लवकरच गट 'क' लिपिक व टंकलेखक परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर होणार; MPSC च्या कारभारावर आमदार हेमंत रासने यांची लक्षवेधी
"न्यायालयाच्या निकालानंतर लगेचच निकाल जाहीर करू" - मंत्री शेलार
मुंबई/ पुणे, ११ जुलै २०२५: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट 'क' लिपिक व टंकलेखक परीक्षेचा (७००७ पदे) अंतिम निकाल लवकरच जाहीर होणार आहे. यासंदर्भात कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडत आयोगाच्या ढिसाळ कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर, न्यायालयाने निकाल जाहीर करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे नुकतेच सांगितले असून, न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळताच परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.
न्यायालयीन अडथळा दूर:
२०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ७००७ पदांसाठीच्या या परीक्षेचा अंतिम निकाल काही विद्यार्थी न्यायालयात गेल्याने रखडला होता. ९ जुलै २०२५ रोजी न्यायालयाने निकाल जाहीर करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे, आता न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
आमदार रासने यांच्या मागण्या:
आमदार रासने यांनी सभागृहात सांगितले की, MPSC च्या कार्यपद्धतीतील ढिसाळपणा ही एक गंभीर समस्या आहे. निकाल वेळेत लागत नाहीत, पात्रता यादी वेळेत जाहीर होत नाही, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान होते. त्यांनी MPSC साठी निकालासाठी बंधनकारक कालमर्यादा द्यावी, उत्तरदायित्व निश्चित करणारी स्वतंत्र समिती किंवा लोकपाल नेमावा, विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्र व कायदेविषयक सल्ला देणारे केंद्र स्थापन करावे, तसेच UPSC प्रमाणे 'MPSC प्रतिभा सेतु' उपक्रम सुरू करावा, अशी मागणी केली.
मंत्री शेलार यांचे आश्वासन:
मंत्री आशिष शेलार यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, MPSC ही एक स्वतंत्र संस्था असली तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिजनमधील '१५० दिवस सेवा सुधार कार्यक्रम' राबवला जात आहे. यामध्ये MPSC संदर्भातील सुधारणा, निकालातील विलंब आणि भरती प्रक्रियेतील त्रुटी यांचा समावेश आहे. त्यामुळे आमदार रासने यांच्या मागण्यांनुसार सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या निर्णयामुळे पुणे शहरासह राज्यातील हजारो स्पर्धा परीक्षा उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: