गोव्यातील फोंडा येथे होणाऱ्या या ऐतिहासिक महोत्सवात देशविदेशांतून २५ हजार हिंदू बांधव सहभागी होणार आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३व्या जन्मोत्सवानिमित्त आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पुणे : सनातन संस्थेने गोव्यातील फोंडा येथे फर्मागुडी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत 'सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा'चे ऐतिहासिक आयोजन केले आहे. सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 'विश्वकल्याणार्थं रामराज्यासमान सनातन राष्ट्रा'चा शंखनाद करण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाला राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी समर्पित संत, महंत, हिंदुत्वाचे शिलेदार, विचारवंत, केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह २५ हजारांहून अधिक साधक व धर्मप्रेमी हिंदू उपस्थित राहणार आहेत. पुणे जिल्ह्यातून २ हजारांहून अधिक सनातन संस्थेचे साधक व धर्मप्रेमी हिंदू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती चैतन्य तागडे यांनी श्रमिक पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथील ६ मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान कडेपठारचे विश्वस्त ॲड. मंगेश जेजुरीकर, श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे सचिव डॉ. तुषार पाचुंदकर पाटील, पुणे शहर भाजपच्या महिला मोर्चा महामंत्री सौ. उज्वला गौड, चिंतामणी प्रासादीक दिंडी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख विश्वस्त हभप दत्तात्रय चोरघे महाराज, हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर हे मान्यवर उपस्थित होते.
एक कोटी रामनाम जपयज्ञ आणि संतसभा होणार
महोत्सवाचे 'धर्मेण जयति राष्ट्रम्' (अर्थः धर्मामुळे राष्ट्राचा विजय होतो) हे घोषवाक्य असून, 'सनातन राष्ट्रा'साठी 'रामराज्य संकल्प जपयज्ञा'द्वारे एक कोटी श्रीरामनामाचा जप करण्यात येणार आहे. देशभरातील सनातन धर्मीय संत, महंत तथा धर्मगुरु यांच्या तेजस्वी वाणीद्वारे सनातन राष्ट्राचे उद्घोष करण्यासाठी संतसभेचे आयोजनही करण्यात आले आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या महोत्सवाला 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे संस्थापक श्री श्री रविशंकर, पतंजली योगपीठाचे संस्थापक स्वामी रामदेव, 'सनातन बोर्ड'चे प्रणेते देवकीनंदन ठाकूर, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तेलंगणा येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह, तसेच काशी-मथुरा येथील मंदिरांचा खटला लढवणारे अधिवक्ता विष्णु जैन आदी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरि, 'स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान'चे महामंत्री विद्याधर नारगोलकर, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे १०वे वंशज ह.भ.प. माणिक मोरे यांच्यासह ५० हून अधिक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विशेष आयोजन
महोत्सवात 'हिंदु राष्ट्ररत्न' आणि 'सनातन धर्मश्री' पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. वर्षानुवर्षे सनातन धर्माच्या सेवेसाठी समर्पित होऊन विशेष कार्य करणाऱ्या हिंदूवीरांना 'हिंदु राष्ट्ररत्न' हा जीवनगौरव पुरस्कार, तसेच धर्मासाठी लढणाऱ्या धर्मरक्षकांना 'सनातन धर्मश्री' हा पुरस्कार वंदनीय संतांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
या महोत्सवात लोककलांचे सादरीकरण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील प्राचीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, सनातन संस्कृती, राष्ट्र, कला, आयुर्वेद, आध्यात्मिक वस्तू यांचे भव्य प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.
तसेच अनेक संतांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभही सर्व भाविकांना घेता येणार आहे. १९ मे रोजी विश्वकल्याणार्थ तथा सनातन धर्मीयांच्या आरोग्यासाठी महाधन्वंतरी यज्ञही आयोजित करण्यात आला आहे.
..........................................
#SanatanRashtraShankhnad
#DrJayantAthavale
#SanatanSanstha
#HinduGathering
#GoaEvent
#RamrajyaSankalp
#SpiritualConclave
#HinduUnity
#SanatanDharma

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: