किनारपट्टीच्या सौंदर्याला साक्षी ठेवत दापोली सायक्लोथॉन यशस्वी

 


दापोली, 14 मे 2025 : दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित "दापोली समर सायक्लोथॉन २०२५, सिझन ७" ही सायकल स्पर्धा ११ व १२ मे २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाली. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या उद्देशाने आयोजित या स्पर्धेमध्ये राज्यातील वय ७ ते ७८ वयोगटातील ३०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

स्पर्धकांनी दापोली-आसूद-सालदुरे-पाळंदे-आंजर्ले-अडखळ-पाजपंढरी-हर्णै-दापोली या समुद्रकिनाऱ्यावरील ५० किलोमीटर मार्गावर कोकणातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत सायकल चालवली. मार्गात येणाऱ्या अनेक पर्यटन स्थळांना भेटी देऊन स्पर्धकांनी कोकणी खाद्यपदार्थ, मासे, आंबे, फणस, काजू यांसारख्या कोकणी रानमेव्याचा आस्वाद घेतला.

यंदाची सायक्लोथॉन स्पर्धा ५० किलोमीटर कोस्टल सिनिक रुट, १५० किलोमीटर शॉर्ट सिटी लूप आणि फॅन राईड अशा विविध गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले.

या स्पर्धेमध्ये अनेक प्रेरणादायी सायकल प्रेमींचा सहभाग होता. पुणे येथील ७८ वर्षीय डॉ. निरुपमा भावे यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. डॉ. भावे यांनी आपला ७० वा वाढदिवस पुणे ते कन्याकुमारी सायकल राईड करत साजरा केला होता. त्यांनी ७२ व्या वर्षी पुणे ते जम्मू, ७५ व्या वर्षी पुणे ते कोलकाता, पंढरपूर ते घुमान (पंजाब) असे देशभर अनेक सायकल प्रवास केले आहेत.

श्रीनगर ते मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग करत जागतिक विक्रम प्रस्थापित करणारे सतीश जाधव (वय ६८), अनेक लांब अंतराच्या मॅरेथॉन पूर्ण करणारे ७७ वर्षीय जुगल राठी, जगातील सर्वात उंच उमलिंगला पास सायकल चालवत सर करणारे डॉ. सुभाष कोकणे (वय ७३), जयश्री जाधव (वय ६२), राजू औटी (वय ६१), विजय हिंगे (वय ६५), हेमलता राव (वय ६६) यांसारखे वयाला हद्दपार करणारे अनेक सायकल प्रेमी या स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रेरणादायी युट्युबर माधुरी पाचपांडे यांचाही सहभाग होता.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुणेहून डॉ. सुभाष कोकणे, विजय हिंगे, विद्याधर पालकर तसेच मुंबई-ठाणेहून अक्षय खांडेकर, नारायण पेरुमल, नयन पांचाळ, तौसिफ़ शेख, रवी यादव, महेंद्र निकम, विठोबा चव्हाण हे सायकल चालवतच दापोलीत आले होते.

शॉर्ट सिटी लूप मार्गावर अथर्व शेंडे, संतोष परब, स्वराज मांजरे यांनी १५०+ किलोमीटर, अनुज शिगवण, अथर्व मांडवकर, प्रेम भुसारे, सार्थक शिगवण यांनी १२५+ किलोमीटर, परेश बुटाला, स्वराज राजपूरकर, आयुष शिंदे, मयूर देसाई यांनी ८०+ किलोमीटर अंतर सायकल चालवून पूर्ण केले.

या स्पर्धेसाठी दापोली शिक्षण संस्था, दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज टीम, दापोली तालुका आरोग्य अधिकारी व टीम, दापोली पोलीस टीम, मेनेकी अब्सुलूट एनर्जी ड्रिंक, राहुल मंडलिक आणि हॉटेल ओम साई यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सायक्लोथॉन स्पर्धेचे नियोजन अंबरीश गुरव, प्रशांत पालवणकर, राजेशकुमार कदम, रागिणी रिसबूड, राजेंद्र नाचरे, सुनील रिसबूड, विनय गोलांबडे आणि नितीन बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

----------------------------------------------

#DapoliCyclothon 

#CyclingCulture 

#KonkanTourism 

#CyclingForAll 

#SeniorAthletes 

#MaharashtraSports 

#CoastalCycling 

#SummerCyclothon2025 

#FitnessJourney 

#CyclingInspiration

किनारपट्टीच्या सौंदर्याला साक्षी ठेवत दापोली सायक्लोथॉन यशस्वी किनारपट्टीच्या सौंदर्याला साक्षी ठेवत दापोली सायक्लोथॉन यशस्वी Reviewed by ANN news network on ५/१४/२०२५ ०५:२८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".