पिंपरी चिंचवड : संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील वर्षभरापूर्वी बसविलेला सिंथेटिक ट्रॅक उखडला, भ्रष्टाचाराचा आरोप
भोसरीच्या आमदारांच्या दबावाखाली पालिकेच्या क्रीडाविभागाचा आंधळा कारभार! : अजित गव्हाणे
पिंपरी-चिंचवड: भोसरी विधानसभेतील भ्रष्टाचाराला आणखी एक नमुना समोर आला आहे. इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील वर्षभरापूर्वी बसविलेला सिंथेटिक ट्रॅक उखडून त्याची दुर्दशा झाली असल्याने भाजपच्या सत्ताकाळातील भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, चार कोटी रुपये खर्च करून बसविलेला हा ट्रॅक फक्त सहा महिन्यातच उखडला गेला. त्यांनी भाजपच्या नेत्यांवर "स्वतःचे खिसे भरण्यासाठी" हा ट्रॅक निकृष्ट दर्जाचा बांधला असा आरोप केला.
दहा वर्षांपूर्वी बांधलेला जुना ट्रॅक खराब झाल्याने नवीन ट्रॅक बसविण्यात आला होता. हा ट्रॅक नोव्हेंबर 2023 मध्ये खेळाडूंसाठी खुला करण्यात आला. मात्र, फक्त दोन महिन्यातच तो दुरुस्तीसाठी बंद करावा लागला. मार्च 2024 मध्ये पुन्हा खुला केलेला हा ट्रॅक फक्त काही दिवसांतच उखडला गेला. प्रशिक्षकांनी सुरुवातीपासूनच या ट्रॅकच्या बांधणीत बेजबाबदारपणा असल्याचा आरोप केला होता.
या ट्रॅकवर दररोज 300 ते 400 ॲथलेटिक सराव करण्यासाठी येतात. या घटनेमुळे त्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. प्रशिक्षकांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड पालिकेच्या क्रीडा विभागाचा भोसरी विधानसभेच्या आमदारांच्या दबावाखाली अक्षरशः आंधळा कारभार सुरू आहे. महाराष्ट्र अॅथलेटिक्स टेक्निकल कमिटीने या ट्रॅकची पाहणी केली होती आणि त्यांनी हा ट्रॅक महाराष्ट्रातील सर्वात निकृष्ट दर्जाचा असल्याचे म्हटले होते.
माजी नगरसेवक संजय वाबळे यांनी या प्रकरणी पालिकेवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, खेळाडूंच्या गरजा लक्षात न घेता हा ट्रॅक बांधण्यात आला आहे. त्यांनी खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता असल्याने या ट्रॅकवरील सराव तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे. त्यांनी प्रशासनावर तातडीने ट्रॅकची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: