मुंबई, १ मे : भारताच्या जीडीपीमध्ये लवकरच क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल, असा विश्वास व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ (व्हेव्ज) चे भव्य उद्घाटन केले. भारताची ऑरेंज इकॉनॉमी – कंटेंट, क्रिएटिव्हिटी आणि कल्चर या तीन स्तंभांवर उभी असून, अॅनिमेशन आणि ग्राफिक्स क्षेत्रात भारतासाठी अफाट संधी असल्याचे ते म्हणाले.
मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, एस. जयशंकर, एल. मुरुगन तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह देशविदेशातील मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान म्हणाले, “भारतीय चित्रपट आज १०० हून अधिक देशांमध्ये पोहोचले आहेत. जागतिक प्रेक्षक त्याचा आस्वाद घेत आहेत. भारतीय कंटेंटचे सबटायटलसह जगभरात स्वागत होते, हे आपल्या सिनेसृष्टीचे सामर्थ्य आहे.” त्यांनी यंत्रमानवतेच्या युगात मानवाला संवेदनशील आणि सर्जनशील बनविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
भारतीय सर्जनशीलता ही केवळ तंत्रज्ञानापुरती मर्यादित न राहता संगीत, नृत्य, कला यांचाही समावेश करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “भारताकडे हजारो वर्षांचा कथांचा ठेवा आहे, तो नव्या माध्यमांतून जगभर पोहोचवणे हे आपले उद्दिष्ट असायला हवे,” असेही ते म्हणाले.
भारत सर्जनशील महासत्ता होण्यासाठी सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“करमणूक आणि क्रिएटिव्ह क्षेत्र हे आता विकासाचे नवीन इंजिन ठरत आहे. महाराष्ट्र या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारत जागतिक सर्जनशील महासत्ता म्हणून उदयास येत असून, व्हेव्ज परिषद ही एक चळवळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांनी मुंबईतील चित्रनगरीतील ५०० एकरपैकी १२० एकर जागेत अॅनिमेशन, गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी खास स्टुडिओ इकोसिस्टम तयार करण्याचे संकेत दिले. यासाठी राज्य शासन धोरणात्मक पावले उचलणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी – अश्विनी वैष्णव यांची घोषणा
केंद्रीय रेल्वे व माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले की, देशातील पहिल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची स्थापना मुंबईत होणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट आणि अॅडोबी या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य या संस्थेस मिळणार असून, हे भारताला जागतिक सर्जनशील केंद्र बनविण्याकडे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.
कलावंतांचा सहभाग आणि सिनेमा दिग्गजांना गौरव
प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. एम.एम. किर्वाणी, श्रेया घोषाल आणि मांगली यांनी स्वागत गीत सादर केले. या मंचावर सल्लागार मंडळात मोहनलाल, हेमामालिनी, रजनीकांत, एस.एस.राजामौली, रणबीर कपूर, भूमी पेडणेकर, आमिर खान आदी उपस्थित होते.
या वेळी गुरुदत्त, पी. भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक आणि सलील चौधरी यांच्या योगदानाची आठवण ठेवत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
#CreativeEconomy
#WAVES2025
#NarendraModi
#IndianGDP
#AnimationIndustry
#IndianCinema
#EntertainmentSummit
#MumbaiEvents
#MakeInIndia
#DigitalIndia

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: