पिंपरी, दि. ९ ऑगस्ट २०२५: क्रांतीदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील हुतात्मा चापेकर बंधूंच्या समूह शिल्पास, चिंचवड स्टेशन येथील थोर क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यांना, तसेच दापोडी येथील शहीद भगतसिंग आणि शहीद नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महापालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी माजी नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, उप आयुक्त सचिन पवार, क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते आसाराम कसबे यांच्यासह विविध विभागांतील कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात पिंपरी-चिंचवड शहराचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान आहे. शहरातील तसेच देशातील ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिक आणि वीर जवानांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. चिंचवड येथील दामोदर हरी चापेकर यांनी त्यांचे बंधू बाळकृष्ण आणि वासुदेव यांच्यासह पुण्यातील रॅन्ड या जुलमी इंग्रज अधिकाऱ्याची हत्या करून देशाच्या क्रांतीच्या इतिहासातील मशाल अधिक प्रज्वलित केली होती. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी देशासाठी अनेक क्रांतिकारक तयार केले, तर शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या बलिदानामुळे अनेक स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा मिळाली. हुतात्मा नारायण दाभाडे हे देखील स्वातंत्र्य लढ्यात शहीद झाले होते.
या अभिवादन कार्यक्रमास शहीद नारायण दाभाडे यांचे नातू विजय दाभाडे हे देखील उपस्थित होते.
Krantidin, Pimpri Chinchwad, Chapekar Bandhu, Lahuji Vastad Salve, Vasudev Balwant Phadke, Martyrs.
#Krantidin #PimpriChinchwad #Martyrs #FreedomFighters #ChapekarBrothers #LahujiSalave

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: