रुईचे पान तोडताय?, घ्या फुलपाखरांची काळजी !

 


जैवविविधता जोपासणारी रुई महाउपयोगी; डॉ संतोष पाटील यांचे  विशेष संशोधन       


दिलीप शिंदे 

सोयगाव  : भगवान हनुमान व शनिदेव यांना प्रिय असलेली रुईची  पाने व फुलं यांचा हार बनवून मोठया प्रमाणात भाविक हनुमान व शनिदेवास व इतरही विधीत अर्पण करतात. रुईची झुडपे सर्वत्र व विपुल मात्रेत आढळत असली तरी त्या पानांच्या खालच्या बाजूस बऱ्याचदा विविध फुलपाखरे यांची अंडी व कोष असतो व ही पाने तोडल्याने सदर फुलपाखरांची अंडी व कोष धोक्यात येऊन त्याचा जीवनक्रम सुरू होण्याआधीेच संपतो.  फुलपाखरे हळूहळू नष्ट होत आहेत, त्यात हे ही एक कारण असल्याचे सिल्लोड येथील जैवविविधता संशोधक व संवर्धक डॉ.संतोष पाटील यांचे मत आहे. त्यांनी यावर विशेष अध्ययन केले आहे.

कॉमन टायगर,प्लेन टायगर,स्ट्रीप टायगर ,ब्लू टायगर, ग्लोसी टायगर, मोनार्क आदी प्रजातींची फुलपाखरे फक्त रुईवरच पानाच्या खालच्या बाजूस खूप सूक्ष्म  अंडी  घालतात, कोष ही विकसित होतो व अळीच्या अवस्थेत ही फुलपाखरं रूईची विषारी पाने खातात व पुढे त्याचे  फुलपाखरात रूपांतर होते.रुईवर खूप मोठी जैवविविधता अवलंबून असते. वर्षभर फुलं असणाऱ्या या फुलांवर जांभळा शिंजिर,सूर्यपक्षी-सन बर्ड हमखास मकरंद प्राशन करतात. ब्लॅक वुडपेकर जातीचे भुंगे यांचे हे तर हे आवडते खाद्य. अनेक मुंग्यही यावर उपजीविका करतात. काळे भुंगे रुईवर गर्दी करतात तर त्या भुंग्याची शिकार करायला सरडे तिथे टपून बसतात व सरड्याला टिपण्यासाठी कावळे रुई वर लक्ष ठेवून असतात. रुईच्या फुलांतील पराग शोषणाऱ्या प्रजाती-शिंजिर, सनबर्ड, काळे भुंगे, सोनेरी पंखाचे काळे भुंगे हे पक्षी व कीटक  तर फॉरगेट मी नॉट, लिटल टायगर पिरॉल, ट्रान्सपरंट पिरॉल,प्लेन टायगर, स्ट्रीप टायगर, ग्रे पॅसी, आदी फुलपाखरे ,पतंग,,काही मुंग्या व त्यावर आधारित सरडे,पाली यांना भक्षण करणारे कावळे, मुंगूस ,साप व १३ प्रकारची कीड १० ते १२ प्रजातींचे व्हिजिटर्स वन्यघटक आदी प्रजातींची नोंद डॉ पाटील यांनी केली आहे.  
                                     
 
रुई ही औषधीगुणाने युक्त असलेली मात्र अतिविषारी वनस्पती आहे. हीच्या पाना -फुलात कॅल्शिट्रोपीन ,कार्डीयाक ग्लायकोसाइड विषारी तत्व असून ते कॉमन टायगर  व इतर चार  प्रकाराचे  फुलपाखरे ते खाऊन स्वतःला  विषारी बनवतात .त्यांच्या जवळ गेल्यास त्यांच्या शत्रूस ती विषाची जाणीव ही होते व ही फुलपाखरं  पक्षी व इतर जीवांनी खाल्ली तर त्यांना लगेच उलटी होते व ते पुन्हा यांच्या वाटेस ही जात नाही ही निसर्गाची "डिफेंस सिस्टिम" आहे.उन्हाळ्यात जेव्हा कुठे ही पराग नसतो तेव्हा ही वनस्पती संजीवन ठरते म्हणून ती घराजवळ कुठे असली तर बिन उपयोगी व विषारी म्हणून उपटून न टाकता जोपासावी व पानांची खालची बाजू बघून घ्यावी व ज्या रुई वर कुरतडलेली पाने दिसतील त्यावर हमखास सदर फुलपाखरांचा अधीवास असल्याने तिची पाने ,फुले तोडू नये.

                     - डॉ. संतोष पाटील, जैवविविधता व पर्यावरण संवर्धक 
                        अभिनव प्रतिष्ठान सोयगाव-सिल्लोड
रुईचे पान तोडताय?, घ्या फुलपाखरांची काळजी ! रुईचे पान तोडताय?, घ्या फुलपाखरांची काळजी !    Reviewed by ANN news network on ४/२१/२०२४ ०८:४६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".