विद्यार्थ्यांनी घेतली निसर्ग वाचवण्याची शपथ
पिंपरी : "भविष्यात पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी हरित इमारती बांधणे अत्यावश्यक आहे. हरित इमारत बांधकाम हे जमीन, बांधकाम सामग्री, ऊर्जा आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करते. तसेच, ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे आणि पाण्याचा पुनर्वापर करणे यावर भर देते. त्यामुळे हरित इमारती निसर्गासाठी अनुकूल ठरतात. वास्तू रचनाकार आणि स्थापत्य अभियंता यांनी हरित इमारत बांधणीवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे," असे मत स्प्राउट कन्सुलन्सीच्या संचालक नम्रता धामणकर यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय), इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने "इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलचे उद्दिष्टे आणि हरित इमारत" या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात हरित इमारत-रचना, शाश्वत पर्यावरण आणि या संदर्भातील दृष्टिकोन यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, आर्किटेक्ट ऋतुराज कुलकर्णी (सहयोगी प्राध्यापक, एसबीपीसीओएडी), आर्किटेक्ट ऋजुता पाठक (समन्वयक, आयजीबीसी स्टुडंट चॅप्टर व सहयोगी प्राध्यापक, एसबीपीसीओएडी), स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुदर्शन बोबडे उपस्थित होते.
आर्किटेक्ट ऋतुराज कुलकर्णी म्हणाले की, "हरित इमारती बांधताना उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर, इमारतीत राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि कचरा, प्रदूषण तसेच पर्यावरणाचा ऱ्हास कमी करून मानवी आरोग्य आणि नैसर्गिक पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाते."
प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी शाश्वत पर्यावरणाच्या दिशेने उचललेल्या या पावलासाठी पीसीसीओईआरच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी शाश्वत आणि हरित इमारती बांधण्याचा तसेच निसर्गाचे रक्षण करण्यासाठी एका समग्र दृष्टिकोनाची शपथ घेतली.
डॉ. सुदर्शन बोबडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर प्रा. चेतन चव्हाण यांनी आभार मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
................................
#GreenBuilding
#PCCoER
#EnvironmentProtection
#IGBC
#SustainableDevelopment
#EngineeringSeminar
#PimpriChinchwad

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: