बोगस कामगार नोंदणी, भ्रष्टाचाराविरोधात कामगार संघटना आक्रमक
मुंबई, (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समितीच्या वतीने १२ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर "लक्षवेधी जन आक्रोश मोर्चा" काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन आणि इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात तसेच बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ७४ नोंदणीकृत कामगार संघटना सहभागी होणार आहेत.ही माहिती महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समितीचे अध्यक्ष सागर तायडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या मोर्चाचे प्रमुख कारण म्हणजे कल्याणकारी मंडळांतर्गत बोगस कामगार नोंदणी आणि त्यातून झालेला भ्रष्टाचार होय. कामगार संघटनांच्या म्हणण्यानुसार, दलालांनी ग्रामसेवक व ठेकेदार यांच्या बनावट सह्या आणि शिक्क्यांचा वापर करून बोगस कामगारांची नोंदणी केली. यासाठी कंत्राटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी प्रत्येक अर्जामागे ठरलेली रक्कम स्वीकारली. यामुळे खऱ्या कामगारांचे अर्ज विविध क्षुल्लक कारणांनी हेतुपुरस्सर नाकारले गेले.
कामगार संघटनांनी या गैरकारभाराविरोधात अनेक पुरावे सादर केले आहेत, मात्र त्यांची दखल घेतली जात नाही. दक्षता पथकाने तपासणी करूनही कोणतीही ठोस कारवाई केली नाही किंवा माहिती जाहीर केली नाही, असा आरोप संघटनांनी केला आहे.
या मोर्चाच्या प्रमुख मागण्यांमध्ये:
नोंदणीकृत कामगार संघटनांकडून बांधकाम कामगारांचे अर्ज स्वीकारले जावेत.
बांधकाम कामगारांना भेटवस्तूंऐवजी रोख रक्कम देण्याच्या २०१४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी.
तालुका कामगार सुविधा केंद्रे बंद करावीत, कारण ती भ्रष्टाचाराची केंद्रे बनली आहेत.
कल्याणकारी मंडळाचे सोशल ऑडिट जाहीर करावे.
कर्नाटक आणि राजस्थानच्या धर्तीवर नोंदणीकृत कामगारांची नावे, गाव आणि त्यांना मिळालेल्या रकमेची माहिती पोर्टलवर जाहीर करावी.
सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वारंवार वेळ आणि तारीख देऊनही चर्चा करण्यास नकार दिल्याने हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने सांगितले आहे.
Workers Protest
Mumbai Protest
Construction Workers
Corruption
Azad Maidan
#WorkersProtest #MumbaiProtest #ConstructionWorkers #AzadMaidan #Corruption #Maharashtra #LabourRights

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: