पिंपरी-चिंचवड: मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा भंगल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत उभारला जाणारा संभाजी महाराजांचा १०० फुटी पुतळा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन या पुतळ्याचा काही भाग उभारण्यापूर्वीच भंगला असल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे पालिका प्रशासनाला तातडीने खुलासा करावा लागला.
पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर लढणारे माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तक्रार अर्ज पाठवून या विषयाचा तपास करण्याची मागणी केली आहे.
भापकर यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, मोशी येथील संभाजी महाराजांचा १०० फुटी पुतळा उभारण्याचा निर्णय २०२० मध्ये घेण्यात आला होता. या कामासाठी सुरुवातीला १२ कोटी रुपयांची निविदा काढून धनेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला काम देण्यात आले होते. या ठेकेदाराने दिल्लीतील प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांच्याशी करार करून पुतळ्याचे काम सुरू केले. तथापि, पुतळ्याचे काही भाग मोशी येथे आणल्यानंतर त्याला भेगा पडल्याचे दिसून आले आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, मोशी येथे केवळ चौथऱ्याचे काम सुरू आहे, आणि पुतळ्याचे काम दिल्लीतील सुतार यांच्या कारखान्यात सुरू आहे. त्यांनी याला "खोटी बातमी" म्हणून नाकारले.
भापकर यांनी आपल्या तक्रारीत अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. या पुतळ्यासाठी वापरलेले धातू, कामाचा दर्जा, आणि ठेकेदाराच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. मुलात धनेश्वर कन्स्ट्रक्शन पुतळा उभारणीसाठी योग्य ठेकेदार आहे का? असाही सवाल भापकर यांनी केला आहे. या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा भव्यदिव्य झाला पाहिजे, मात्र तो गुणवत्तापूर्ण आणि चिरस्थायी, टिकाऊ व्हावा यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कामाचा तपास करणे अत्यावश्यक आहे असेही भापकर यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: