छत्रपतींचा अपमान करणाऱ्या नेहरूंच्या वक्तव्याचे प्रायश्चित्त घ्या!: केशव उपाध्ये


 भाजपचे राहुल गांधींना आव्हान

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे भरकटलेला देशभक्त व दगाबाज लुटारू होते असे म्हणत महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणाऱ्या जवाहरलाल नेहरू यांची काँग्रेस, शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही असे म्हणणारे शरद पवार आणि मध्य प्रदेशात शिवरायांचे स्मारक उद्ध्वस्त होत असताना काँग्रेसच्या कारवाईविरोधात मूग गिळून स्वस्थ बसणारे उद्धव ठाकरे यांनी  शिवरायांच्या अस्मितेचे राजकारण करून महाराष्ट्रात अस्वस्थता माजविण्याचा कट शिजविला आहे, असा आरोप प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत केला. शिवरायांचा घोर अपमान करून महाराष्ट्राच्या भावना दुखावणाऱ्या नेहरूंच्या वक्तव्याबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन प्रायश्चित्त घ्यावे, अशी मागणीही उपाध्ये यांनी केली.

रयतेचा राजा म्हणून उभ्या देशाच्या आदराचे स्थान असलेले आणि संपूर्ण समाजाला न्याय देणारे छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे दैवत आहेत. त्यांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही, असे वक्तव्य करून शरद पवार यांनीही शिवाजी महाराजांची प्रतिमा मलिन करून राजकारण केले होते, त्यांनी तर माफीदेखील मागितली नाही. त्यांनीही आता थेट प्रायश्चित्त घ्यायला हवे, असे उपाध्ये म्हणाले. मध्य प्रदेशात काँग्रेस सरकारने शिवरायांचे स्मारक बुलडोझर लावून उद्ध्वस्त केले तेव्हा बाळासाहेबांचे वारस म्हणविणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्रात टिपू सुलतानाची प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्न करत होते. त्याबद्दल ठाकरे कोणते प्रायश्चित्त घेणार, असा सवालही उपाध्ये यांनी केला. सातत्याने महाराजांचा असा अपमान करणाऱ्या नेत्यांनी आता त्यांच्या नावाने राजकारण सुरू केले असून राज्यात सामाजिक अशांतता माजविण्याचा कट रचला आहे, असा आरोपही त्यांनी केला. याला खतपाणी घालण्यासाठीच राहुल गांधी महाराष्ट्रात येत असतील तर जनतेने त्यांच्या राजकारणास बळी पडू नये असे आवाहनही उपाध्ये यांनी केले. सातत्याने शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर करून महाराष्ट्राच्या जनतेच्या अस्मितेचा गैरफायदा घेत राजकीय स्वार्थ साधण्याचे हे प्रकार थांबवून राज्यातील सौहार्द व शांतता राखण्यासाठी सरकारला सहकार्य करून शिवरायांच्या संस्कारांचा आदर करावा, असे ते म्हणाले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करून ज्यांनी आपल्या कुटुंबांचे उखळ पांढरे केले व सातत्याने जनतेची दिशाभूल करून स्वार्थ साधला, त्यांनी तर शिवरायांचे नावदेखील उच्चारण्याचा हक्क गमावला आहे, अशा शब्दांत उपाध्ये यांनी उबाठा गटावर हल्ला चढविला. शिवरायांची माफी आम्ही स्वीकारणार नाही असे हास्यास्पद विधान करणारे नेते स्वतःला छत्रपती समजतात काय, असा खोचक सवालही उपाध्ये यांनी केला. शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्गातील स्मारक कोसळणे ही घटना दुर्दैवी आहे, आणि त्यासाठी पंतप्रधान मोदी व राज्य सरकारनेही शिवरायांची माफी मागितली आहे. ती माफी आपण स्वीकारणार नाही असे म्हणणे म्हणजे स्वतःस आजचे शिवाजी महाराज समजणे नव्हे काय, असा सवालही त्यांनी केला. आपल्या नावासोबत पित्याचे नाव नसते तर आपली लायकी शून्य आहे अशी स्वतःच कबुली देणारे उद्धव ठाकरे अचानक स्वतःस शिवाजी महाराज समजू लागले हा मोठा विनोद आहे, असा टोलाही उपाध्ये यांनी हाणला.

राज्यात आरक्षणाच्या मुदद्यावरून अगोदरच संवेदनशील वातावरण निर्माण झाले असताना, सामाजिक सलोखा कायम राखण्याची समंजस भूमिका सर्व राजकीय पक्षांनी व नेत्यांनी घेण्याची गरज आहे. अशा परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अकारण सामाजिक शांतता बिघडविण्याचे राजकारण करून महाराष्ट्राचे वातावरण गढूळ करू नका, असे आवाहनही उपाध्ये यांनी केले. ओबीसी आरक्षणाबाबतची भूमिका गुलदस्त्यात ठेवून आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकारही थांबले पाहिजेत, असे ते म्हणाले. शरद पवार यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका निःसंदिग्धपणे स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली.

छत्रपतींचा अपमान करणाऱ्या नेहरूंच्या वक्तव्याचे प्रायश्चित्त घ्या!: केशव उपाध्ये छत्रपतींचा अपमान करणाऱ्या नेहरूंच्या वक्तव्याचे प्रायश्चित्त घ्या!:  केशव उपाध्ये Reviewed by ANN news network on ९/०४/२०२४ ०२:५७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Advt.

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".