हिंजवडीसह ७ गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करा : खासदार बारणे

 


उपमुख्यमंत्री शिंदे यांचे नगरविकास विभागाला तातडीच्या कार्यवाहीचे आदेश 

पिंपरी, ७ जुलै २०२५: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दी लगत असलेली हिंजवडी, माण, मारुंजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे ही सात गावे महापालिकेत समाविष्ट करावीत, त्यामुळे या गावांचा नियोजनबद्ध विकास होईल, असे साकडे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे. यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना समावेशाची तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.  

खासदार बारणे आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी सोमवारी (७ जुलै) मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्थानिक नागरिक, आयटीएन्स यांच्यासोबत भेट घेतली. यावेळी त्यांनी आयटी पार्कची जलकोंडी आणि वाहतूक कोंडी याबाबतची सविस्तर माहिती देत मागणीचे निवेदन सादर केले.

अनधिकृत बांधकामे, मूलभूत सुविधांचा अभाव आणि वाढते प्रदूषण 

खासदार बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे की, महापालिका हद्दीलगत असलेल्या या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. मात्र, त्याठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतींना नागरिकांना सुविधा देणे शक्य होत नाही. आयटीनगरी असलेल्या हिंजवडीचा विकास होणे गरजेचे आहे, तसेच नागरिकांनीही गावांचा महापालिकेत समावेश करण्याची मागणी केली आहे. मावळ, मुळशी तालुक्यात असलेली ही गावे महापालिकेच्या अगदी जवळ आहेत.  

या भागात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. नैसर्गिक नाले बुजविले जात असून, वळविले जात आहेत, त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात हिंजवडी जलमय झाली होती. नदीलाही गटारीचे स्वरूप आले आहे. या गावांची जबाबदारी पीएमआरडीएकडे असली तरी त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याने बांधकामावर नियंत्रण ठेवता येत नाही, ज्यामुळे परिसराला बकालपणा येत आहे. वाहतूक कोंडी आणि विविध समस्यांमुळे या भागातील नागरिक पिंपरी-चिंचवडमध्ये राहण्यास प्राधान्य देत आहेत.

आयटी पार्क आणि क्रीडा स्टेडियमची ओळख 

हिंजवडी आणि माण या क्षेत्रात मोठे आयटी पार्क असून, देशभरातील नागरिक येथे येतात. गहुंजे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम आहे. मात्र, या गावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुरेसे नसल्याने अशुद्ध पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते, ज्यामुळे पवना नदीचे प्रदूषण वाढले आहे. वाढते नागरीकरण, सुविधांचा अभाव आणि वाहतुकीची समस्या या गोष्टींचा विचार करून ही गावे महापालिकेत येण्याची आवश्यकता आहे.

या भागाच्या विकासासाठी आणि नागरिकांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात, तसेच अनाधिकृत बांधकाम रोखण्याच्या दृष्टिकोणातून हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे आणि गहुंजे या गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश करावा आणि या भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली आहे.

Hinjawadi, Pimpri Chinchwad Municipal Corporation, PCMC, MP Shrirang Barne, Deputy CM Eknath Shinde, Urbanization, Infrastructure Development, Villages Inclusion, Pune

 #Hinjawadi #PCMC #PimpriChinchwad #ShrirangBarne #EknathShinde #UrbanDevelopment #Pune #ITPark #Infrastructure #Maharashtra 

हिंजवडीसह ७ गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करा : खासदार बारणे  हिंजवडीसह ७ गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करा :  खासदार बारणे Reviewed by ANN news network on ७/०७/२०२५ ०९:३७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".