२३ नर्मदा परिक्रमा : शिनोर ते कर्नाली : अनसूया माता ते कुबेर भंडारी

 


२३ नर्मदा परिक्रमा : शिनोर ते कर्नाली : अनसूया माता ते कुबेर भंडारी

०६ जानेवारीला सकाळी आम्ही रणापूरच्या आश्रमातून बाहेर पडलो. वाट मैय्याच्या किनाऱ्याने जात होती. काही ठिकाणी चांगली पायवाट होती, तर काही ठिकाणी चालणे अडचणीचे होते. वाटेत सुरशामल गाव लागले, जिथे राहुल पटेल हरिहर आश्रम चालवतात. त्यांच्याकडून चायप्रसादी घेऊन आम्ही पुढे शिनोरकडे निघालो.

शिनोर हे पुरातन तीर्थस्थळ असून, येथे धूतपापेश्वर, निष्कलंकेश्वर, मार्कंडेश्वर, केदारतीर्थ, भोगेश्वर, रोहिणीश्वर, उत्तरेश्वर (चक्रतीर्थ), कृष्णेश्वर आणि भांडारेश्वर अशी आठ तीर्थे आहेत.

शिनोरची सेवा आणि पोलीस बंदोबस्त

मी चालत असताना माझ्या सँडल्सला भोके पडल्यामुळे खडे टोचत होते आणि नुकत्याच सेप्टिक झालेल्या पायाला त्रास होत होता. शिनोरमध्ये नवीन पादत्राणे घेण्याचा विचार होता, पण दुकाने उघडलेली नसल्यामुळे आम्ही पुढे चालू लागलो.

किनाऱ्यावर आम्हाला भंडारेश्वर महादेव तीर्थ लागले. तिथे गेलो तर पोलीस बंदोबस्त होता. दर्शनानंतर पारावर टेकलो असता, पोलिसांनी आणि बाबाजींनी 'महाराज जी भोजन प्रसादी पा के जाना' असे म्हटले. परिक्रमा मार्गात मय्येचा प्रसाद नाकारायचा नाही, या विचाराने आम्ही थांबलो.

तेथे बसने आलेल्या पुण्याच्या २५-३० परिक्रमावासींचा एक ग्रुप आला. ते निघून गेल्यावर आम्हाला मंदिरातील बाबाजींनी गरमागरम डाळ-भात भोजनप्रसादीसाठी बोलावले. विशेष म्हणजे, बंदोबस्तासाठी असलेले पोलीसही आम्हाला जेवण वाढण्यासाठी मदत करत होते.

पोलिसांशी बोलताना कळले की, गेल्या दोन वर्षांपासून येथे कायम २४ तास बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, कारण इथे काही कटू प्रसंग घडले आहेत. थोडावेळ बसून आम्ही त्यांना नर्मदे हर करून पुढे निघालो.

वाटेत कंजेठा गाव लागले. येथे मैयाचा किनारा ७०-८० फूट खाली आहे आणि वर गाव. वाटेत अनेक आश्रम आहेत. सौभाग्यसुंदरी मातेचे तांदळासदृष्य मूर्ती असलेले मंदिर आहे. त्यानंतर अंबाली (अंबिकेश्वर महादेव) आणि सुवर्णेश्वर तीर्थ लागले.

 अनसूया मातेच्या मंदिरात माळेची कथा

आम्ही अनसूया मातेच्या मंदिरात पोहोचलो. हे हत्याहरण तीर्थ असून, भगवान दत्तात्रयांची माता अनुसया यांचे पवित्र ठिकाण आहे. मंदिरात बऱ्यापैकी गर्दी होती.

तिथे बसलेल्या दोन  माताजींनी माझ्या गळ्यातील माळेबद्दल विचारले. मी सांगितले की, एक रुद्राक्ष आणि दुसरी वैजयंतीमाळ आहे. मी त्यांना वैजयंतीमाळेमागची कथा सांगितली. त्यांनी आम्हाला नमस्कार केला आणि दहा रुपये दक्षिणा दिली.

मंदिरातून बाहेर पडल्यावर एका नवीन आश्रमातील महाराजांनी आम्हाला चहासाठी हाक मारली. तिथे आलेला एक परिक्रमावासी 'किती वेळ झाला? काही नको मला चहा! मी निघालो' असे म्हणत तणतण करून निघून गेला. त्यावर महाराजांनी  'यांना परिक्रमावासी कसे म्हणायचे?' असा प्रश्न विचारला. काय उत्तर देणार?

बरकालमधील नर्मदा कुटीर

पुढे कुठेतरी एका माइलस्टोनवर बरकाल असे लिहिले होते. दक्षिण तटावर भेटलेल्या सोलापूरच्या तरुणाने इथे त्याच्या आश्रमात येण्यासाठी सांगितले होते. सत्संगी महाराजांनी लगेच 'त्याच्याकडे जायचं' म्हणून हट्ट धरायला सुरुवात केली. त्याच्याबद्दल कोणतीही माहिती (नंबर, पत्ता) नसताना त्याला शोधणे कर्मकठीण होते.

शेवटी आम्ही बरकालमध्ये पोहोचलो. काळोख पडत आल्यामुळे मी नवले महाराजांना सांगितले की, आता पहिल्या आश्रमात आसन लावायला हवे. आम्ही मैयाच्या अगदी किनारी असलेल्या नर्मदा कुटीर या आश्रमात पोहोचलो.

तिथे एका सेवेकऱ्याने आन्हाला उघड्या सभामंडपात आसने लावण्यास सांगितले. तेव्हढ्यात तिथे आलेल्या अश्रमाच्या प्रमुख बाबाजींनी सेवेकऱ्याला फटकारले आणि आम्हाला थंडीत बाहेर ठेवता नवीन, बंदिस्त खोली उघडून देण्यास सांगितले. मय्याच्या मनात आले की, दुर्गम मार्गावरही सगळ्या सुखसोयी सहज उपलब्ध होतात. आश्रमाच्या पाठीमागे चकाचक टॉयलेट-बाथरूमची व्यवस्था असलेला कक्ष आम्हाला मिळाला.

रात्री भोजनप्रसादीसाठी रोट्या कमी पडत असल्याचे पाहून महाराज स्वतः रोट्या तयार करायला बसले. खरे साधू असेच असतात, त्यांच्या अंगी कोणताही अहंकार नसतो.

सकाळी लवकर उठून आन्हिके आटोपली. महाराजांनी सत्संगी महाराजांना 'तुमच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील' आणि मला 'तुमची परिक्रमा पूर्ण व्यवस्थित पार पडेल' असा आशीर्वाद दिला.

आम्ही प्रभासेश्वर महादेव मंदिरात (जिथे सूर्यनारायणाची पत्नी प्रभादेवीने तपश्चर्या केली होती) दर्शन घेतले. पुढे मोलेथा (प्राचीन, जीर्ण मंदिर) येथे गेलो, बद्रिकाश्रम (रमणीय स्थळ) येथे भोजनप्रसादी घेतली. त्यानंतर नंदेरीया (नंदिकेश्वर महादेव - उपज्योतिर्लिंग) आणि गंगनाथ महादेव यमहासेश्वर महादेव (बंद अवस्थेतील मंदिरे) येथे दर्शन घेतले. तेथून आम्ही चांदोद येथे गेलो. या गावात अनेक तीर्थे आहेत. कपिलेश्वर, चंडादित्य, नंदामाता, ऋणमोचन अशी अनेक तिर्थे आहेत. येथून कर्नाली दरम्यान ओरसंग, नर्मदा आणि गुप्त सरस्वती यांचा त्रिवेणी संगम आहे.

कर्नाली: कुबेर भंडारी

आजचा मुक्काम कर्नाली येथील कुबेर भंडारी मंदिरात करण्याचा नवले महाराजांचा विचार होता. हे नर्मदाखंडातील अतिशय संपन्न देवस्थान आहे. परिक्रमावासींची व्यवस्था टेरेसवर असल्यामुळे थंडी आणि गारवा कमालीचा लागत होता.

रात्री सत्संगी महाराज उशिरा आले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे औषधांचा बाजार समोर मांडला. एका गुजराथी तरुणाला त्यांनी आपली 'तुटलेली बरगडी' आणि 'खराब झालेली लिगामेंट' याबद्दल सांगितले. तो 'आराम करायचा' असे म्हणाला, तर सत्संगी महाराज मला आणि नवले महाराजांना उद्देशून म्हणाले, "हे दोघे थांबत नाहीत ना..." तो तरुण म्हणाला, "सोडून द्या यांना." त्यावर सत्संगी महाराज म्हणाले, "बघूया, विचार तोच करतोय. पण सध्या तरी यांच्याबरोबर चालणे भाग आहे."

पहाटे अवघे दोन संडास आणि दोन बाथरूम असल्यामुळे आन्हिके उरकण्यासाठी गर्दी झाली. स्नान, पूजा आटोपून आम्ही मंदिरात दर्शन घेऊन पुढे चालू लागलो.


Labels: Narmada Parikrama, Ranapur, Shinoor, Karnali, Kuber Bhandari, Satsangi Antics, Seva, Police Security, Soubhagya Sundari, Spiritual Travelogue

Search Description: A Marathi travelogue section detailing the Narmada Parikrama from Ranapur to Karnali. It describes the visit to the ancient Tirthas of Shinor (with its police security), the thoughtful service at Kuber Bhandari Temple, the recurrent comic saga of Satsangi Maharaj's 'broken rib' and 'leg ailment,' and the spiritual significance of the journey.

Hashtags: #NarmadaParikrama #Shinoor #Karnali #KuberBhandari #SatsangiMaharaj #NarmadaSeva #PilgrimageLife #DivineBlessings #MahadevTirth #NarmadeHar


२३ नर्मदा परिक्रमा : शिनोर ते कर्नाली : अनसूया माता ते कुबेर भंडारी २३ नर्मदा परिक्रमा : शिनोर ते कर्नाली : अनसूया माता ते कुबेर भंडारी Reviewed by ANN news network on १०/१४/२०२५ ०७:०२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".