पुणे - पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने एका विधीसंघर्षीत बालकास (अल्पवयीन) ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक मोटारसायकल आणि एक रिक्षा जप्त केली आहे. यामुळे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेले घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २,६५,००० रुपये आहे.
४ ऑगस्ट २०२५ रोजी युनिट-४ चे पथक खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस उप-निरीक्षक वैभव मगदुम आणि त्यांच्या टीमला एका बातमीदाराकडून माहिती मिळाली की, विश्रांतवाडी येथे घरफोडी करणारा एक आरोपी येरवडा येथील कॉमर्स झोन चौकात थांबला आहे. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांना कळवण्यात आल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना तिथे मिळालेल्या वर्णनाचा एक अल्पवयीन मुलगा दिसला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान त्याने त्याच्या दोन साथीदारांसोबत केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याने सांगितले की, त्यांनी हडपसरमधून एक मोटारसायकल चोरून विश्रांतवाडी येथील एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून सोने-चांदीचे दागिने चोरले आणि नंतर मोटारसायकल पुन्हा तिच्या जागी ठेवली. तसेच, त्यांनी हडपसरमधून एक रिक्षा चोरून विश्रांतवाडी येथे दुसऱ्या घरातून नऊ घड्याळे आणि दोन मोबाईल चोरले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक घड्याळ, मोटारसायकल (किंमत १ लाख रुपये) आणि रिक्षा (किंमत १.५ लाख रुपये) जप्त केली आहे.
ही कारवाई अपर आयुक्त पंकज देशमुख,उप-आयुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पथकात सहायक निरीक्षक अमर कदम, उप-निरीक्षक वैभव मगदुम यांच्यासह अनेक अंमलदारांचा सहभाग होता.
Crime News, Pune Police, Burglary, Juvenile Delinquency, Stolen Property Recovery.
#PunePolice #CrimeUnit4 #Burglary #JuvenileCrime #StolenGoods #PoliceAction #Vishrantwadi

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: