लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर महापालिकेचा भर – अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी भरवला जातो लोकशाही दिन...
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाही दिनानिमित्त आज अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांच्या तक्रारी व सूचना ऐकण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत एकूण तीन तक्रारवजा सूचना प्राप्त झाल्या.
या तक्रारींमध्ये प्रभाग क्र. २२ मधील काळेवाडी येथील स्थानिक समस्या, लोकशाही दिन अर्जातील अडचणी, आणि महत्वाचा दूरध्वनी क्रमांक दर्शविणारा फलक बसवण्याची गरज या बाबींचा समावेश होता. नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकून घेतल्यानंतर अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना दिल्या.
लोकशाही दिनात मांडलेल्या प्रमुख समस्या आणि सूचना –
-
शहरातील सर्व स्मशानभूमी आणि उद्याने सुशोभित करणे
-
अनधिकृत बांधकामांवर तातडीने कार्यवाही करणे
-
नदीतील जलपर्णी काढणे
-
काळेवाडी परिसरात क्रीडांगणांची संख्या वाढवणे
-
जिजाऊ क्लिनिक येथे रुग्णांसाठी पत्रा शेड उभारणे
-
शहरातील बसस्थानकाजवळ स्वच्छता राखणे
-
कोकणे नगर श्रीकृष्ण कॉलनीतील रस्त्यांचे ड्रेनेज गळतीचे काम पूर्ण करून डांबरीकरण करणे
या उपक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना अतिरिक्त आयुक्त पाटील म्हणाले की, "महानगरपालिका नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद दृढ करण्यासाठीच हा उपक्रम राबवला जात आहे."
लोकशाही दिन उपक्रमाचे वैशिष्ट्य –
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही दिन उपक्रम राबवला जात असून, नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निवारण होण्यास मदत होते. यामुळे नागरिकांचा महापालिकेवरचा विश्वास वाढला असून, प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान बनले आहे.
बैठकीस उपस्थित अधिकारी व कर्मचारी –
यावेळी शहर अभियंता मकरंद निकम, लोकशाही दिन समन्वयक उप आयुक्त राजेश आगळे, सह शहर अभियंता संजय खाबडे, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, किशोर ननवरे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, विजय जाधव, किरण अंदुरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता राजकुमार सुर्यवंशी, विकास घारे, मिनल दोडल, सागर देवकाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सुपेकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे तसेच तक्रारदार नागरिक उपस्थित होते. उपक्रमाच्या नियोजनासाठी लिपिक प्राजक्ता झेंडे यांचे सहकार्य लाभले.
लोकशाही दिनासाठी अर्ज सादर करण्याचे निकष
-
अर्ज विहित नमुन्यातील असावा.
-
अर्ज अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या नावे करावा.
-
विहित नमुन्यातील प्रती नागरी सुविधा केंद्रांमध्ये विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात.
-
अर्ज १५ दिवस आधी दोन प्रती नागरी सुविधा केंद्राचे विभागप्रमुख/समन्वय अधिकाऱ्यांकडे सादर करावा.
-
लोकशाही दिनाच्या दिवशी प्रत्यक्ष तक्रार अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-
तक्रार वैयक्तिक स्वरूपाची असावी.
"पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव पुढे असते. त्यासाठी महापालिकेच्या वतीने महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा केला जातो. या उपक्रमांतर्गत नागरिकांनी मांडलेल्या तक्रार बाजा सूचनांचा गांभीर्यपूर्वक विचार करून त्यावर आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे. या उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लोकशाही दिनामध्ये सहभागी व्हावे."
— प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
.........................................................................
#PCMC
#LokshahiDin
#PradeepJambhalePatil
#PimpriChinchwad
#CivicIssues
#UrbanGovernance
#PublicGrievanceRedressal
#CitizenParticipation
#MunicipalCorporation
#MaharashtraNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: