पॅरिस: सांगलीचा सुपुत्र सचिन खिलारीने 4 सप्टेंबर रोजी पुरुषांच्या गोळाफेक F46 स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. स्टेड डि फ्रान्स येथे झालेल्या या स्पर्धेत खिलारी यांनी 16.32 मीटरची फेक नोंदवली. कॅनडाचे ग्रेग स्टुअर्ट यांच्या मागे ते दुसऱ्या स्थानावर राहिले. खिलारी यांची ही कामगिरी पुरुषांच्या F46 वर्गवारीत आशियाई खेळाडूने केलेली आजवरची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे.
या स्पर्धेत एकूण तीन भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मोहम्मद यासेर आणि रोहित कुमार हे पदकाच्या शर्यतीत पोहोचू शकले नाहीत. त्यांनी अनुक्रमे 14.21 मीटर आणि 14.10 मीटरच्या फेकीसह 8वे आणि 9वे स्थान पटकावले.
जागतिक स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर पॅरिस पॅरालिम्पिक्समध्ये दाखल झालेल्या सचिनने अप्रतिम सातत्य दाखवले. त्याने सहाही फेकी कायदेशीर केल्या, त्यातील सर्वोत्तम फेक त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात आली. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच सचिन कॅनडाच्या स्टुअर्टसोबत अव्वल दोन स्थानांसाठी लढत होता.
पॅरिसमधील सचिनचे हे रौप्यपदक भारताचे पॅरा-अॅथलेटिक्समधील 11वे पदक ठरले आहे. पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये ट्रॅक आणि फील्ड संघटनेने भारतासाठी सर्वाधिक पदके जिंकून दिली आहेत.
सचिन खिलारी यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील करगणी, आटपाडी तालुक्यात जन्मलेल्या खिलारी यांनी अनेक आव्हानांवर मात करत आपल्या क्रीडा क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. वयाच्या नवव्या वर्षी सायकल अपघातात त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आणि गँग्रीन झाले. या अडचणींना न जुमानता त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत खेळांमध्ये आपले कौशल्य वाढवले.
सुरुवातीला भालाफेकीकडे वळलेल्या खिलारी यांना खांद्याच्या दुखापतीमुळे गोळाफेकीकडे वळावे लागले. या बदलाने त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी दिली. प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खिलारी यांनी गोळाफेकीत आपले कौशल्य वाढवले. 2017 मध्ये जयपूर राष्ट्रीय स्पर्धेत 58.47 मीटरच्या फेकीसह त्यांनी आपले पहिले सुवर्णपदक जिंकले. गेल्या वर्षी पॅरिसमध्ये 16.21 मीटरच्या नव्या आशियाई विक्रमी फेकीसह त्यांनी आपले पहिले जागतिक पॅरा विजेतेपद पटकावले. त्यानंतर हांगझोऊ आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत 16.03 मीटरच्या फेकीसह त्यांनी विजेतेपद मिळवले.
खिलारी यांची सर्वात अलीकडची कामगिरी म्हणजे जपानमधील कोबे येथे झालेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या गोळाफेक F46 वर्गवारीत 16.30 मीटरच्या आशियाई विक्रमी फेकीसह त्यांनी आपले सुवर्णपदक कायम राखले. या विजयाने भारताची या चॅम्पियनशिपमधील आजवरची सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली गेली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: