डॉ.संतोष पाटील यांचा पर्यावरण व अध्यात्मासाठी हरितवारी उपक्रम...
दिलीप शिंदे
सोयगाव : कान्होपात्रा या विठ्ठल व वारकरी संप्रदायाच्या १५ व्या शतकातील संत होत्या.रूपाने अत्यंत सुंदर असणाऱ्या कान्होपात्रावर बिदरच्या निजामाची वक्र दृष्टी पडली व त्या पासून वाचण्यासाठी त्या पंढरपूरला आल्या , तेथेच त्यांनी देह ठेवला. त्या जागेवर वाघाटी ज्यास तरटी असे म्हणतात ती वेल उगवली ,या वेलीस कान्होपात्रा चे झाड म्हणून पूजण्याची १५ व्या शतकापासून प्रथा पडली.पंढरपूरला गेल्यावर आधी दर्शन या झाडाचे व मग विठू माऊलीचे घ्यावे लागते.मात्र पंढरपूर येथील ही ५०० वर्ष पुरातन ऐतिहासिक महावेल आता सुकली व हा वारसा असाच शतकानुशतके पंढरी असावा म्हणून २ वर्षापूर्वी आषाढी एकादशी ला प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ व बायोस्पियर्स या संस्थेचे अध्यक्ष डॉ.सचिन पुणेकर यांनी विकसीत केलेल्या तरटीच्या वेलीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते संत कान्होपात्रा यांच्या समाधीस्थळी रोपण करण्यात आले आहे. सिल्लोड येथील पर्यावरण संवर्धक व दुर्मिळ प्रजाती वाचविणारे डॉ.संतोष पाटील यांनीही वाघाटीची रोपे निर्माण करून ती विविध मंदिर परिसरात लावण्याचा उपक्रम हाती घेतला असून ,याचाच भाग म्हणून आज सिल्लोड तालुक्याचे आराध्य दैवत पालोद जवळील नागझिरा व धानोरा येथील काशी विश्वेश्वर महादेव मंदिर प्रांगणात महंत श्री बालयोगी सर्वानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते मंदिर परिसरात वाघाटीचे रोप लावण्यात आले.यावेळी ज्ञानेश्वर काळे, कृष्णा महाजन आदी उपस्थित होते.
आध्यात्मिक महत्व
या वेलीच्या फळांना गोविंदफळ म्हणतात.आषाढी एकादशी झाल्यावर द्वादशी ला या फळांची भाजी करून उपवास सोडण्याची वारकरी संप्रदायात परंपरा आहे.भक्तीविजय या ग्रंथात रुक्मिणी लावी शिडी वाघाटीचे वेली, तसेच कान्होपात्रा तरटी जाहली ही ओवी ही आहे.
पर्यावरणीय महत्त्व
इंडियन वांडेररसह ७ प्रजातींची फुलपाखरे अळी अवस्थेत वाघाटीची पाने खाऊन यावर कोष बनवतात व त्यांचे जीवनचक्र यावर विसंबून आहे.आयुर्वेदात गोविंदफळ हे पित्तनाशक व ज्वरनाशक म्हणून परिचित आहे.
साहित्य महिमा
मागुती बोले पुजाऱ्याला ।।कान्हो वृक्ष जाहली कैसी llत्यांनी दक्षिणद्वारापासी तरटी वृक्ष दाखविला ।।
हरित वारी
वारकरी संप्रदायात महत्त्व असलेल्या वाघाटीचे शास्त्रीय नाव "कॅपारिस झायलेनिका" असे असून तीस तरटी असेही म्हणतात.ही महावेल असून ती हळू वाढणारी व दीर्घायुषी असून विशेषतः ती खूप जुन्या वड ,पिंपळ आदी वृक्षांवर आधाराने वाढीस लागते.महाराष्ट्रात ही मोजक्याच ठिकाणी आढळून आली आहे.अनेक पक्षांना हिची फळे प्रिय असून त्या द्वारे हिचा बीजप्रसार होतो मात्र कच्चीच फळे पक्षी अधिक खातात त्यामुळे ही वेल अत्यंत दुर्मीळ झाली आहे.माझ्या हरित वारी या उपक्रमा अंतर्गत जालना व छ. संभाजीनगर जिल्ह्यात विविध धार्मिक स्थळी रोपण केली आहे व ही जैवविविधता संवर्धित करत आहे.- डॉ.संतोष पाटील, पर्यावरण संवर्धक, अभिनव प्रतिष्ठान,सिल्लोड
धानोरा येथील काशी विश्वेश्वर मंदिरात दुर्मीळ ’कान्होपात्रा’ वेलीचे रोपण
Reviewed by ANN news network
on
७/१५/२०२४ ०८:०८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: