‘ब्राह्मण सेवा मंडळा’च्या शतकमहोत्सवी गणेशोत्सवात मुक्ता बर्वे, संकर्षण-स्पृहा आणि वंदना गुप्ते यांची विशेष उपस्थिती
‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ आणि ‘हसले मनी चांदणे’ यांसारखे विशेष कार्यक्रम आकर्षण
धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांसह गणेशोत्सव साजरामुंबई, (सांस्कृतिक प्रतिनिधी): यंदाचा गणेशोत्सव संस्मरणीय बनवण्यासाठी ‘ब्राह्मण सेवा मंडळा’ने आपल्या शतकमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे, संकर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशी यांच्या सादरीकरणासह अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रम होणार आहेत.
या महोत्सवाचे औचित्य साधत, पु.ल. देशपांडे आणि सुनीताबाई यांच्या जीवन-प्रवासावर आधारित ‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ हा काव्यमय नाट्यप्रयोग अभिनेत्री मुक्ता बर्वे सादर करणार आहेत. हा कार्यक्रम २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. तसेच, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी ‘संकर्षण via स्पृहा’ या साहित्य-मनोरंजनाच्या कार्यक्रमातून कविता, गाणी आणि गप्पांची मैफील जमवणार आहेत. हा कार्यक्रम १ सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे.
या व्यतिरिक्त पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून, त्यांच्या सुमधुर गीतांवर आधारित ‘हसले मनी चांदणे’ हा कार्यक्रम सादर होईल. यामध्ये त्यांच्या कन्या अभिनेत्री वंदना गुप्ते, राणी वर्मा आणि इतर कलाकार उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम ३ सप्टेंबर रोजी होणार आहे. यासोबतच निवृत्त लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांचे ‘ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’ या विषयावर व्याख्यान (३० ऑगस्ट), हस्तरेषांवर आधारित ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’ हा कार्यक्रम (३१ ऑगस्ट) आणि वारकरी कीर्तन (५ सप्टेंबर) यांसारखे कार्यक्रमही होणार आहेत.
हे सर्व कार्यक्रम ‘ब्राह्मण सेवा मंडळ’, भवानी शंकर रोड, दादर (प), येथे विनामूल्य पाहता येणार आहेत. मंडळाचा पहिला गणेशोत्सव १९२६ साली साजरा झाला होता, यंदा त्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.
Brahman Seva Mandal
Ganeshotsav
Cultural Event
Mukta Barve
Sankarshan Karhade
Spruha Joshi
#Ganeshotsav #Mumbai #CulturalEvent #MuktaBarve #SankarshanKarhade #SpruhaJoshi #VandanaGupte

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: