूर्वी, साधारण २०१०-२०११ साली, हा शब्द माझ्या कानावर पडला. तेव्हा नर्मदा परिक्रमेविषयी फारशी माहिती सर्वसामान्यांना नव्हती. रत्नागिरीतील गुणे नावाच्या एका इंजिनियरने परिक्रमा करून आल्यावर पुस्तक लिहीले आहे ही ऐकीव माहिती, आणि नंतर जगन्नाथ कुंटे यांच्या 'नर्मदे हर हर' या पुस्तकातून या विषयाची अस्पष्ट ओळख झाली. कुंटेंच्या पुस्तकाची काही पाने जरी चाळली असली, तरी ते पूर्ण वाचणे राहूनच गेले.
खऱ्या अर्थाने या प्रवासाची बीजे मनात रुजली ती एका फोरमवर प्रतिभाताई चितळे यांच्या परिक्रमेविषयीचा लेख वाचल्यानंतर. त्या लेखामुळे माझ्या मनात नर्मदा परिक्रमेची उत्कंठा जागृत झाली. त्या क्षणीच मी प्रतिभाताईंचे चिरंजीव विश्राम चितळे यांना संपर्क साधला आणि त्यांच्याकडून त्यांच्या माता-पित्यांनी केलेल्या परिक्रमेच्या सीडीज मागवून घेतल्या. त्या सीडीज पाहताना मी अक्षरशः झपाटून गेलो.
त्या क्षणीच आयुष्यात एकदा तरी ही परिक्रमा करायचीच, असा निश्चय माझ्या मनाशी केला. परंतु, जबाबदाऱ्यांमुळे तो विचार मागे पडला. नियतीने माझ्यासाठी आणखी काही योजना आखल्या होत्या.
नियतीचे संकेत
काही वर्षांनंतर, माझ्या मातु:श्री आजारी होत्या त्या काळात नेहमीप्रमाणे पुण्याला बाजीराव रस्त्यावर फेरफटका मारत असताना एका जुन्या पुस्तकांच्या दुकानात, गोडबोले नावाच्या विक्रेत्याकडून मला बिडकर महाराजांचे सुमारे शंभर वर्षांपूर्वीचे जीर्ण झालेले चरित्र मिळाले. मातु:श्रींना वाचायला आवडेल म्हणून ते मी घरी आणले. त्या पुस्तकातील प्रत्येक पान हाताळताना ते कधीही तुटू शकते अशी अवस्था होती, प त्याच पुस्तकात नर्मदा परिक्रमेचा संदर्भ आला आणि माझ्या सुप्त विचाराने पुन्हा एकदा उचल खाल्ली. तरीही, प्रत्यक्ष परिक्रमेला जाणे शक्य झाले नाही.
२०२३ च्या अखेरीस, तो विचार पुन्हा मनात घोळू लागला आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये, कोणत्याही परिस्थितीत परिक्रमेला जायचेच, असे मी मनाशी पक्के केले. परंतु, हा केवळ माझ्या इच्छेचा भाग नव्हता. या प्रवासाला एक दैवी स्पर्श होता, ज्याची सुरुवात ऑक्टोबर २०२४ मध्येच झाली.
एकदा नाशिक-मनमाड रस्त्याने जाताना अचानक रस्त्यावर एक जुना फलक दिसला - 'स्वामी समर्थांचा पुरातन मठ'. सकाळची वेळ होती आणि माझ्याकडे पुरेसा वेळही होता. माझे पाय आपसूकच त्या मठाच्या दिशेने वळले. समोरून वाहणारी नदी, त्यावरचा छोटासा बंधारा, तलावासारखे साचलेले पाणी आणि काठावरचा शांत मठ—असे ते रमणीय वातावरण होते. दर्शन घेऊन दहा-पंधरा मिनिटे तेथे बसल्यानंतर मी परत निघालो. सहज म्हणून मी तिथले काही फोटो माझे मित्र शिरोडकर यांना व्हॉट्सॲपवर पाठवले आणि कळवले की आज मी एका पुरातन मठाला भेट दिली.
पुढच्या दहा-पंधरा
मिनिटांत त्यांचा
मेसेज आला, "आपल्याला
त्या मठात जायचंय.
मी तिकीट बुक
केलंय. तुम्ही अमुक दिवशी
पनवेल स्टेशनवर या."
ते कोकणातून येणार
होते आणि मी
पुण्यातून निघणार होतो. ठरल्याप्रमाणे
आम्ही पनवेलमध्ये भेटलो.
आम्ही रेल्वेने नाशिकला
उतरलो आणि पहाटेच
त्र्यंबकेश्वर गाठले. स्नान आटोपून
मंदिरात गेलो. योगायोगाने
त्या दिवशी मंदिरात
गर्दी नव्हती. आम्ही
आरामात दर्शन घेतले. त्यानंतर
नील पर्वतावर माता
नीलांबिकेचे दर्शन घेतले आणि
पुन्हा नाशिकमध्ये आलो. बसस्थानकात आल्यावर
मी लघुशंकेसाठी गेलो जाताना शिरोडकर यांना सांगून गेलो की, शिर्डीकडे जाणारी गाडी आली
तर त्या गाडीने आपल्याला जायचे आहे. मी लघुशंकेला गेलो असताना एक बस आली. त्यात शिरोडकर
घाईने बसले बसायला जागा मिळाली.मी ही धावत बसमध्ये येऊन बसलो. बसण्यापूर्वी बसच्या
मार्गाची खात्री करून घेणे राहून गेले. बस सुटली कंडक्टर तिकीट देण्यासाठी आला तेव्हा
कळले की, ही बस त्या मार्गाने नव्हे तर अन्य मार्गाने शिर्डीला जाते. म्हटले चला आज
साईबाबांचे बोलावणे दिसतेय. आम्ही त्या बसने शिर्डीला पोहोचलो. लॊजवर सामान टाकले आणि
दर्शनाला गेलो. अगदी आरामात दर्शन झाले. दुसरया दिवशी सकाळीच स्नान आटोपून मंदिरात
दर्शनाला गेलो तेव्हाही तोच प्रकार अगदी आरामात दर्शन झाले. शिरोडकर म्हणालेही आजवर
शिर्डीतील गर्दीबद्दल ऐकून कधीही शिर्डीत दर्शनाला आलो नव्हतो. पण, इथे तर उलटा प्रकार
दिसतोय. त्यानंतर आम्ही शनिशिंगणापूरला जाऊन शिर्डीत परत आलो आणि एसटी पकडून
त्या मठापर्यंत पोहोचलो.
दुपारचे साडेचार वाजले होते. मठाचे व्यवस्थापक महाराज बाहेर खुर्ची टाकून बसले होते. दर्शन घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना मठाबद्दल अधिक माहिती विचारली. मला केवळ लेखनासाठी माहिती हवी होती. पण त्यांनी सांगितले, "हा स्वामी समर्थांचे शिष्य आनंदनाथ महाराज यांचा मठ आहे." त्यांनी आम्हाला ती विहीर दाखवली, जी स्वामींनी दुष्काळ दूर करण्यासाठी तयार केली होती. त्यांनी मुंबईतील मठाशी संबंधित व्यक्तीचा नंबरही दिला.
मी त्यांना फोन करून सर्व हकीकत सांगितली. त्यांनी माझे नाव विचारले आणि 'तुम्ही कोकणातील आहात का?' असे विचारले. नंतर ते म्हणाले, "तुम्ही इथे स्वतःहून आलेले नाहीत, तुम्हाला इथे बोलावले गेले आहे. महाराजांच्या मातु:श्रींचे माहेर तुमच्या घराण्यातील आहे. त्या तुमच्या आडनावाच्या माहेरवाशीण होत्या." हे ऐकून मी थक्क झालो. माझ्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले.
पुण्यात परत आल्यानंतर माझ्या डोक्यात नर्मदा परिक्रमेचे वारे पुन्हा एकदा वेगाने घुमू लागले. पुढील घटनाक्रम पुढच्या लेखात.
हा लेख कसा वाटला, हे जरूर कळवा.
नर्मदा परिक्रमा व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये सामील होण्यासाठी
मा रेवा... जिचे पाणी नाही, तर प्रेम आहे.
मा नर्मदा... जिची वाळू नाही, तर कणकण चैतन्य आहे.
जिच्या परिक्रमेचा अनुभव शब्दबद्ध करणे अशक्य आहे आणि तो फक्त परिक्रमावासीच समजू शकतात. ही परिक्रमा फक्त एक प्रवास नाही, तर एक अनुभूती आहे... एक साधना आहे... जेथे परिक्रमावासी आणि आई नर्मदा यांच्यातील नातं अधिक घट्ट होतं.
तुम्हीही या दिव्य अनुभवाचे साक्षीदार आहात का?
या समूहात तुम्ही सहभागी होऊ शकता, जर...
· तुम्ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असेल आणि तुमचा अनुभव इतरांसोबत वाटून घेण्याची तुमची इच्छा असेल.
· तुम्ही नर्मदा परिक्रमा करण्याची योजना आखत असाल आणि त्यासाठी मार्गदर्शन, माहिती किंवा प्रेरणा शोधत असाल.
· तुम्हाला नर्मदा खंडातील सेवाकार्यात (उदा. अन्नदान, आरोग्य सेवा, आश्रम व्यवस्थापन इ.) सहभागी होण्याची किंवा योगदान देण्याची इच्छा असेल.
·
तुम्ही असे व्यक्ती असाल ज्यांना नर्मदा नदी आणि तिच्या अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्वाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे.
हा समूह तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, कारण...
· तुम्ही परिक्रमावासींचे अनुभव वाचू शकता, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता किंवा तुमचे प्रश्न विचारू शकता.
· तुम्ही परिक्रमेसाठी आवश्यक माहिती, साधने आणि मार्गदर्शन मिळवू शकता.
· तुम्ही नर्मदा खंडातील सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी किंवा योगदान देण्यासाठी योग्य संधी शोधू शकता.
· तुम्ही इतर परिक्रमावासी किंवा सेवाभावी व्यक्तींसोबत संवाद साधू शकता आणि एक सकारात्मक समुदाय तयार करू शकता.
या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आणि नर्मदा मातेच्या सेवेसाठी एकत्र येण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.
या पवित्र कार्यात सामील व्हा आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी हातभार लावा!
https://chat.whatsapp.com/Gnbvp5zPXXvER76ipmjhqi

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: