शेतकऱ्यांच्या मागणीवर मुंबई-दिल्लीमध्ये बैठका घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन
शेतकऱ्यांचे प्रश्न कुटुंबातीलच, काळजी घेऊ - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
पुणे, दि. २४, (प्रतिनिधी): शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, द्राक्ष बागायतदार संघाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या द्राक्ष परिसंवाद व ६५ व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार शंकरराव मांडेकर आणि संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संघाच्या मागण्या लवकरच पूर्ण करण्यासाठी मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय स्तरावरील मागण्यांसाठी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून बैठक लावण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ‘आपण उत्पादित केलेल्या मालासाठी आपली बाजारपेठ कशी निर्माण करू शकतो यावर काम सुरू असून, देशांतर्गत बाजारपेठ खूप मोठी आहे, शेतकऱ्यांनी याकडेही लक्ष द्यावे,’ असे आवाहन त्यांनी केले. ‘ड्रोन फवारणीसाठी राज्य शासन अनुदान देत असून, यात महिला बचत गटांना प्राधान्य दिले जाईल,’ असेही ते म्हणाले.
यावेळी संघाचे अध्यक्ष श्री. भोसले यांनी विविध मागण्या मांडल्या. शेती भाडेकरारावरील स्टॅम्प ड्युटी ५० टक्क्यांवरून १ टक्क्यावर आणावी, ‘१ रुपयात द्राक्ष पीक विमा योजना’ पुन्हा सुरू करावी, तसेच सौरपंप योजनेत १० एचपी मोटारपंप धारकांनाही वीज बिलातून माफी मिळावी, अशा मागण्या त्यांनी केल्या. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘कव्हर क्रॉप पायलट’ योजनेतील जाचक अटी दूर करण्याचीही मागणी त्यांनी केली.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी, “मी स्वतः द्राक्ष बागायतदार आहे, त्यामुळे तुमचे प्रश्न कुटुंबातलेच आहेत. शेतकऱ्यांच्या चांगल्या उत्पन्नासाठी आम्ही काळजी घेऊ,” असे आश्वासन दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कृषीभूषण सुरेश एकनाथ कळमकर आणि द्राक्ष शास्त्रज्ञ कार्लोस फ्लोडी (चिली) यांचा सन्मान करण्यात आला.
Ajit PawarGrape Growers
Maharashtra
Agriculture
Pune
#AjitPawar #GrapeGrowers #Pune #Maharashtra #Agriculture #Farmers

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: