चिंचवड : लोकशाही वाचविण्यासाठी नाना काटे यांना विजयी करा : जयंत पाटील




सामान्य जनतेचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा भाजपचा प्रयत्न : जयंत पाटील
चिंचवड : देशाची राज्यघटना धोक्यात आली आहे. बीबीसी सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेवर धाड टाकून खरी माहिती दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामान्य माणसांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मताचा अधिकार काढून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, खोक्यांच्या जोरावर पक्षाचे नाव, चिन्ह चोरी केली जात असल्याने लोकशाही वाचविण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आली आहे. पोटनिवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही वाचविण्याची आणि भाजपला धडा शिकविण्याची आपणाला संधी प्राप्त झालेली असल्याने, नाना काटे यांना बहुमताने विजयी करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रहाटणी येथे झालेल्या सभेत केले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुभान अली शेख यांच्या सभेचे रहाटणी येथे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नाना काटे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे नेते व माजी मंत्री भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, राष्ट्रवादीचे निरीक्षक व मावळचे आमदार सुनील शेळके, युवा नेते रोहित आर.आर. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांकचे प्रदेश सचिव सुभान अली शेख, सारंग श्रीनिवास पाटील, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.


या सभेस माजी आमदार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले, उपशहरप्रमुख रोमी संधू, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस रविकांत वरपे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेविका शीतल नाना काटे, लताताई ओव्हाळ, सुलक्षणा धर, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक मयुर कलाटे, तुषार कामठे, विक्रांत लांडे, शंकर काटे, राजू लोखंडे, राजू मिसाळ, पंकज भालेकर, धनंजय भालेकर, शाम लांडे, फझल शेख, संतोष कोकणे, विनोद नढे, राहुल भोसले, गोरक्ष लोखंडे, खंडूशेठ कोकणे, माई काटे, उषा काळे, संगीता ताम्हाणे, राजेंद्र जगताप, शमीम पठाण, पुणे शहर महिला शहराध्यक्षा स्वाती पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा वर्षा जगताप, युवक अध्यक्ष इम्रान शेख, सेवादलाचे अध्यक्ष महेश झपके, प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ, युवा नेते शाम जगताप, पिंटू जवळकर, विशाल पवार, प्रशांत दिलीप सपकाळ, सागर कोकणे, कविता खराडे, मनीषा गटकळ, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय अवसरमल, संदीप पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी शहराध्यक्ष यश साने आदी उपस्थित होते. सभेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.


जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, नाना काटे यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपल्याला आता केवळ मताधिक्य वाढवायचे आहे. राहुल कलाटे यांची उमेदवारी ही विरोधकांची मते विभागण्यासाठी भारतीय जनता पक्षानेच केलेली खेळी आहे. याची माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. सीमेवर काही घडले ती माहिती लोकांपर्यंत पोहोचू नये, महागाई किती वाढली तरी त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचू नये, याची व्यवस्था आणि तयारी भारतीय जनता पक्षाने बीबीसीवर छापा टाकून केली आहे. त्यामुळे त्यांना हवी तीच माहिती मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून बाहेर येणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना घरात जाऊन या गोष्टीची माहिती करून देण्याची आवश्यकता आहे.

जयंत पाटील पुढे म्हणाले, अजित पवार यांनी या भागाचा देशात सर्वाधिक विकास केला आहे. हा भाग आयटी हब होण्यासाठी शरद पवार व अजित पवार यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीनेच पिंपरी-चिंचवड समृद्ध झाले आहे. हे नागरिकांपर्यंत पोहोचवले गेले पाहिजे. देशातील लोकशाही संपविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे ही निवडणूक ही देशातील लोकशाही टिकविण्यासाठी महत्त्वाची निवडणूक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राज्यात झालेल्या सर्व पोटनिवडणुका महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. त्यामुळे ही निवडणुकही आपण जिंकणार आहोत, कोकण, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांचा आपल्याला पाठिंबा मिळणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आपापल्या वॉर्डामध्ये अधिकाधिक मताधिक्य मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

मोदींच्या फोटोमुळे शिवसेनेच्या जागा कमी झाल्या : 
भास्कर जाधव
यावेळी बोलताना माजी मंत्री व शिवसेनेचे नेते भास्कर जाधव म्हणाले, या देशात अनेक चोऱ्या झाल्या असतील, मात्र आख्खा पक्ष चोरण्याचा प्रयत्न प्रथमच झाला आहे. मोदींचा फोटो लावून २०१९ मध्ये प्रचार केला त्या वेळी शिवसेनेच्या जागा कमी झाल्या. या उलट २०१४ मध्ये केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा वापर करून प्रचार केला होता, त्या वेळी शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. मोदींच्या नावाने मते मिळणार नाहीत हे लक्षात आल्यामुळेच शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह चोरण्याचा घाट भारतीय जनता पक्षाने घातला. देशातील गृहमंत्री अमित शहा म्हणतात महाराष्ट्रातून ४८ खासदार निवडून आणायचे आहेत. त्याचे कारण देशातील इतर राज्यांतून भाजपच्या खासदारांची संख्या कमी होणार आहेत.
भारतीय जनता पक्षाला रोज नव्या थापा कशा मारायच्या याचे कार्यकर्त्यांना व नेत्यांना प्रशिक्षण दिले जाते. एका सर्जिकल स्ट्राईकचा ते उल्लेख करतात, मात्र इंदिरा गांधींनी अख्खा पाकिस्तान तोडला पण त्याची वाच्यता केली नाही. संरक्षणाच्या या गोष्टी बोलायच्या नसतात. याचे भानही या पक्षाच्या नेत्यांनी सोडले आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

राजकीय संस्कृती धुळीस मिळविली : मुंडे
यावेळी बोलताना माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, मोदी यांच्या कारकिर्दीतच सर्वात जास्त हिंदु असुरक्षीत असल्याचे दिसून येत आहे. या देशातील हिंदूंना सुरक्षित वाटत नसल्याने मोदी यांच्या कारकीर्दीला ९ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही मोर्चे काढावे लागत असतील तर भारतीय जनता पक्षाने राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना केले काय केले याचे उत्तर देण्याची वेळ आली आहे. राज्यघटना, संविधान भाजपने अडचणीत आणले असून त्यांनी राज्याची आणि देशाची राजकीय संस्कृती आणि वैचारिक परंपरा धुळीला मिळविण्याचे काम केले आहे. लोकशाही वाचावी, घटनेचे रक्षण व्हावे, अशी विचारधारा असणाऱ्या नागरिक चिंताक्रांत बनले आहेत. त्यामुळे लोकशाहीच्या संरक्षणासाठी चिंचवडच्या पोटनिवडणुकीत नाना काटे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून त्याची सुरुवात करा, असे आवाहनही मुंडे यांनी यावेळी केले.

भाजप हा निष्ठूर लोकांचा पक्ष
भारतीय जनता पक्षाला कोणाबद्दलही प्रेम, दया नाही, हा निष्ठूर आणि स्वार्थी लोकांचा पक्ष आहे. लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक अत्यवस्थ असताना केवळ आपले आमदार निवडून यावेत यासाठी त्यांचा जिव धोक्यात घालून त्यांना रुग्णवाहिकेतून विधानपरिषद, राज्यसभेच्या मतदानासाठी आणले होते. त्यावेळी आम्हालाही ते पाहून दु:ख झाले. स्वार्थासाठी आणि मतांसाठी या दोन्ही आमदारांचा वापर करणारे नेतेच आता भावनिकतेच्या जोरावर मते मागत आहेत. अत्यवस्थ आमदार असताना त्यांच्या भावना कोठे गेल्या होत्या. असा प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. गिरीश बापटांना ऑक्सीजन लावून ही निष्ठूर मंडळी प्रचारासाठी उतरवत आहेत. त्यातूनच त्यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे भाजपचा दुहेरी चेहरा उघड झाल्याने ही निवडणूक महाविकास आघाडीने केलेला विकास आणि भाजपचा भ्रष्टाचार या मुद्यांवरच लढविली जात आहे.

फसव्या शिवसैनिकांना दूर ठेवा
शिवसेनेतील काही गद्दारांना हाताशी धरून शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला वेदना देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला धूळ चारणे हेच प्रत्येक शिवसैनिकाचे कर्तव्य आहे. चिंचवडच्या पोटनिवडणुकीमुळे आपल्याला ही संधी मिळाली आहे. त्यामुळे शिवसैनिक म्हणून कोणी मत मागायला येत असेल, तर त्याच्या फसव्या प्रचाराला बळी पडू नका. उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना त्रास देणाऱ्यांना धूळ चारण्यासाठी नाना काटे यांना विजयी करा, असे आवाहन भास्कर जाधव यांनी केले.
चिंचवड : लोकशाही वाचविण्यासाठी नाना काटे यांना विजयी करा : जयंत पाटील चिंचवड : लोकशाही वाचविण्यासाठी नाना काटे यांना विजयी करा : जयंत पाटील Reviewed by ANN news network on २/२१/२०२३ ०५:२७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".