आळंदी: महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे चौथे राज्यस्तरीय महासंमेलन आळंदी येथे मोठ्या उत्साहात झाले. या संमेलनात योगशिक्षकांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ व्हावी यासाठी विविध विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात कैवल्यधाम योग महाविद्यालयाचे प्रिन्सिपल डॉ. शरदचंद्र भालेकर , द लोणावळा इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. मन्मथ घरोटे , भारतीय संस्कृती दर्शनचे संचालक डॉ. सुश्रुत सरदेशमुख , तसेच प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ आणि योगाभ्यासी डॉ. विश्वास येवले यांनी दर्जेदार व्याख्याने सादर केली. याशिवाय, योगी खेळ आणि योग संगीत रजनीसारख्या करमणुकीच्या कार्यक्रमांनी उपस्थितांचे मन जिंकले.
संमेलनात महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोज निलपवार यांनी योगशिक्षकांसाठी संघ कशा प्रकारे कार्य करतो यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, "हा संघ कोणाच्याही मालकीचा नसून प्रत्येक योगशिक्षकाचा आहे. येथे कोणतेही अधिकारी किंवा पद धारण करणारे नसून सर्वजण समान आहेत आणि प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे."
संमेलनाचे प्रमुख पाहुणे डॉ. शरदचंद्र भालेकर यांनी "योगशिक्षकांनी एकत्र येणे का गरजेचे आहे," यावर भर दिला. द लोणावळा इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. मन्मथ घरोटे यांनी "समाजाच्या स्वास्थ्यासाठी योगशिक्षकांची एकजूट महत्त्वाची" असल्याचे सांगितले. याशिवाय, डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी योगशिक्षकांच्या १२ मागण्यांवर सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
संमेलनादरम्यान ओमानंद स्वामी आणि गेठे महाराज यांनी उपस्थितांना आशीर्वाद दिला. यावेळी कुणाल महाजन लिखित 'योग गीता' या पुस्तकाचे प्रकाशन तसेच संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला श्रीमती इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन , पद्मश्री डॉ. विजय भटकर , बेलराईज इंडस्ट्रीजच्या डायरेक्टर सुप्रिया बडवे यांचे विशेष सहकार्य लाभले.
नव्या नेमणुका जाहीर
कार्यक्रमात प्रसाद कुलकर्णी यांची राज्य कार्यकारी अध्यक्ष म्हणून आणि संतोष खरटमल यांची राज्य कोषाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली.
स्पर्धा आणि सन्मान
या संमेलनादरम्यान आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय योग क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मनाली देव आणि राहुल येवला यांनी विशेष योगदान दिले.
कार्यक्रमाचे आयोजन आणि व्यवस्थापनात प्रा. सदानंद वाली, पुणे जिल्हाध्यक्ष सौ. चंद्रज्योती दळवी, उपाध्यक्ष सारिका काकडे, सचिव आरुषी शिंगोटे, कोषाध्यक्ष आश्लेषा मोहिते, कार्यकारी सचिव तानाजी पाटील, उज्वला गायकवाड आणि सोशल मीडिया प्रभारी राहुल सांडभोर यांनी मोलाची भूमिका बजावली.
योगशिक्षकांसाठी हा महासंमेलन प्रेरणादायी ठरला आणि योगशिक्षणाच्या प्रचारासाठी नवा अध्याय उघडला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: