चिंचवड (प्रतिनिधी) - हिंजवडी-पांडवनगर येथे सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलनाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी जमलेल्या शेतकरी आणि नागरिकांना हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबाजी पांढरे यांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करत, अखिल भारतीय छावा संघटनेने त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे स्थानिक शेतकरी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
७ ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी २ ते ३ च्या दरम्यान पांडवनगर येथे शेतकरी, पीएमआरडीएचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्यासोबत अतिक्रमणाबाबत चर्चा करत होते. याच वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबाजी पांढरे यांनी अचानक चर्चेत हस्तक्षेप करून काही शेतकऱ्यांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्यासोबत अत्यंत खालच्या भाषेत बोलले, असा दावा संघटनेने केला आहे. उपस्थित नागरिकांनी या कृत्यास विरोध केला असता, पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही करण्यात आला आहे.
अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश महासचिव मनोज मोरे यांनी या घटनेचा निषेध करत म्हटले आहे की, "शेतकऱ्यांशी केलेली अरेरावी आणि शिवराळ भाषा अशोभनीय आहे. सरकार आणि पीएमआरडीएचा कारभार शेतकऱ्यांना मारणारा आणि बिल्डर लॉबीला तारणारा आहे." या संदर्भात त्यांनी नुकतीच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. जर या अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही, तर छावा संघटनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटेल, असा इशाराही त्यांनी दिला.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना अखिल भारतीय छावा संघटना प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे पाटील म्हणाले, "शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या या मग्रूर पोलीस अधिकाऱ्यावर गृहमंत्र्यांनी कडक कारवाई करावी." शांतपणे चर्चा सुरू असताना अधिकाऱ्याने वापरलेली भाषा अत्यंत चुकीची असल्याचेही त्यांनी नमूद केले. या दोषींवर कारवाई न झाल्यास अखिल भारतीय छावा संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला.
या पत्रकार परिषदेला मनोज मोरे, मच्छिंद्र चिंचोळे, अक्षय बोडके, प्रशांत फड, सचिन लिमकर यांच्यासह अनेक अन्यायग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.
Protest, Police Misconduct, Farmers' Rights, Hinjawadi
#PunePolice #Hinjawadi #FarmersProtest #PoliceMisconduct #ChhavaSanghatana #PMRDA #JusticeForFarmers

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: