विठ्ठल ममताबादे
उरण : अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबतच वीज हीदेखील अत्यावश्यक सेवा बनली आहे. आजच्या काळात इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर अवलंबून असलेले जीवन वीजेविना ठप्प पडते. टीव्ही, मोबाईल, कुलर, एसी, फ्रीज आणि इलेक्ट्रॉनिक वाहने वीजेशिवाय सुरू होऊच शकत नाहीत. दिवसेंदिवस विजेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढत असतानाही उरण शहरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा सुरळीत नाही.
उरण शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून दररोज पहाटे वीजपुरवठा खंडित होत आहे. पहाटे ४ वाजता किंवा ५ वाजता वीज गेल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो आहे. घरातील टीव्ही, फ्रीज, कुलर, एसी यांसारखी उपकरणे सतत वीज खंडित होत असल्यामुळे बिघडत असून, नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत आहे.
दररोज वीज बंद होण्यामुळे उरणमधील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ग्राहकांकडून वेळेत वीजबिल वसूल केले जाते; मात्र अखंडीत वीजपुरवठा देण्यात महावितरण अपयशी ठरल्याचा आरोप नागरिक करत आहेत. वीजपुरवठा खंडित होत राहिल्यामुळे नागरिक हैराण झाले असून, सततची वीज समस्या त्यांच्या आरोग्यावरही परिणाम करत आहे.
उरण महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संदीप चाटे यांनी सांगितले की, "सब स्टेशनमधील रिलेचा प्रॉब्लेम आणि तांत्रिक कारणांमुळे वीज खंडित होत होती. आता ही सर्व कामे पूर्ण करण्यात आली असून पुढील काळात नागरिकांना त्रास होणार नाही. कुठेही बिघाड झाल्यास त्वरित उपाययोजना केल्या जात आहेत."
उरणमधील नागरिक शुभम उरणकर यांनी सांगितले, "दररोज पहाटे वीज घालवल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. महावितरणने नियमित व अखंडीत वीज पुरवठा करणे गरजेचे आहे."
उरणमधील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने योग्य पावले उचलण्याची गरज आहे. वीज ही फक्त सेवा नसून आता जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. त्यामुळे महावितरणने नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: