मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष: गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण, सहा महिन्यात ५.८८ कोटींचे अर्थसहाय्य

 


सातारा, दि. २४ जुलै २०२५: राज्यातील गरजू नागरिकांना दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत (Chief Minister Medical Assistance Cell) आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते. हा कक्ष केवळ वैद्यकीय मदतच नाही, तर नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या नागरिकांनाही आर्थिक सहाय्य पुरवतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागू नये, हा या कक्षाचा मूळ उद्देश आहे. सातारा जिल्ह्यातून १ जानेवारी ते ३० जून २०२५ दरम्यान ६७९ रुग्णांना ५ कोटी ८७ लाख ९९ हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

कक्षाचे उद्दिष्ट आणि कार्यक्षेत्र

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष राज्यातील नैसर्गिक आपत्तींमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करतो. यामध्ये जातीय दंगलीत मृत व्यक्तींच्या वारसदारांना, दुखापत झालेल्या किंवा मालमत्तेचे नुकसान झालेल्यांना, तसेच दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या व दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत दिली जाते. याव्यतिरिक्त, रुग्णांना उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी, अपघाती मरण पावलेल्या (मोटार/रेल्वे/विमान/जहाज अपघात वगळता) व्यक्तींच्या वारसांनाही मदत पुरवली जाते. विविध संस्थांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चर्चासत्रे आणि संमेलने आयोजित करण्यासाठी, तसेच शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्यासाठी अंशतः आर्थिक मदत करणे हेही या कक्षाचे उद्दिष्ट आहे.

सेवा सुलभ करण्यासाठी जिल्हास्तरीय कक्षांची स्थापना

ग्रामीण भागातील गरजवंत गरीब रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी वैद्यकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी मंत्रालयातील मुंबई स्थित कक्षात येण्याची गरज भासू नये. सर्व अर्ज प्रक्रिया त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातच पार पाडता यावी यासाठी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या दुसऱ्या मजल्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यरत आहे. स्थानिक स्तरावर अर्ज दाखल करणे, त्यांची पूर्तता करणे आणि अर्जाचा पाठपुरावा करणे या बाबी सुकर व्हाव्यात, जेणेकरून रुग्ण अथवा नातेवाईकांचा मुंबई कक्षाकडे होणारा प्रवास व वेळेचा अपव्यय कमी करता यावा.

जिल्हास्तरीय कक्ष स्थापन करण्यामागची भूमिका अशी आहे की, मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेची संलग्नित रुग्णालयांमधील सोयी सुविधांची समग्र माहिती तसेच केंद्र व राज्य शासनाद्वारा राबविण्यात येणाऱ्या इतर आरोग्य योजना व कार्यक्रम या संबंधित सर्व माहिती व संदर्भित सेवा स्थानिक पातळीवरच सहज उपलब्ध व्हाव्यात.

इतर आरोग्य योजनांशी समन्वय

  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना: या योजनेंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेल्या रुग्णांना जिल्हा समन्वयक यांच्या माध्यमातून संलग्नित रुग्णालयात प्रवेशित करण्याबाबत कळवण्यात येते.

  • धर्मदाय रुग्णालये: धर्मदाय रुग्णालयात प्रवेशित असलेल्या रुग्णांच्या बाबतीत जिल्हा धर्मदाय आयुक्त कार्यालयातून जिल्ह्यातील उपलब्ध धर्मदाय शय्या संबंधित माहिती घेऊन त्यानुसार रुग्णास रुग्णालयात प्रवेशित करण्याबाबत तथा सवलतीच्या दराने अथवा मोफत उपचार उपलब्ध करून देण्याकरता लेखी स्वरूपात कळविण्यात येते.

  • राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK): या अंतर्गत ० ते १८ वयापर्यंतच्या रुग्णांकरिता योजनेतील विहित व्याधी विकार अनुरूप मोफत उपचार केले जातात. पात्र रुग्णांना जिल्ह्यातील योजनेची संलग्नित रुग्णालयात संदर्भित करण्यात येते.

उपरोक्त योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या अर्थात या योजनांच्या निकषांच्या कक्षा बाहेरील रुग्णांनाच मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे वैद्यकीय उपचार अर्थसहाय्य दिले जाते, अशी मुख्यमंत्री सहायता कक्षाची कार्यप्रणाली आहे.

मुख्यमंत्री सहायता कक्षाकडून मदत मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील अर्ज.

  • रुग्ण दाखल असलेल्या रुग्णालयातील रुग्णाचा जिओ टॅग फोटो.

  • निदान व उपचारासाठी लागणारे वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक (खाजगी रुग्णालयात असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दराप्रमाणे करून घेणे बंधनकारक).

  • तहसीलदार कार्यालयाद्वारे चालू आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला (१ लाख ६० हजार प्रतिवर्षीपेक्षा उत्पन्न कमी असणे आवश्यक).

  • रुग्णाचे आधार कार्ड (लहान बाळाच्या बाबतीत बालकाच्या मातेचे आधार कार्ड).

  • रुग्णाचे रेशन कार्ड.

  • अर्जदाराचे आधार कार्ड.

  • संबंधित व्याधी, विकार, आजाराचे संबंधित निदानात्मक तथा उपचारात्मक बाबींची कागदपत्रे.

  • अपघातग्रस्त रुग्णांच्या बाबतीत एफ.आय.आर. रिपोर्ट.

  • अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अपेक्षित असलेल्या रुग्णांसाठी विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीची मान्यतेचे कागदपत्रे.

या आजारांसाठी मिळते मदत

कॉक्लियर इम्प्लांट, अंतस्थ कर्ण रोपण शस्त्रक्रिया (वय वर्ष २ ते ६), हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, अस्थी मज्जा प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, खुब्याचे प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, कर्करोग औषधोपचार, किरणोपचार, अस्थिबंधन, नवजात शिशूचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, रस्ते अपघात (दुचाकी), लहान बालकांच्या संबंधित शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, जळीत रुग्ण, विद्युत अपघात, विद्युत जळीत रुग्ण यावर मुख्यमंत्री सहायता निधी कक्षा अंतर्गत अर्थसहाय्य दिले जाते.

सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनातील दुसऱ्या मजल्यावर कार्यरत असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षास सातारा जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी भेट द्यावी. कक्षातील वैद्यकीय अधिकारी तसेच त्यांचे सहकारी अर्थसहाय्याच्या मदतीसाठी सहकार्य करतील. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष हे महाराष्ट्रातील गरजू रुग्णांच्या उपचारासाठी उचललेले शासनाने महत्त्वाचे आणि संवेदनशील पाऊल आहे. पात्रता व निकषांच्या स्पष्टतेमुळे ही योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. या कक्षाच्या माध्यमातून मिळणारी मदत खरोखरच अनेक गरजू कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत आहे.


Chief Minister Medical Assistance Cell, Maharashtra Government, Financial Aid, Healthcare, Satara District, Medical Treatment, Disaster Relief, Public Welfare, CM Sahayata Nidhi

#CMMedicalAid #Maharashtra #Healthcare #FinancialAssistance #Satara #PublicHealth #MedicalSupport #CMOffice #AshaChaKiran

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष: गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण, सहा महिन्यात ५.८८ कोटींचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष: गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण, सहा महिन्यात ५.८८ कोटींचे अर्थसहाय्य Reviewed by ANN news network on ७/२४/२०२५ १२:०३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".