हा कार्यक्रम १६ मे २०२५ रोजी ऑकलंड परफॉर्मिंग आर्ट सेंटर (ऑकलंड), २४ मे रोजी वेलिंग्टन आणि २५ मे रोजी ख्राईस्टचर्च येथे आयोजित करण्यात आला आहे. कथक नृत्य क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पं. मनीषा साठे यांचा न्यूझीलंडस्थित भारतीयांच्या वतीने विशेष सत्कारही करण्यात येणार आहे. ‘मनीषा नृत्यालय’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भारतात आणि परदेशात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, न्यूझीलंड दौरा हा त्याचाच एक भाग आहे.
पं. मनीषा साठे: नृत्यार्पित जीवन प्रवास
पं. मनीषा साठे यांनी लहान वयात पुण्यात पं. बाळासाहेब गोखले यांच्याकडे कथक नृत्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे पं. गोपीकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली आपले शिक्षण सुरू ठेवले. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी भारतातील प्रतिष्ठित सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, खजुराहो नृत्य महोत्सव, शनिवारवाडा नृत्य महोत्सव, लखनौ नृत्य महोत्सव आणि गोहत्ती येथील कामाख्या महोत्सवासह मुंबईमधील नेहरू सेंटर आणि टाटा थिएटरमध्येही कथक नृत्याचे प्रभावी सादरीकरण केले आहे. केवळ भारतातच नव्हे, तर त्यांनी अमेरिका, चीन, बहरैन, स्वित्झर्लंड, स्वीडन आणि जपान यांसारख्या अनेक देशांमध्येही आपल्या नृत्याची कला सादर केली आहे.
पं. मनीषा साठे यांच्या कथक नृत्याची खास बाब म्हणजे त्या आधुनिक संगीत आणि जागतिक संगीताचा प्रभावी वापर करतात. त्यांनी जपानी संगीतासोबतही कथक नृत्याचे यशस्वी प्रयोग केले आहेत. गेल्या १५ वर्षांपासून त्या जपानी संगीतकार आणि ताईको वादक यासुहितो ताकीमोतो यांच्याबरोबर अनेक फ्युजन मैफिली सादर करत आहेत, ज्यांना रसिकांची उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला गौरवत पं. मनीषा साठे यांनी ‘सरकारनामा’ आणि ‘वारसा लक्ष्मीचा’ यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि अल्फा टी.व्ही. पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम नृत्य दिग्दर्शकाचा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पं. साठे ‘मनीषा नृत्यालय ट्रस्ट’ या नावाची एक संस्था चालवतात, जी कथक नृत्याचे शिक्षण देते. त्यांच्या अनेक शिष्यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची शिष्यवृत्ती मिळाली आहे, ही त्यांच्या शिकवणीची आणि मार्गदर्शनाची पावती आहे.
.................................
#ManishaSathe
#KathakDance
#NrityaSamvad
#NewZealand
#IndianDance
#ManishaNrityalaya
#ShambhaviDandekar

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: