पुणे: "लहान मुलांनी खेळ वेळेवर खेळले नाहीत, तर त्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना पारंपरिक खेळांकडे वळवण्यासाठी प्रयत्न करावेत," असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी बुधवारी केले.
पुणे पुस्तक महोत्सव आणि संवाद पुणे यांच्या वतीने आयोजित 'आपले अंगण' कार्यक्रमात रेवा पांडे लिखित 'पारंपरिक खेळ' या पुस्तकाचे प्रकाशन शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात डॉ. काळकर बोलत होते. किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, संवाद पुणेचे सुनील महाजन, लेखिका रेवा पांडे आदी उपस्थित होते. या पुस्तकात विटी दांडू, भातुकली, लगोरी, चाक फिरवणे, भोवरा फिरवणे अशा जुन्या भारतीय खेळांची माहिती मानसशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या रेवा पांडे यांनी सविस्तरपणे नमूद केली आहे.
डॉ. काळकर म्हणाले, "खेळाच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्याला कळतात. आपल्या क्षमता किंवा उणीवा यांची जाणीव होते. व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी हातभार लागतो. लहान मुलांनी खेळाला प्राधान्य दिल्यास, त्यांचे आरोग्य तंदुरुस्त राहण्यासोबतच भविष्यात करिअरच्या संधी उपलब्ध होण्यास मदतच होणार आहे. त्यामुळे मुलांनी मैदानी खेळ खेळण्यावर भर देण्याची गरज आहे. हे पुस्तक सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वितरित करण्याची आवश्यकता आहे."
शकुंतला खटावकर म्हणाल्या, "केवळ पुस्तक वाचून चालणार नाही, तर सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचून, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. सद्यस्थितीत पालक आणि मुले एकत्रित खेळत दिसत नाही, ही फार गंभीर परिस्थिती आहे. लहान मुलांनी खेळांमध्ये जायला हवे. त्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यायला हवा. प्रेरणा भरपूर मिळत आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रयत्न होताना दिसत नाही. पारंपरिक खेळांचे पुस्तक उपलब्ध केल्याबद्दल रेवा पांडे यांचे अभिनंदन करायला हवे."
राजेश पांडे यांनी पुस्तक तयार करण्यामागची कल्पना सांगितली. "सध्याच्या मुलांना या पुस्तकाची नितांत गरज आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले. हे पुस्तक गुरुवार, २२ मे पासून सुरू होणाऱ्या पुणे बाल पुस्तक जत्रेत सहभागी होणाऱ्या सर्व मुलांना मोफत देण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे यांनी केले, तर आभार प्रसाद मिरासदार यांनी मानले.
"मला जुन्या दोन-तीन खेळांची माहिती होती. माझ्याप्रमाणेच आमच्या पिढीतील मुलामुलींना जुन्या खेळांची माहिती नाही. अशा वेळी एक पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली आणि पुढील २४ तासात पुस्तक लिहून पूर्ण केले. शालेय विद्यार्थ्यांनी आवर्जून पुस्तक वाचावे," असे रेवा पांडे, लेखिका म्हणाल्या.
"जग सुंदर करायचे झाल्यास, समाजाला पुस्तक वाचणारी आणि मैदानावर खेळणारी मुले गरजेची आहेत. शारीरिक हालचाली, व्यायाम, भरपूर मैदानी खेळ खेळणे अशा गोष्टी दररोज झाल्यास, मुलांची वाढ उत्तम होणार आहे. मैदानावर खेळ खेळल्यामुळे सामाजिक एकोपा वाढण्यासोबतच आपली संस्कृती जपण्यास मदत होणार आहे. मुलांना मोबाइलच्या मायाजालातून बाहेर काढायचे झाल्यास, पालकांनी मुलांना मैदानावर खेळ खेळायला प्रवृत्त करायला हवे," असे किरण केंद्रे यांनी सांगितले.
--------------------------------------------------------------------------------------------------
#TraditionalGames #BookLaunch #Pune #ChildDevelopment #Sports #RevaPandey #PuneUniversity

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: