पर्यटन आणि उद्योग क्षेत्रातून रत्नागिरीचा विकास होणार - उदय सामंत

 



66 व्या महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त पालकमंत्र्यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

साडेतीनशे कोटींचा पांढरा समुद्र ते मिऱ्या बंधारा होणार पर्यटन आकर्षण

पालकमंत्री डॉ. सामंत यांनी आपल्या भाषणात म्हटले की, "विविध क्षेत्रांमध्ये निधी उपलब्ध करून देण्याचे काम महाराष्ट्र शासन करत आहे. त्यातला एक अभिनव प्रकल्प रत्नागिरीमध्ये होत आहे. पांढरा समुद्र ते मिऱ्या हा साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून होणारा बंधारा भविष्यात महाराष्ट्रातील, देशातील तसेच परदेशातील पर्यटकांनादेखील आकर्षित करेल. अशा पद्धतीचे पर्यटन स्थळ वर्षभरात साकार करत आहोत."

त्यांनी पुढे म्हटले, "जिल्ह्यातील विकासात्मक प्रकल्पांच्या वाढीसाठी रत्नागिरीकरांचे सहकार्य आवश्यक आहे. ते सहकार्य करण्याचा संकल्प आज महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांनी मिळून करू."

मराठी भाषेच्या अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार

पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा देऊन, महाराष्ट्र स्थापनेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

"रत्नागिरी जिल्हा हा साहित्यिकांचा जिल्हा आहे. रत्नागिरी तालुक्यात असलेले केशवसुत स्मारक, ज्या मालगुंडमध्ये केशवसुतांचा जन्म झाला, त्या गावाला पुस्तकांचे गाव म्हणून जाहीर करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. नुसता निर्णय घेतला नाही, तर त्याची अंमलबजावणी देखील झाली आहे," असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीतून 360 कोटी निधी 100 टक्के खर्च

गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 360 कोटींचा निधी 100 टक्के खर्च केल्याची माहिती देत, डॉ. सामंत म्हणाले, "या वर्षीदेखील महाराष्ट्र शासनाने अधिकची भर टाकली आहे. तोदेखील आम्ही 100 टक्के खर्च करू, हा विश्वास मी रत्नागिरीमधील तमाम नागरिकांना देतो."

पर्यटन विकासासाठी विशेष प्रयत्न

"रत्नागिरी शहर हे ऐतिहासिक शहर आहे. पर्यटनाच्या दृष्टीने शहराची वाढ व्हावी, यासाठी महाराष्ट्रातील सर्वात देखणी शिवसृष्टी शहरामध्ये उभी राहिली. शिवसृष्टीचे लोकार्पण झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 20 हजार महाराष्ट्रातील, परदेशातील नागरिकांनी या पर्यटनस्थळाला भेट दिली आहे," असेही त्यांनी सांगितले.

त्यांनी पुढे म्हटले, "छावा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दीडवर्ष आधी शहरामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये आपल्याला यश आले आहे. हजारो पर्यटकांनी पुतळ्याला भेट दिलेली आहे. देशातला पहिला थ्रिडी मल्टीमीडिया शो हा रत्नागिरीमध्ये तयार केला. सुमारे 20 कोटी रुपये खर्च केले आणि या दीड महिन्यामध्ये सुमारे 5 हजार पर्यटकांनी आणि विशेषत: त्याच्यामध्ये विदेशातील पर्यटकांनी हा शो पाहिला."

पालकमंत्र्यांनी आरेवारे समुद्र किनाऱ्यासमोर 96 एकरमध्ये मोठे कृषी पर्यटन विकसित करण्याच्या योजनेची माहिती दिली. तसेच, एडव्हँन्चर पार्कसाठी नियोजन मंडळातून पहिल्या टप्प्यात 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचेही सांगितले.

उद्योग क्षेत्रात रत्नागिरीची उत्तुंग भरारी

उद्योग क्षेत्रातही रत्नागिरीने उत्तुंग भरारी घेतल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, "रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोका कोला सारखा प्रकल्प 2 महिन्यांमध्ये कार्यान्वित होत आहे. आपल्या रत्नागिरी तालुक्यात व्हीआयटी सेमी कंडक्टर कंपनी आणि धीरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर आणि निबे डिफेन्स क्लस्टर असे 30 हजार कोटींचे प्रकल्प पुढच्या दोन वर्षांत उभे राहणार आहेत आणि त्यामधून 20 हजार मुला-मुलींना रोजगार मिळणार आहे."

उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिसांचा गौरव

कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सामंत यांनी परेड निरीक्षण केले. पोलीस दलांनी संचलन करून सलामी दिली. परेड कमांडर परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी निखील पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन पार पडले.

उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह सुधाकर रहाटे, संजय मुरकर, दिपक पवार, महेश मुरकर, राजेंद्र सावंत, नितीन डोळस, दिनेश आखाडे, विजय मोरे, प्रकाश झोरे, सोनाली शिंदे, दिपक ओतारी, मिलिंद कदम, प्रितेश शिंदे, संतोष सडकर, रमेश चव्हाण यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे या कार्यक्रमांतर्गत स्पर्धांमध्ये निवड झालेल्या राधिका दुसार व आराध्या टाकळे यांचाही सन्मान करण्यात आला.

कुलिंग व्हॅनचे लोकार्पण

सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत जिल्ह्यातील आंबा उत्पादकांसाठी आंबा वाहतुकीकरिता पणन विभागामार्फत घेण्यात आलेल्या कुलिंग व्हॅनचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री डॉ. सामंत यांनी या व्हॅनची पाहणी केली व ते थेट चालकाच्या जागी बसून, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना सोबत घेऊन काही अंतर ही व्हॅन स्वतः चालविली.

कार्यक्रमाला नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांच्यासह मोठी संख्या उपस्थित होती.

.......................................

#MaharashtraDay 

#Ratnagiri 

#UdaySamant 

#TourismDevelopment 

#IndustrialGrowth 

#JobCreation 

#CoastalDevelopment 

#ShivSrushti 

#GovernmentInitiatives 

#Development 

#MaharashtraFoundationDay 

#InvestmentInRatnagiri 

#EconomicGrowth 

#RegionalDevelopment 

#CoastalTourism

पर्यटन आणि उद्योग क्षेत्रातून रत्नागिरीचा विकास होणार - उदय सामंत पर्यटन आणि उद्योग क्षेत्रातून रत्नागिरीचा विकास होणार -  उदय सामंत Reviewed by ANN news network on ५/०१/२०२५ ०५:३४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".