पुणे : शरद पवार हे भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे अग्रणी आहेत; त्यांनीच भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप देण्याचा प्रयत्न केला असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज २१ जुलै रोजी पुणे येथे केला. भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी ते येथे आले होते.
शाह यांनी पवार यांना मराठा आरक्षण जाण्यासाठी जबाबदार धरले. ते म्हणाले, जेव्हा भाजपाची सत्ता असते तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळते, परंतु शरद पवारांच्या सत्तेत मराठा आरक्षण गेले आहे. २०१४ मध्ये भाजप सत्तेत आली तेव्हा मराठा आरक्षण मिळाले, २०१९ मध्ये शरद पवार सत्तेत आले तेव्हा मराठा आरक्षण गेले. त्यामुळे लोकांनी ठरवावे की त्यांना काय करायचे आहे.
आपल्या ३९ मिनिटांच्या भाषणात शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.ते म्हणाले, काँग्रेसच्या काळात शरद पवार केंद्रात मंत्री असताना महाराष्ट्रावर अन्याय झाला. २०१४ ते २०१९ हा कार्यकाळ महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा ठरला आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
औरंगजेब फॅन क्लबचे नेते
उद्धव ठाकरे यांच्यावरही अमित शाह यांनी जोरदार टीका केली. त्यांनी ठाकरे यांना औरंगजेब फॅन क्लबचे नेते म्हणून संबोधले. शाह यांनी ठाकरे यांना काँग्रेससोबत जाण्याचे, याकुब मेननला सोडण्याची मागणी करणाऱ्यांबरोबर बसण्याचे आणि पीएफआय या संघटनेला पाठिंबा देणाऱ्यांसोबत बसण्याचे आरोप केले. राज्यातील महाविकास आघाडीवर औरंगजेब फॅन क्लब असल्याचा टोला त्यांनी लगावला.
या दोन दिवसांच्या बैठकीत अमित शाह यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले आणि भाजपाच्या नेतृत्त्वाखालील महायुती पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: