विठ्ठल ममताबादे
उरण : उरण तालुक्यातील भेंडखळ गावचे भूमिपुत्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाळकृष्ण पाटील यांचे गुरुवार दि. २० जून २०२४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,आई,दोन मुलगे आणि भाऊ असा परिवार आहे.
कोकण पदवीधर मतदार संघातील रायगड जिल्हा महाविकास आघाडीने आयोजित करण्यात आलेल्या उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ पनवेल येथील मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील सुद्धा उपस्थित होते. या मेळाव्यात अचानकपणे प्रशांत पाटील यांना प्रकृती खालावल्याचे जाणवताच त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तात्काळ नवीमुंबई येथील अपोलो रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली.उपचार घेत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्यहक्कासाठी झालेल्या अनेक आंदोलने,मोर्चाचे ते संयोजक होते.शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख पदावर असतांना १९९५ साली त्यांनी उरण - अलिबाग विधानसभा तर २०१४ मध्ये स्वतंत्र झालेल्या उरण विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती.
त्यांच्या पार्थिवावर रात्री ९ च्या सुमारास उरण बोरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, चाहत्यांनी मोठी गर्दी केली.
त्यांच्या निधनामुळे उरण, पनवेल तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्हा, नवीमुंबई परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: