अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणावर कडक कारवाई करा : आयुक्त शेखर सिंह

 


फुटपाथवरील अतिक्रमणे हटवा; दक्षता पथके सक्रिय, अहवालावर होणार कारवाई

पिंपरी, ९ जुलै २०२५ (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड शहरातील अनाधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि फुटपाथवर अतिक्रमण होणार नाही, यासाठी पथकांची नियुक्ती करून कारवाईमध्ये सातत्य ठेवावे, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज दिले. या निर्देशांचे पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.

आज बुधवार, ९ जुलै २०२५ रोजी आयुक्त सिंह यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणविरोधी मोहिमेचा आढावा घेतला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सह आयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, अमित पंडित, अतुल पाटील, निवेदिता घार्गे, प्रशासन अधिकारी किशोर ननवरे, कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे, विजय सोनवणे, प्रभारी कार्यकारी अभियंता सूर्यकांत मोहिते, उपअभियंता किरण माने यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, सध्या शहरात सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. नियमातील तरतुदीनुसार, अशा बांधकामांवर कारवाई करण्यापूर्वी २४ तास अगोदर नोटीस द्यावी. शहरातील रस्त्यालगतच्या फुटपाथवर होणारे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे. सर्व प्रभाग अधिकारी व बीट निरीक्षकांनी सतर्क राहावे. कारवाईमध्ये टाळाटाळ करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिका हद्दीत अनियमित बांधकामे व अतिक्रमण यावर लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र दक्षता पथक सक्रिय करण्यात आले असून, या पथकाकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे संबंधितांवर कारवाई केली जाईल.

बैठकीत शहरातील कोणत्या प्रभागात अतिक्रमण, अनाधिकृत बांधकामाची समस्या जास्त आहे आणि ही समस्या सोडवण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना सुरू आहेत, यावरही सविस्तर चर्चा झाली. अनधिकृत बांधकामे, पदपथ व नाल्यावर झालेले अतिक्रमण, परवानगीविना सुरू असलेले आठवडे बाजार याचाही आढावा आयुक्त सिंह यांनी घेतला.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, "अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासोबतच अशा प्रकारची बांधकामे होणार नाहीत, यासाठी विशेष काळजी घ्यावी. अतिक्रमण, अनाधिकृत बांधकामाची समस्या सोडवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्यासोबतच फिल्डवर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सातत्याने निरीक्षण करून तात्काळ पावले उचलावीत."

सह आयुक्त मनोज लोणकर यांनी माहिती दिली की, "बांधकाम परवानगी व अतिक्रमण विभाग यांच्यात समन्वय अधिक मजबूत केला जात आहे. अनाधिकृत बांधकामांना सुरुवातीच्या टप्प्यातच रोखण्यासाठी दक्षता पथके शिफ्टमध्ये कार्यरत असतील. त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे."


अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणावर कडक कारवाई करा : आयुक्त शेखर सिंह अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणावर कडक कारवाई करा : आयुक्त शेखर सिंह Reviewed by ANN news network on ७/०९/२०२५ ०८:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".