विधानसभा लक्षवेधी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथील मुलीच्या मृत्यू प्रकरणी अधिष्ठाता आणि संबंधित डॉक्टर यांची विभागीय चौकशी - गिरीश महाजन

 

रुग्णालयातील यंत्रसामग्री, औषध खरेदी आणि पदभरती प्रक्रिया गतीने करणार 

      नागपूर  : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर  येथे व्हेंटिलेटर अभावी मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि संबंधित डॉक्टर यांची विभागीय चौकशी करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. रुग्णालयात पुरेशी यंत्रसामग्री आणि औषधी असावी तसेच पदभरती याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

      शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. महाजन बोलत होते.

      शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे भरती करतांनाच ती मुलगी गंभीर आजाराने ग्रस्त होती. अतिदक्षता विभागातील सर्व व्हेंटिलेटर गंभीर आजाराच्या रुग्णांसाठी वापरात असल्यामुळे या मुलीला उपचाराकरीता आर्टिफिशिअल मॅन्युअल ब्रिदिंग युनिट (अंबू बॅग) या तात्पुरत्या व्यवस्थेवर ठेवण्यात आले होते. तिचा दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजी मृत्य झाला. या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करुन अहवाल शासनास सादर करण्याबाबत संचालनालयास निर्देश दिले होते. संचालनालयाने तीन डॉक्टरांची समिती गठीत केली. या समितीच्या अहवालानुसार संबंधित अधिष्ठाता यांच्याकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथील अधिष्ठाता पदाचा कार्यभार काढून घेत त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. संबंधित अधिष्ठाता आणि अन्य अधिकारी यांच्याविरूद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

      शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे वर्षभरात जवळपास दहा लाख रुग्ण उपचार घेतात. त्यामुळे येथे पुरेशी पदे असावीत यासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगून मंत्री श्री. महाजन म्हणाले, या रुग्णालयात गट अ ते गट ड संवर्गाकरिता एकूण मंजूर २५१८ पदांपैकी ७१६ पदे रिक्त आहेत व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे गट अ ते गट ड संवर्गाकरिता एकूण मंजूर ९२१ पदांपैकी ३४२ पदे रिक्त आहेत. दोन्ही संस्थांमधील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे उपलब्ध मनुष्यबळातूनबंधित रुग्णालयात प्रभावीपणे रुग्णसेवा पुरविण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमधील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (गट-अ) तसेच सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकारी (गट-ब) या संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचीकार्यवाही सुरु असून पदोन्नती कोट्यातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरु आहे. गट क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे स्पर्धा परिक्षेद्वारे भरण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या निर्देशानुसार टी.सी.एस. या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गट ड संवर्गातील रिक्त पदे जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत भरण्याचे निर्देश संबंधित अधिष्ठाता यांना देण्यात आले आहेत, असे श्री. महाजन यांनी सांगितले

      वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना आवश्यकअसणारी औषधे, सर्जिकल्स साहित्य व तदनुषंगिक बाबींची खरेदी हाफकिन महामंडळामार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यास विलंब झाल्यास तसेच आवश्यकता भासल्यास संस्थेच्या निधीतून 30 टक्के इतका निधी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या खात्यात उपलब्ध निधी, सीएसआर फंड तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त होणाऱ्या निधीमधून स्थानिकस्तरावर औषधे व सर्जिकल साहित्यांची खरेदी करुन रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याचे निर्देश दिले असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

      या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत विरोधी पक्षनेते श्री. पवार यांच्यासह सदस्य सर्वश्री विकास ठाकरे, नाना पटोले, हसन मुश्रीफ, मोहन मते आदींनी सहभाग घेतला.


विधानसभा लक्षवेधी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथील मुलीच्या मृत्यू प्रकरणी अधिष्ठाता आणि संबंधित डॉक्टर यांची विभागीय चौकशी - गिरीश महाजन विधानसभा लक्षवेधी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथील मुलीच्या मृत्यू प्रकरणी  अधिष्ठाता आणि संबंधित डॉक्टर यांची विभागीय चौकशी  - गिरीश महाजन Reviewed by ANN news network on १२/२२/२०२२ ०१:२२:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".