पुणे, (प्रतिनिधी): भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत शनिवारी (९ ऑगस्ट २०२५) आयोजित 'व्हायोलिन गाते तेव्हा' या कार्यक्रमामुळे पुण्यातील संगीत रसिकांना एक अविस्मरणीय संगीत सोहळा अनुभवता आला. सौ. चारुशीला गोसावी यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमात अभंग, भावगीत, गझल, लोकगीत तसेच हिंदी आणि मराठीतील १६ लोकप्रिय रचनांना व्हायोलिनच्या स्वरांनी नवीन रंगत दिली.
'देवाचिये द्वारी' या संत ज्ञानेश्वरांच्या रचनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर 'स्वर आले दुरुनी', 'माझ्या रे प्रीती फुला', 'मर्म बंधातली ठेव', 'लागा चुनरी मे दाग', 'मधुबन मे राधिका' आणि 'इन्ही लोगो ने' यांसारखी गाणी सादर झाली. तसेच 'मलमली तारुण्य माझे' यासारख्या लोकप्रिय गझल आणि 'जाने कहा गये वो दिन..' हे गाणेही विशेष कौतुकास पात्र ठरले. प्रत्येक रचनेला शास्त्रीय संगीताची जाण आणि भावस्पर्शी अभिव्यक्ती लाभल्याने उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) येथील सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सोबत अमृता दिवेकर (सिंथेसायझर), प्रसन्न बाम (हार्मोनियम), अभिजित जायदे (तबला), उद्धव कुंभार (तालवाद्य), वैष्णवी काळे (व्हायोलिन साथ) यांनी अप्रतिम साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्राची घोटकर यांनी केले. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल समाधान व्यक्त करत कलाकारांचा सत्कार केला. हा कार्यक्रम या सांस्कृतिक उपक्रमाचा २५६ वा सोहळा होता.
Violin Gate Tevha
Charushila Gosavi
Indian Vidya Bhavan
Infosys Foundation
Pune Music Event
#ViolinGateTevha #PuneConcert #IndianClassicalMusic #CharushilaGosavi #PuneEvents #InfosysFoundation

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: