जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटपास मंजुरीनंतरही टाळाटाळ; संतप्त प्रकल्पग्रतांनी केले प्रतिकात्मक भूखंड वाटप

 


पुनर्वसनाचा हक्क मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

उरण (प्रतिनिधी) - गेली ४० वर्षे जेएनपीटी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या शेवा कोळीवाडा येथील मच्छिमार बांधवांचा न्याय्य हक्कासाठीचा लढा आता अधिक तीव्र झाला आहे. पुनर्वसनासाठी १०.४६ हेक्टर जागेला १७ नोव्हेंबर २०२१ रोजी मंजुरी मिळूनही, जेएनपीटी प्रशासन, रायगड जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार भूखंड वाटपास टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रक्षाबंधन या पवित्र दिवशी, कोळी बांधवांनी मंजूर नकाशानुसार 'सिंबॉलिक' ताबा व भूखंड वाटपाचा कार्यक्रम सुरू करून प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन कुदळ मारून व नारळ फोडून करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ इंगळे, नंदकुमार पवार, रमेश कोळी आणि त्यांच्या पत्नी उज्वला कोळी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी सर्व महिला व पुरुषांनी श्री गणेश पूजन केले.

वकील सिद्धार्थ इंगळे यांनी याप्रसंगी बोलताना स्पष्ट मत व्यक्त केले, "लढा अजून संपलेला नाही... तो आता अधिक प्रखर झालेला आहे." त्यांच्या या विधानाने ग्रामस्थांचा निर्धार अधिक दृढ झाल्याचे दिसून आले. गेल्या ४० वर्षांपासून पुनर्वसन न झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते, आणि या 'सिंबॉलिक' वाटप कार्यक्रमातून त्यांनी प्रशासनावर एक प्रकारची चपराक लगावली आहे. या कृतीतून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला असून, जोपर्यंत कायदेशीर भूखंड वाटप होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार कोळी बांधवांनी व्यक्त केला आहे.

यावेळी नंदकुमार पवार, रमेश कोळी, सुरेश कोळी, परमानंद कोळी, मंगेश कोळी, ॲड. विकास शिंदे यांच्यासह समस्त कोळी बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Social Justice, Land Protest, JNPT Project, Fishermen Community

 #JNPT #Uran #LandRights #Koliwada #Protest #SocialJustice #FishermenCommunity

जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटपास मंजुरीनंतरही टाळाटाळ; संतप्त प्रकल्पग्रतांनी केले प्रतिकात्मक भूखंड वाटप जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटपास मंजुरीनंतरही  टाळाटाळ; संतप्त प्रकल्पग्रतांनी केले प्रतिकात्मक भूखंड वाटप Reviewed by ANN news network on ८/१०/२०२५ ०८:१०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".