ठाणे : जिल्ह्यातील जलशक्ती अभियान व राष्ट्रीय जल मिशनअंतर्गत गेल्या वर्षभरात झालेल्या व यावर्षी सुरू असलेल्या जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, पारंपारिक आणि इतर जलकुंभ आणि टाक्यांचे नूतनीकरण, संरचनेचा पुनर्वापर आणि पुनर्भरण, गाळ काढणे, पाणलोट विकास, सघन वनीकरण आदी कामांचा आज केंद्रीय निती आयोगाच्या सदस्या श्रीमती जागृती सिंगला यांनी आढावा घेतला. जलशक्ती अभियानाअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवावे. तसेच या कामांमुळे किती भूजल साठा वाढला याची माहिती ठेवावी, अशा सूचना श्रीमती सिंगला यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, केंद्रीय पथकातील शास्त्रज्ञ वैष्णवी परिहार, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. भाऊसाहेब दांगडे, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रवीण खेडकर, ठाण्याचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते, शहापूरचे उपवनसंरक्षक सचिन रेपाळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दीपक कुटे, जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जून गोळे, मृद व जलसंधारण अधिकारी दिलीप जोकार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात सन 2023 मध्ये जलसंधारण व जलपुनर्भरणाची 1191 कामे, पारंपारिक आणि इतर जलकुंभ आणि टाक्यांचे नूतनीकरणाची 179 कामे, जलसंरचनेचे पुनर्वापर व पुनर्भरणाची 320 कामे, पाणलोट विकासाची 152 कामे सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मृद व जलसंधारण विभागमार्फत सन 2023या वर्षात चेक डॅमची एकूण 19 कामे तर लघु पाटबंधारे विभागामार्फत 24 कामे हाती घेण्यात आली आहेत.
अमृत सरोवर योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागामार्फत घेण्यात आलेल्या 75 कामांपैकी 46 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पाणीपुरवठा विभागामार्फत पावसाच्या पाण्याचे पुनर्भरणाची एकूण 39 कामे हाती घेण्यात आली असून त्यातील 24 कामे पूर्ण झाली आहेत. जलजीवन मिशनअंतर्गत जुन्या योजनांची दुरुस्ती व नवीन योजनांची अशी एकूण 700 कामे हाती घेण्यात आली असून त्या कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. ही सर्व कामे डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
श्रीमती सिंगला यांनी आतापर्यंत झालेल्या कामांचा व या वर्षी करण्यात येणाऱ्या कामांच्या नियोजनाची माहिती घेतली. त्या म्हणाल्या की, पाणलोट विकास, जलसंधारणाची कामांमुळे तसेच पर्जन्य जल पुनर्भरणामुळे व तलावांमधील गाळ काढल्यामुळे किती पाणी साठा होतो, भूजल पातळी वाढली आहे का याची माहिती ठेवावी. तसेच दुरुस्त केलेल्या जलस्त्रोते पुन्हा नादुरुस्त होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. प्रत्येक कामांचे जिओ टॅगिग करावे.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जिंदल यांनी जिल्ह्यातील कामांची माहिती दिली व या वर्षीचे नियोजन सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: