कर्तव्यनिष्ठ पोलिसांचा सन्मान; धाडसी कामगिरीबद्दल १० हजारांचे बक्षीस जाहीर
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशनच्या बीट मार्शलवरील पोलीस अंमलदार किरण पवार यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा सन्मान केला असून, प्रत्येकी १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
ही घटना ११ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. पोलीस अंमलदार किरण पवार आणि राहुल उन्हाळे हे सावरकर चौकातून मित्रमंडळ चौकाकडे जात असताना त्यांना कॅनॉलच्या संरक्षक जाळीच्या कठड्यावर एक महिला उभी असल्याचे दिसले. लोक तिला बाहेर येण्यास सांगत होते, पण त्याचवेळी तिने कॅनॉलच्या पूर्ण क्षमतेने वाहणाऱ्या पाण्यात उडी मारली.
किरण पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता कॅनॉलमध्ये उडी घेतली आणि बुडणाऱ्या महिलेला बाहेर काढले. त्यावेळी राहुल उन्हाळे यांनीही त्यांना मदत केली. त्यानंतर महिलेचे मित्र आणि नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आता तिची प्रकृती स्थिर आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन्ही अंमलदारांचा सन्मान केला. नागरिकांनीही त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन केले आहे.
Pune, Police, Rescue, Suicide Attempt, Heroic Act, Beat Marshal, Parvati Police Station
#PunePolice #PoliceHero #Rescue #ParvatiPolice #SuicideAttempt #GoodWork #MaharashtraPolice #KiranPawar #PuneNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: