लाडकी बहिण योजनेने प्रभावित होऊन १२० महिलांचा भाजपमध्ये प्रवेश
पिंपरी: भारतीय जनता पक्ष केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरला आहे, असा दावा भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केला. वाकड येथे झालेल्या चिंचवड विधानसभा विस्तारित कार्यकारिणी अधिवेशनात ते बोलत होते.
जगताप यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बुथ स्तरावर जाऊन शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणि युवा प्रशिक्षण योजना यांचे उदाहरण देत महायुती सरकारचे कामकाज जनतेला स्पष्ट करण्याचा आग्रह केला.
या अधिवेशनात लाडकी बहिण योजनेमुळे प्रभावित होऊन १२० महिलांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक माजी राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर उषा ढोरे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस नामदेव ढाके, महेश कुलकर्णी, चिंचवड विधानसभा प्रमुख काळूराम बारणे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मनोज तोरडमल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय भेगडे यांनी पिंपरी-चिंचवडचे महाराष्ट्रातील राजकारणातले महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी चिंचवड विधानसभा आमदाराला सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प कार्यकर्त्यांना करण्यास सांगितले. त्यांनी विरोधकांनी पसरवत असलेल्या चुकीच्या माहितीला तोंड देण्याची सूचनाही दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिंचवड विधानसभा संयोजक काळूराम बारणे यांनी केले. शोकप्रस्ताव शशिकांत कदम यांनी मांडला. अधिवेशनात नवमतदार नोंदणी अभियान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र सरकारचा अभिनंदन, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, लाडकी बहिण योजना, पिंपरी-चिंचवड मनपातील भाजपने केलेली विकासकामे या विषयांवर चर्चा झाली.
शंकर जगताप यांनी मावळ लोकसभा निवडणुकीत चिंचवडमधून महायुतीच्या उमेदवाराला ७५ हजाराहून अधिक मताधिक्क्य मिळाल्याचे आठवण करून दिली. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत सदस्य नोंदणी आणि मतदार नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविण्याचा आग्रह केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: