‘नृत्यास्मि’च्या दशकपूर्ती सोहळ्यात रसिक मंत्रमुग्ध
पुणे : ‘नृत्यास्मि स्कूल ऑफ कथक’च्या दशकपूर्ती निमित्ताने आणि आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित ‘घुंगरू टू ग्लोरी’ या भव्य कथकनृत्य सादरीकरणाने पुण्यातील रसिकांची मनं जिंकली. पारंपरिक नृत्यशैलीच्या मोहक रचनांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या साधनेचे मनोवेधक दर्शन घडवले.
कार्यक्रमाचे आयोजन पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन (घोले रस्ता, पुणे) येथे करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ कथक नृत्यगुरू पंडिता मनीषा साठे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास संचारला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली. त्यानंतर सादर झालेली ‘एकात्मन’ ही सामूहिक नृत्यरचना विशेष लक्षवेधी ठरली. विविध लयकारी, तिहाई, ताट आणि अभिनय यांची रंगतदार मांडणी रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उचलून धरली.
कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन संस्थेच्या संस्थापक अदिती कुलकर्णी यांनी आत्मीयतेने केले. त्यांनी ‘नृत्यास्मि’च्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा, विद्यार्थ्यांच्या जिद्द आणि समर्पणाचा, आणि कथकसाधनेतील सातत्याचा उजाळा दिला.
डॉ. अनुराधा दिवाण यांनी आभार प्रदर्शन करत सर्व नर्तक, पालक, आणि उपस्थित रसिकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या समाप्तीप्रसंगी अदिती कुलकर्णी म्हणाल्या, “कथक नृत्य ही केवळ एक कला नसून ती शिस्त, साधना आणि संस्कृती यांचे प्रतीक आहे. ‘नृत्यास्मि’ संस्थेचा हा प्रवास भविष्यातही नव्या पिढीला घडवतच राहील, याची खात्री आहे.”
‘घुंगरू टू ग्लोरी’ कार्यक्रमाने एका दशकातील सांस्कृतिक प्रवासाचा सुंदर थोडक्यात आलेख सादर केला. रसिकांनी या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले असून, कथकनृत्यप्रेमींमध्ये यामुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे.
...................................
#KathakDance
#IndianClassicalDance
#GhungrooToGlory
#Nrutyasmi
#AditiKulkarni
#ManishaSathe
#PuneEvents
#DanceIndia
#InternationalDanceDay
#CulturalHeritage
#KathakPerformance

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: