पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दहा वर्षांत भाजपाच्या माध्यमातून झपाट्याने विकास घडवून आणण्यात आला असून आगामी महापालिकेच्या निवडणुकीनंतर पुन्हा भाजपाचाच महापौर होईल, असा ठाम विश्वास भाजपा नेते आणि आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असा दावा त्यांनी केला.
पिंपरी-चिंचवडमधील वाढती लोकसंख्या, सुधारलेली पायाभूत सुविधा, प्रशस्त रस्ते आणि उभारण्यात आलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे नागरिकांनी या शहराचा निवासस्थान म्हणून मोठ्या प्रमाणात स्वीकार केला आहे. या प्रगतीमागे भाजपाचा विकासाभिमुख दृष्टिकोन असल्याचे लांडगे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या विकास योजना –
महेश लांडगे यांनी शहरातील महत्त्वाच्या योजनांची माहिती देताना सांगितले की, “2014 नंतर शहरात खऱ्या अर्थाने विकासाची गंगा अवतरली. भामा आसखेड आणि आंद्रा धरणातील पाणी आरक्षित करून पाणीप्रश्न सुटला. मेट्रो प्रकल्प, संविधान भवन, धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा, औद्योगिक प्रदर्शन केंद्र, न्यायालय संकुल आदी प्रकल्प शहरासाठी सुरू करण्यात आले. स्थानिक भूमिपुत्रांना 12.5 टक्के परतावा देत न्याय मिळवून दिला.”
टीपी स्कीम रद्द करण्याची मागणी –
चिखली, कुदळवाडी, चऱ्होली या गावांमध्ये टीपी स्कीम रद्द करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. “प्रशासकीय राजवटीत असा एकतर्फी निर्णय घेणे योग्य नाही. भूमिपुत्रांचे आंदोलन योग्य असून, 2019 मध्ये महापालिकेच्या सभेने मान्य केलेल्या टीपी स्कीमची माहिती देण्यात आलेली नाही. भाजपा सत्तेत आल्यानंतर अशा एकपक्षीय योजना लादल्या जाणार नाहीत,” असा इशाराही लांडगे यांनी दिला.
संघटनात्मक तयारी –
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पिंपरी चिंचवड, भोसरी आणि चिंचवड या तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये संघटनात्मक ताकद वाढवली आहे. “भाजपाने योजना राबवून लोकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे महापालिकेत पुन्हा एकदा कमळच फुलणार आहे, यात शंका नाही,” असेही आमदार लांडगे यांनी म्हटले.
...................................
#BJPPimpriChinchwad
#MaheshLandge
#PCMC2025
#PunePolitics
#MunicipalElections
#UrbanDevelopment
#BJPDevelopmentModel
#TPPlanOpposition
#PCMCMetro
#PimpriChinchwad

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: