इंद्रायणी नदीपात्रातील अनधिकृत बांधकामप्रकरणी क्षेत्रीय अधिकारी बोदडे यांची भूमिका संशयास्पद
"बीट निरीक्षक म्हणून माहिती दिली, पण बोदडे यांनी कारवाई केली नाही" - शिरसाट
पिंपरी : इंद्रायणी नदी पात्रातील निळ्यापुरेशेतील 36 बंगले पाडण्यात आल्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी शिरसाट यांच्यावर नागरिकांनी गंभीर आरोप केले आहेत. मात्र आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, शिरसाट यांनी तत्कालीन क्षेत्रीय अधिकारी आणि आत्ताचे महापालिचे उपायुक्त अण्णा बोदडे यांच्याकडे बोट दाखवले आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शिरसाट यांनी बांधकाम न पाडण्यासाठी दीड लाख रुपये घेतले. सुमारे 35-36 नागरिकांनी त्यांच्यावर हा आरोप केला आहे. मात्र शिरसाट यांनी हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हणत, अण्णा बोदडे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शिरसाट यांच्या स्पष्टीकरणानुसार, "या प्रकरणात तत्कालिन क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्याकडे हे अनधिकृत बांधकाम सुरू असतानाच त्यावर कारवाई करण्याचे अधिकार होते. त्यांना मी बीट निरीक्षक या नात्याने त्यांना सर्व गोष्टी कळविल्या होत्या. त्यांनी का कारवाई केली नाही ते मला सांगता येणार नाही," असा खुलासा त्यांनी केला. प्रत्यक्षात, शिरसाट यांनी या अनधिकृत बांधकामांकडे अण्णा बोदडे यांनी दुर्लक्ष केल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
शिरसाट यांच्या नियुक्तीच्या वेळी (2022 मध्ये) तेथे 22 बंगले पूर्ण झालेले होते आणि लोक त्यामध्ये राहत होते. त्यांच्या देखरेखेखाली असलेल्या दोन बांधकाम सुरू असलेल्या बंगल्यांना त्यांनी नियमानुसार नोटिसा बजावून काम थांबवण्यास सांगितले होते.
"मी कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. या घटनेला तीन वर्षे झाली आहेत. जर मी पैसे घेतले असते, तर कोणीतरी माझ्या वरिष्ठांकडे किंवा एसीबीकडे तक्रार केली असती," असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या मते, नागरिकांचे बंगले पडल्यामुळे त्यांना त्रास झाला आहे आणि त्यामुळेच ते प्रशासनाला लक्ष्य करण्यासाठी त्यांचे नाव घेत आहेत.
शिरसाट यांनी स्पष्ट केले की, "माझे काम बांधकाम शोधणे, वरिष्ठांना अहवाल देणे आणि त्यांच्या सहीची नोटीस बजावणे हे होते, कारवाई करणे नाही." त्यांच्या म्हणण्यानुसार, बांधकाम थांबवण्याचे आणि कारवाई करण्याचे आदेश क्षेत्रीय अधिकारी देतात, जे त्या वेळी अण्णा बोदडे होते.
"मी याबद्दल माहिती दिली होती, साईटला भेट दिली होती, परंतु कारवाईचे आदेश बोदडे यांनी देणे अपेक्षित होते, जे त्यांनी केले नाही.त्यांनी आदेश न देण्याचे कारण मला माहीत नाही," असेही त्यांनी सांगितले.
शिरसाट यांनी स्पष्ट केले की त्यांच्यावर कोणाचाही दबाव नव्हता. त्यांना यापूर्वी एका प्रकरणात निलंबित करण्यात आले होते, ज्यात इंद्रा्यणीनगरमधील फोर्कलिफ़्ट मशीन विकल्याचा आरोप होता, परंतु त्यांची खातेनिहाय चौकशी झाली आणि त्यांच्याकडे पुरावे असल्याने लवकरच निर्णय लागेल असेही त्यांनी सांगितले.
एकंदरीत, शिरसाट यांनी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप पूर्णपणे नाकारले आहेत. त्यांच्या खुलाशामुळे या संपूर्ण प्रकरणात आता तत्कालीन क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे या एका नव्या नावाचा समावेश झाला आहे. त्यांनी वेळेत कारवाईचे आदेश दिले नाहीत, ज्यामुळे अनधिकृत बांधकामे वाढत गेली असा आरोप आता पुढे येत आहे.
#IndrayaniRiverEncroachment #UnauthorizedConstruction #MunicipalAction #RegionalOfficerRole #AdministrativeNegligence #AnnaBoddade

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: