खेडमधील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली; शहराच्या बाजारपेठेत शिरले पाणी
रायगडमध्ये कुंडलिका आणि आंबा नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत
रत्नागिरी/रायगड, (प्रतिनिधी): रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक नद्यांनी धोक्याची आणि इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत खेड तालुक्यात सर्वाधिक १७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडल्याने शहरातील मटण-मच्छी बाजारपेठ परिसरात पाणी शिरले आहे. नगर परिषदेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नारिंगी नदीलाही पूर आल्यामुळे खेड-दापोली मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. दापोली तालुक्यात कुडावळे नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने दापोली-मंडणगड रस्त्यावरील वाहतूकही बंद झाली आहे. तसेच, संगमेश्वरमधील माखजन बाजारपेठेतही पाणी शिरले आहे.
रायगड जिल्ह्यात नद्यांना पूर रायगड जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. रोह्या येथील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे, तर नागोठण्यातील आंबा नदीही इशारा पातळीवरून वाहत आहे. पूरस्थितीच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकिनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Ratnagiri
Raigad
Heavy Rainfall
Jagbudi River
Floods
Monsoon
#Maharashtra #Monsoon #Ratnagiri #Raigad #Floods #JagbudiRiver #WeatherWarning
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: