पाणी बचतीसाठी दहा सोपे उपाय
महानगरपालिकेने सूचवलेल्या प्रमुख उपायांमध्ये नळांना एरिओटर नोझल लावणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टम उभारणे, भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी खड्डे खोदणे, एसटीपी प्लांटचे पाणी पुनर्वापर करणे आदी समाविष्ट आहेत. नळांना एरिओटर नोझल लावण्यासाठी केवळ दीडशे रुपये खर्च येतो, मात्र त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. यामुळे महिन्याला दहा टँकर मागवणाऱ्या संस्थांना केवळ सात टँकरची आवश्यकता भासेल.
पाणी पुनर्भरणावर भर
प्रत्येक प्लॉटवर असलेल्या बोअरवेलचे पुनर्भरण १००% व्हावे यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे आवश्यक आहे. महानगरपालिका यासाठी करात पाच टक्के सवलत देत आहे. भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी संस्थेच्या दारात ५ फूट x २ फूट x ३ फूट (लांबी x रुंदी x खोली) असा खड्डा करून त्यावर रेन वॉटर ड्रेनच्या जाळ्या बसवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एसटीपी पाण्याचा पुनर्वापर
संस्थेमध्ये एसटीपी प्लांट असल्यास, त्यातील प्रक्रिया केलेले पाणी बागेसाठी, फ्लशिंगसाठी आणि साफसफाईसाठी वापरण्याचे सुचवले आहे. या उपायांमुळे पिण्याच्या पाण्याची बचत होऊ शकते.
पाणी अपव्ययावर नियंत्रण
गाडी धुणे, रस्ते व अंगण धुणे, झाडांना पाणी देणे यासाठी नळाला रबरी पाईप लावून प्रेशरने पाण्याचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. यासाठी बोअरच्या पाण्याचा वापर करण्याचे आणि बादली/झारी यांचा वापर करण्याचे सुचवले आहे. तसेच गळत्या टाक्यांची दुरुस्ती करणे आणि लेव्हल इंडिकेटर बसवणे यामुळेही बहुमूल्य पाणी वाचवता येईल.
वॉटर मीटर बसवण्याचे आवाहन
प्रत्येक संस्थेने वॉटर मीटर बसवण्यासाठी आग्रह धरावा, अन्यथा जवळच्या पाणीपुरवठा विभागीय कार्यालयाला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे प्रति व्यक्ती प्रति दिन अनुज्ञेय असलेले १३५ लिटर पाणी आणि प्रत्यक्ष वापर याचा ताळमेळ घालता येईल.
महानगरपालिकेने यासंदर्भात सूचना न पाळणाऱ्या संस्थांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. याबाबत लवकरच तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शहरवासीयांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.
............................................
#PuneWaterConservation
#SaveWater
#PMC
#WaterScarcity
#RainwaterHarvesting
#SustainableWaterUse
#PuneCity
#WaterManagement
#UrbanSustainability

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: