खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात भरणे येथे मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या जगबुडी नदीवरील नवीन पुलाला मध्यभागी भलीमोठी भेग पडली असून सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी या पुलावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे.
पुलाच्या मध्यभागी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर एक मोठी सुमारे चार ते पाच फूट लांबीची भेग पडली आहे. एक्सपान्शन जॉइंट्सचे काँक्रिट निघाले असल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. तीन चार दिवसांमध्ये वेगाने घट्ट होणारे सिमेंट वापरून पुलाची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती खेड येथील तहसीलदारांनी दिली असून एनएचएआयच्या अधिकार्यांना प्रत्यक्ष येऊन पाहणी करण्याबाबत कळविण्यात आले आहे. जुन्या पुलावरून वाहतूक सुरळीत सुरू आहे असेही ते म्हणाले.
अवघ्या दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या पुलाला भेग पडल्यामुळे पुलाचे काम निकृष्ट झाल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी यापूर्वी या पुलाचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप करीत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आंदोलन केले होते. त्यांच्या या आरोपात तत्थ्य होते असे बोलले जात आहे.
२ ऑगस्ट २०१६ रोजी महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल कोसळून वाहनांसह सुमारे ४० जणांना जलसमाधी मिळाली होती. त्या दुर्घटनेच्या आठवणी नागरिकांच्या मनात जागृत झाल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: