- मालवणमध्ये ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावरून सागराला मानाचे श्रीफळ अर्पण
- वेंगुर्ले येथे शासकीय मानाचा नारळ अर्पण करून सण साजरा
- सावंतवाडीच्या मोती तलावात सुवर्ण नारळाची पूजा
- मच्छिमार आणि व्यापाऱ्यांनी मासेमारी आणि व्यवसायात भरभराटीसाठी घातले साकडे
सिंधुदुर्ग, (प्रतिनिधी): नारळी पौर्णिमेचा सण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि कुडाळ यांसह इतर ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
मालवण: शिवकालीन परंपरा लाभलेला ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सव मालवणमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो मालवणवासी, मच्छिमार आणि व्यापाऱ्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावरून सागराला मानाचे श्रीफळ अर्पण करून उत्सवाची सुरुवात झाली. यावेळी तोफेची सलामीही देण्यात आली. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत स्थानिक नागरिक, व्यापारी आणि मच्छिमार बांधवांनी 'मालवणच्या व्यापार-उद्योगाला आणि मासेमारीला बरकत दे,' असे साकडे समुद्राच्या चरणी घातले.
वेंगुर्ले: वेंगुर्ले येथेही सागराला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली. वेंगुर्ले शहरातील नागरिकांबरोबरच पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी आणि तहसीलदार ओंकार ओतारी यांनी शासकीय मानाचा नारळ विधिवत पूजा करून सागराला अर्पण केला.
सावंतवाडी: सावंतवाडीच्या संस्थानकालीन मोती तलावात दरवर्षीप्रमाणे यंदाही नारळ अर्पण करण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते मानाच्या सुवर्ण नारळाची पूजा करून तो तलावात अर्पण करण्यात आला.
कुडाळ: कुडाळमध्येही भंगसाळ नदीला रिक्षा रॅलीने जाऊन श्रीफळ अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार निलेश राणे यांची उपस्थिती होती.
Narali Pournima
Sindhudurg
Malvan
Vengurla
Sawantwadi
#NaraliPournima #Sindhudurg #Malvan #MaharashtraFestival #CoastalTraditions #Vengurla #Sawantwadi
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: