नियम पाळून सहकार्य करण्याचे प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि. २६ (प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी प्रवाशांची गर्दी आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन सर्व आवश्यक नियोजन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिवहन विभाग सज्ज झाला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार, आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांच्यात समन्वय साधून काम करण्यावर भर देण्यात आला. मुंबई-पुणे मार्गावरून मोठ्या संख्येने येणाऱ्या बसेसमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना एसटी विभागाला देण्यात आल्या. तसेच, महामार्ग आणि तालुका मुख्यालयांना जोडणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेशही सर्व निरीक्षकांना देण्यात आले आहेत.
रेल्वेमार्गाने येणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकांवर नवे रिक्षा थांबे आणि मदत व तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या प्रवेशद्वारांवर सार्वजनिक बांधकाम विभाग व आरोग्य विभागामार्फत स्वागत आणि मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. विविध संघटनांच्या माध्यमातून रिक्षा आणि बस चालकांना प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वर्तन करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.
या बैठकीत वाहनचालकांना पावसाळ्यात काळजीपूर्वक वाहन चालवण्याचे, नो पार्किंगमध्ये गाडी न लावण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Ganeshotsav
Sindhudurg
Transport Department
Nitesh Rane
Traffic Management
#Ganeshotsav #Sindhudurg #TrafficManagement #Transport #NiteshRane

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: