अतिक्रमणमुक्त झालेल्या रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण केल्यास कडक कारवाईचा इशारा
पिंपरी, (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड आणि ब क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून वाहतूक सुरळीत करण्याची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईमुळे सुमारे ७ किलोमीटर लांबीच्या मुख्य महामार्गालगतचे सेवा रस्ते अतिक्रमणमुक्त झाले आहेत.
ड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पवना नदी पुलापासून मुळा नदी पुलापर्यंतच्या २४ मीटर रुंदीच्या सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी ११० बांधकामांना नोटीस देण्यात आली होती. ही कारवाई महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यासाठी ८ जेसीबी, २ क्रेन आणि ३० मजुरांसह महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ७० जवान तसेच वाकड आणि रावेत पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गतही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली. यामध्ये ६ जेसीबी मशीन, ५५ सुरक्षा दलाचे जवान, २० पोलिस कर्मचारी आणि महापालिकेचे कर्मचारी सहभागी होते.
या मोहिमेमुळे मुंबई-बंगळूर महामार्गालगतचे सेवा रस्ते अतिक्रमणमुक्त होऊन वाहतुकीसाठी सुरक्षित आणि सुकर झाले आहेत, असा दावा महापालिकेने केला आहे. तसेच, या सेवा रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण केल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Encroachment Removal
National Highway
Traffic Management
Urban Development
#PimpriChinchwad #Encroachment #Traffic #Highway #MunicipalCorporation #UrbanDevelopment #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: